|| सुखदेव थोरात

महाराष्ट्रातील समाजसुधारणांची, अस्पृश्यताविरोधाच्या आणि जातिअंताच्या चळवळीची परंपरा ही सर्व समाजघटकांतून आलेली आहे.. ही चळवळ  ब्राह्मणांची, मराठय़ांची, कुणब्यांची आणि माळ्यांची, अस्पृश्यांची आणि आदिवासींचीही आहे. या उज्ज्वल परंपरेतून आपण आजही धडे शिकू शकतो..

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
Vasantrao Mulik
हातकणंगलेतून मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी; प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मागणी

महाराष्ट्रातील हिंसक संघर्षांच्या घटनांमधून जाती-जातींमधील तेढ उघड होऊ  लागली असतानाच्या आजच्या काळात, या राज्यातील गतकालीन समाजसुधारकांची परंपरा आठवल्यास आपल्याला काही प्रेरणा मिळू शकते. हे समाजसुधारक जन्माने ब्राह्मण, मराठा, कुणबी, माळी वा अस्पृश्य जातींमधील असले, तरी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांतून महाराष्ट्राने तत्कालीन भारताची समाजरचना बदलण्यात- विशेषत: जातिभेद ओलांडण्यात आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या रूढी बदलण्यात- पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील ही समाज-सुधारणेची परंपरा १३ व्या शतकातील संत नामदेवांपासून ते विसाव्या शतकातील डॉ. आंबेडकरांपर्यंतची आहे. सन १२७० ते १९५६ असा हा सातशे वर्षांचा प्रवास आहे.

संत नामदेव (१२७०-१३५०) यांनी वारकरी संप्रदायाकडून प्रेरणा घेतली, ती वैष्णव विचारांशी जुळलेली होती. पेशामुळे अतिशूद्र मानली गेलेल्या कान्होपात्रेपासून ते सेना नाभिक, सावता माळी, अस्पृश्य समाजातील चोखामेळा, घरकाम करणारी जनाबाई, गोरा कुंभार, नरहरी सोनार हे सारे संत नामदेवांचे शिष्य बनले होते. जातिभेद ओलांडून धर्माला आणि सामाजिक संबंधांना समानतेकडे नेण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. नामदेवांची ही परंपरा सुमारे ३५७ वर्षांनंतर भक्तिसंप्रदायाचे अग्रणी राहिलेल्या तुकारामांनी (१६०८-१६५०) पुढे नेली. शिवाजी महाराज (१६३०-१६८०) हे संत तुकारामांचे समकालीन आणि तुकाराम त्यांना गुरुस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण-शूद्र साऱ्यांना एकत्र आणून राष्ट्रनिर्माणाचे कार्य पुढे नेले. जोतिबा फुले (१८२७-१८९०) यांनी जातिभेद, अस्पृश्यता आणि स्त्रियांचे शोषण यांविरुद्ध बंड पुकारून शूद्रातिशूद्रांसाठी तसेच मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढल्या काळात अनेकांनी सामाजिक सुधारणांचे काम पुढे नेले. शाहू महाराज (१८७४-१९२२) हे शूद्र वा अस्पृश्यांना समान अधिकार देणारा ध्रुवताराच ठरले आहेत. ‘राजर्षी’ शाहू महाराजांनी १५ जानेवारी १९१९ रोजी, आजपासून सार्वजनिक जागी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही, असा आदेश काढला.

विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केले. सन १९०५ मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी पुण्यात रात्रशाळा सुरू केली आणि १९०६ साली त्यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना केली. ‘कर्मवीर’ भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापन करून गावा-खेडय़ांतील शूद्रातिशूद्र आणि महिलांपर्यंत शिक्षणाचा प्रसार केला. विदर्भात पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज या त्रयीचे काम उल्लेखनीय ठरते. गाडगेबाबा किंवा संत गाडगे महाराज (१८७६-१९५६) यांनी केवळ अस्पृश्यतेला आणि जातिभेदालाच विरोध करण्यावर न थांबता अंधश्रद्धांवर आणि कर्मकांडावर प्रहार केले. अंधश्रद्धा आणि रूढींविरुद्ध असेच कार्य करणाऱ्या ‘राष्ट्रसंत’ तुकडोजी महाराजांनी (१९०९-१९६८) मानवी समानतेचा प्रचार-प्रसार केला. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून काम करणारे पंजाबराव देशमुख (१८९८-१९६५) हे समाजसुधारकही होते. डॉ. आंबेडकरांच्या उपस्थितीत, डॉ. पंजाबराव देशमुखांनी अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले होते. ‘शिवाजी एज्युकेशन सोसायटी’ स्थापन करून डॉ. देशमुखांनी स्त्री-शूद्रांना, अस्पृश्यांना शिक्षणाची समान संधी दिली. साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे बाबूराव बागूल यांनी समाजसुधारणांसाठी लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना जागते ठेवण्याचे काम केले. आज तो वारसा डॉ. साळुंके आणि त्यांचे सहकारी चालवीत आहेत.

समाजाला समानतेकडे नेऊ  पाहणाऱ्या या चळवळीत ब्राह्मणही मागे नव्हते. न्यायमूर्ती रानडे यांनी लिखाणातून हिंदू समाजरचनेची जी परखड तपासणी केली, ती महत्त्वाची आहेच आणि त्यांनी कृतीत आणलेल्या सामाजिक सुधारणाही विसरता येणार नाहीत. अद्वितीय म्हणावे असे योगदान होते ते डॉ. श्रीपाद टिळक यांचे. लोकमान्य टिळकांचे डॉ. श्रीपाद हे सुपुत्र. श्रीपादरावांनी अस्पृश्यांना समान हक्क मिळवून देण्याचे काम केले. त्यासाठी, डॉ. आंबेडकरांनी स्थापलेल्या समाज समता संघाचे कार्यालय डॉ. श्रीपाद टिळक यांनी आपल्या राहत्या घरात- गायकवाड वाडय़ात- सुरू केले. या कार्यालयाचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांनी केले होते आणि त्या रात्रीच्या भोजन समारंभात अनेकांचा सहभाग होता. डॉ. श्रीपाद टिळक यांचा सक्रिय सहभाग पुण्याच्या पर्वती मंदिरप्रवेशासाठी करावे लागलेल्या आंदोलनात होता. त्या वेळच्या सनातन्यांनी आणि आप्तस्वकीयांनीही त्यांना त्रास देणे आरंभले, त्यामुळे अखेर डॉ. श्रीपाद टिळक यांनी आत्महत्या केली. त्या कठीण काळातही डॉ. श्रीपाद टिळकांच्या पाठीशी उभे राहणारे प्रबोधनकार ठाकरे हेही समाजसुधारक होते. बापूसाहेब (गो. नी.) सहस्रबुद्धे यांचा पुढाकार १९२७ साली महाडमध्ये झालेल्या परिषदेमध्ये मनुस्मृती-दहन करण्यात होता.

विसाव्या शतकात किसन फागुजी बनसोड, शिवबा जानोबा कांबळे, भाऊसाहेब मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारक समानतेसाठी सिद्ध झाले. पर्वती मंदिरप्रवेशासाठी पुण्यात सप्टेंबर १९२९ मध्ये झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शिवबा कांबळे यांनी केले होते. डॉ. आंबेडकरांना शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, पंजाबराव देशमुख आणि डॉ. श्रीपाद टिळक अशा अनेकांचा पाठिंबा १९२० ते १९५६ या काळात वेळोवेळी मिळाला आणि महाराष्ट्रात जातिअंताची चळवळ जोमाने वाढली. डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रातील या जातिअंतक चळवळीचा वारसा भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केला, असे म्हणता येईल. कारण आपली राज्यघटना समानता मानते. ही राज्यघटना भेदाभेद अमान्य करते, अस्पृश्यता हा गुन्हा मानते आणि स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार करते. ‘महाराष्ट्रातील जातिअंतक चळवळीचा वारसा राज्यघटनेत’ असे म्हणताना महत्त्वाचे ठरते, ते शाहू महाराजांनी १९०२ सालात आणलेले आणि सयाजीराव गायकवाडांनीही अंगीकारलेले राखीव जागांचे धोरण. आंबेडकरांनी पुढे, १९५० च्या राज्यघटनेत शिक्षण व नोकरीच्या संधींमध्ये राखीव जागांचा पुरस्कार केला.

महाराष्ट्रातील समाजसुधारणांची, अस्पृश्यताविरोधाच्या आणि जातिअंताच्या चळवळीची परंपरा ही सर्व समाजघटकांतून आलेली आहे.. ही चळवळ महाराष्ट्रातील ब्राह्मणांची, मराठय़ांची, कुणब्यांची आणि माळ्यांची, अस्पृश्यांची आणि आदिवासींचीही आहे. या उज्ज्वल परंपरेतून आपण आजही धडे शिकू शकतो. स्वत: अस्पृश्य नसलेल्या अनेकांनी जातिव्यवस्थेवर टीका करून ती नाकारली. पिढय़ान्पिढय़ा, शतकानुशतके चालत आलेली जातिभेदांची परंपरा नाकारण्याचे धाडस दाखवून, जातिभेद निर्मूलनाचे सकारात्मक पाऊल त्यांनी उचलले. ज्यांच्या हाती काही सत्ता होती, अशा शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यताबंदीला तसेच राखीव जागांना कायद्याचे कवच दिले आणि सामाजिक विकासाच्या धोरणांचा पाया रोवला. इतर अनेकांनी शिक्षणाचा तसेच समान हक्कांचा प्रसार करण्याचे काम केले आणि अस्पृश्य, मागासवर्गीय, स्त्रिया यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचविले.

आज मात्र जातिव्यवस्था आणि जातिभेदांकडे, त्यातून येणाऱ्या जातीजातींच्या अस्मितांकडे आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पाहण्याच्या इच्छेची कमतरताच दिसून येते. जातीय अस्मितांमुळे जातिभेदच वाढतात, हे आपण जणू विसरून गेलो आहोत. जातिभेदाच्या जुनाट रूढी-परंपरा कायम राहिल्यास समाज दुभंगतो आणि हिंसाचारही वाढतो. तरीही काही जण अस्मितांच्या आगीशी घातक खेळ खेळत आहेत. तुकाराम, नामदेव.. अगदी गाडगेबाबांचीही देवळे आज उभारली गेली आहेत, पण त्यांनी शिकवण मात्र आपणच गोठवून, थिजवून टाकलेली दिसते. ती समानतेची, बंधुभावाची शिकवण आजच्या समाजाच्या पुनर्बाधणीसाठी अमलात आणायची, तर त्यासाठी संवाद सुरू झाला पाहिजे, सर्व बाजूंनी आपापल्या आगळिका खुल्या मनाने मान्य केल्या पाहिजेत आणि समाजरचनेतील विषमता मोडून काढण्यासाठी सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत. समाजात एकात्मता असेल तर राष्ट्र बलवान होते, हे आपण लक्षात ठेवायलाच हवे.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुप्रतिष्ठ प्राध्यापक, तसेच ‘असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी’चे अध्यक्ष आहेत.

thoratsukhadeo@yahoo.co.in