शाश्वत जीवन आणि निरामय आरोग्याचा मार्ग दाखविणाऱ्या योग आणि आयुर्वेद या प्राचीन विद्यांमुळे जगभरात भारताची वैशिष्टय़पूर्ण ओळख प्रस्थापित करण्यात योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी योग आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांची ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या संचालिका ही खरे तर योगगुरू डॉ. गीता अय्यंगार यांची रूढार्थाने ओळख; पण त्याही पलीकडे जात त्यांनी मोठय़ा कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले. पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून योगाभ्यास आणि योगशास्त्राचा प्रसार-प्रचार हेच जीवनाचे ध्येय मानून काम करणाऱ्या त्यांच्या कन्या डॉ. गीता यांच्या निधनाने योगाभ्यासकांना धक्का बसला आहे. मोठय़ा वृक्षाखाली छोटी झाडे बहरत नाहीत, असे अनेकदा बोलले जाते; पण डॉ. गीता अय्यंगार यांचे कार्य त्याला अपवाद ठरणारे आहे.

योगाचार्य अय्यंगार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत योगप्रसारामध्ये योगदान देताना डॉ. गीता यांचे कार्य म्हटले तर मूक, परंतु विधायक कृती आहे. पित्याचा वारसा पुढे नेण्याची आश्वासकता त्यांच्यामध्ये ठासून भरली होती. लहानपणी त्यांना नेफ्रायटिस हा मूत्रपिंडदाहाचा विकार जडला तेव्हा वडिलांकडे महागडय़ा उपचारांसाठी पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी कन्येस योगाचा मार्ग अनुसरण्यास सांगितला. त्या वेळी त्या योगाकडे वळल्या त्या कायमच्याच. आयुर्वेदातही त्या डॉक्टरेट होत्या. वयाच्या ११व्या वर्षांपासून त्यांनी योगसाधना सुरू केली. योगाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य सुधारण्यावर त्यांचा भर होता. त्यातूनच त्यांनी ‘योग-  अ जेम फॉर विमेन’ हे पुस्तक लिहिले. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून म्हाळुंगे बालेवाडी येथे योग शिबीर सुरू आहे. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ५६ देशांतील योगसाधकांना डॉ. गीता यांनी अगदी शनिवापर्यंत प्रशिक्षण दिले. मात्र, रविवारची सकाळ ही डॉ. गीता यांच्या आकस्मिक निधनाची दु:खद वार्ता घेऊन आली! त्यांच्या हृदयाजवळील स्नायूंमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे निमित्त झाले.

कर्नाटकातील बेल्लूर येथून योगाचार्य अय्यंगार योगप्रचारासाठी बाहेर पडले आणि त्यांनी पुणे ही आपली कर्मभूमी मानली. योगाचार्य अय्यंगार यांच्या कार्यामध्ये पत्नी रमामणी यांच्या अकाली निधनानंतर डॉ. गीता अय्यंगार या योगाचार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. व्यक्तिगत प्रसिद्धी आणि मानमरातब यापेक्षाही योगाचा प्रचार आणि प्रसारामध्येच त्यांना रस होता. त्यामुळेच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या डॉ. गीता यांचा हा ‘कर्मयोग’ गौरवास्पद ठरतो.