वास्तुरचनाकारांच्या पुरुषी जगात झाहा हदीद या एकमेव महिलेचे नाव खरोखर ‘जगप्रसिद्ध’ म्हणावे असे होते. जन्म इराकचा, पुढे ब्रिटिश नागरिक आणि टोकिओपासून सॅनफ्रान्सिस्कोपर्यंतच्या शहरांत किंवा अझरबैजानपासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या अनेकानेक देशांतील इमारतींचे संकल्पन करणाऱ्या झाहा हदीद यांचे वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी अमेरिकेतील मायामीत निधन झाल्याची वार्ता ३१ मार्च रोजी आली, ती धक्कादायकच होती. वय झाकणारा मेकअप, वेशभूषा यांहीपेक्षा झाहा यांच्याकडे पाहून लक्षात राहत असे तो त्यांचा रुबाब आणि काहीशा अहंकारातूनही जाणवणारा डौल! ब्रिटनने त्यांना उमरावांच्या तोडीचे ‘डेम’ पद देऊन हा रुबाब वाढविला होताच; पण अहंकार आणि डौल यांचा तोल झाहा हदीद यांच्या व्यक्तिमत्त्वात साधला गेला, याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची वास्तुसंकल्पनाची प्रतिभा!
वाळूच्या टेकडय़ा एकमेकींच्या आधाराने थबकाव्यात, झुडपांनी आपापसांत दाटी करावी, उंच झाडाने वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला घट्ट करीत वाढावे.. तसा प्रत्यय त्यांनी रचलेल्या, त्यांनी संकल्पन केलेल्या इमारती पाहणाऱ्याला येई. हे सारे कोठून आले? हदीद यांचे उत्तर : ‘‘वडिलांनी लहानपणी सुमेरियात नेले होते. तेराएक वर्षांची असेन मी; पण ऐतिहासिक अवशेषांप्रमाणेच तिथला निसर्ग पाहून मी हरखून गेले होते.’’ शहरांमध्ये त्या निसर्गाची लय पुढे हदीद यांनी इमारतींतून दाखवून दिली, अशी दाद वास्तुरचना-समीक्षकांनी दिली आहे. लंडनच्या (२०१२) ऑलिम्पिकमधील जलतरण आदी क्रीडा स्पर्धाकरिता ‘लंडन अ‍ॅक्वाटिक्स सेंटर’, अझरबैजानची राजधानी बाकु येथील ‘हैदर अलियेव सेंटर’ हे संग्रहालय, दक्षिण कोरियातील सोलचा ‘डाँग्डेमुन डिझाइन प्लाझा’, चीनमधील ‘ग्वांग्झू ऑपेरा हाऊस’ या हदीद यांच्या संकल्पनांतून साकारलेल्या इमारती गोलाईदार आहेत, तर जर्मनीतील लाइप्झिगचे ‘बीएमडब्ल्यू सेंटर’, रोममधील ‘मॅक्सी’ हे एकविसाव्या शतकातील कलेचे संग्रहालय, फ्रान्समधील मार्सेयचा ‘सीएमए सीजीए टॉवर’ या इमारतींमध्ये त्रिकोणी आकाराचा वापर आहे. ‘झाहा हदीद यांच्या उत्कृष्ट १० इमारती’ अशा याद्यांमध्ये तीन-चार नावांचा तरी फरक पडावा, एकमत न होता अनेक जाणकारांना अनेक इमारती उत्कृष्ट वाटाव्यात, असे काम हदीद यांनी केले. विषमतोल साधणारी लय जगभरच्या अनेकानेक इमारतींमध्ये हदीद यांनी आणली.
वास्तुरचनेच्या क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘प्रिट्झ्कर पारितोषिका’सह (२००४) अनेक पुरस्कार हदीद यांना मिळाले. ‘हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला’ हा मानीव मानही त्यांच्या वाटय़ाला अनेकदा आला. महिलांसाठी या क्षेत्राची वाट रुंदावणाऱ्या हदीद यांनी गेल्या काही वर्षांत, दागिन्यांचे डिझाइनही सुरू केले होते. ‘वाळूवरून अलगद बोटे फिरवल्यावर झालेल्या टेकडय़ा’ हे जे या काळातील त्यांच्या वास्तुरचनांचे रूप होते, तेच या दागिन्यांनाही होते.