|| सुखदेव थोरात

बुद्ध धम्माने ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ला मोठे आव्हान दिले. पुढल्या काळात भक्ती चळवळीनेही असेच आव्हान दिले. त्यास उत्तर म्हणून ‘समावेशन’ आणि ‘त्यांच्यासारखेच दिसणे’ या दोन क्लृप्त्या धर्म टिकवण्यासाठी वापरण्यात आल्या हे खरे, पण उच्चनीचतेचा मूळ गाभा कायम राहिला. सुधारकांना देवत्व देणाऱ्या धर्मानेच त्यांची समानतावादी शिकवण नाकारली..

महाराष्ट्रात समाजसुधारकांचे प्रयत्न इतके झाले आहेत, तरीही समान हक्कांवर आधारलेल्या समाजरचनेतून कथित ‘खालच्या जातीं’ना वगळलेच गेल्याचे दिसते. नामदेवांपासून म्हणजे सन १२७० पासून ते आंबेडकरांच्या काळापर्यंत, १९५६ पर्यंत सुमारे ७०० वष्रे हे प्रयत्न निरंतर सुरू होते, तरीही समान हक्काधारित समाजरचना काही समाजगटांपासून दूरच राहिली. अनेक विद्वानांचे म्हणणे असे की, अन्य कारणांबरोबरच जातिव्यवस्था पुन्हा बळकट करण्यासाठी ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ने ज्या युक्त्या-प्रयुक्त्या वापरल्या, त्यांचाही महत्त्वाचा वाटा असे होण्यात आहे. या दृष्टीने ‘वेदिक ब्राह्मिनिझम’चे पुनरुज्जीवन कसे झाले याच्या कारणांचा शोध घेतानाच बुद्धकाळात आणि मध्ययुगात वेदिक ब्राह्मिनिझमने कोणत्या क्लृप्त्या वापरल्या, याकडे पाहणे सयुक्तिक ठरेल. (‘ब्राह्मिनिझम’, ‘बुद्धिझम’ आणि ‘हिंदुइझम’ ही तीन निरनिराळी धार्मिक-सामाजिक तत्त्वज्ञाने असल्याचे अभ्यासकांचे मत असून हे शब्द इथे यापुढे जसेच्या तसेच इंग्रजीत वापरले जातील)

वेदिक ब्राह्मिनिझमच्या धार्मिक-सामाजिक तत्त्वज्ञानाला (म्हणजे जातिव्यवस्थेला) पहिले मोठे आव्हान इसवी सनपूर्व सहाव्या शतकात, बुद्धिझमकडून मिळाले. अशोकाच्या कालखंडात भारतभूमीचा दोनतृतीयांश भाग बुद्धिझमने व्यापला होता. या बुद्धिझमच्या प्रसाराचा परिणाम म्हणून किंवा त्या प्रसाराला उत्तर म्हणून वेदिक धर्म आणि समाजरचना यांत काही सुधारणा झाल्या, याचे पुरावे तज्ज्ञांनी शोधलेले आहेत. धार्मिक क्षेत्रात या सुधारणांचा परिणाम म्हणजे पशुबळी देण्यासह अन्य कर्मकांडे कमी झाली आणि पुजारी वा पुरोहितांचे महत्त्वही खालावले. सामाजिक क्षेत्रातील परिणाम म्हणजे, बुद्धिझमच्या समानतेच्या शिकवणीमुळे जातीपातींचा पगडा कमी झाला. अशा वेळी वेदिक ब्राह्मिनिझमने पुनरुज्जीवनासाठी ‘सामावून घेण्या’ची आणि ‘सारखेच दिसण्या’ची खेळी केली. बुद्धिझमवर एकीकडे टीका करतानाच, बुद्धिझमची काही वैशिष्टय़े ब्राह्मिनिझमने स्वत:त सामावून घेतली.

समाजातील मोठा वर्ग ब्राह्मिनिझमचा त्याग करून बुद्धिझमकडे वळत होता, त्यांना परत जिंकून घेण्यासाठी हे केले गेले. बुद्धिझमची वैशिष्टय़े ब्राह्मिनिझमने सामावून घेतल्याची उदाहरणे अनेक आहेत, पण दोन उदाहरणे मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरावीत. यज्ञासारख्या धार्मिक कर्मकांडांमध्ये प्राण्यांचे बळी दिले जात, त्याबद्दल लोकांमध्ये नापसंती व नाराजी वाढत होती. बुद्धांनी अिहसेचा मार्ग दाखविला होता आणि म्हणून हे लोक ब्राह्मिनिझमकडून बुद्धिझमकडे वळत होते. या लोकांना परत ब्राह्मिनिझममध्ये आणण्यासाठी बुद्धिझम आणि जैनिझमचे अिहसेचे तत्त्व ब्राह्मिनिझमने स्वीकारले आणि गाईंची हत्या (गोमेध किंवा यज्ञात गाई बळी देणे) निषिद्ध मानून, शाकाहाराचाही स्वीकार ब्राह्मिनिझमने केला. बुद्धिझमचे दुसरे वैशिष्टय़ ब्राह्मिनिझमने सामावून घेतले, ते म्हणजे संन्यास. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, संन्यासमार्ग हा काही वेदिक ब्राह्मिनिझममध्ये आढळत नाही. स्वामी विवेकानंदांच्या मते, भिख्खू होण्याची संकल्पना (संन्यासी होणे) आणि त्यांचे विहार  ही संकल्पना म्हणजे ‘बुद्धिझमने जगाला दिलेली देणगी’ आहे. ब्राह्मिनिझममध्ये गृहस्थाश्रमाला महत्त्व देऊन पुत्रपौत्र वाढविणे आणि संपत्तीचा संचय करणे हे आदर्श मानले गेले. तर बुद्धिझमने स्वार्थहीन संन्यासमार्ग (भिख्खू किंवा भिख्खुणी होणे) आदर्श मानून सर्व भौतिक गोष्टींचा मोह सोडण्याला महत्त्व दिले. या मार्गावर जाणाऱ्या लोकांना परत आणण्यासाठी वेदिक ब्राह्मिनिझमने ‘संन्यासाश्रम’ हा हिंदू जीवनचक्रातील चौथा आश्रम मानण्यास सुरुवात केली. मूलत: वेदिक ब्राह्मिनिझमच्या धार्मिक तत्त्वज्ञानात तीनच आश्रम होते. मंदिरांची उभारणी, प्रतिमाभक्ती आणि योगसाधना यांसारख्या अन्य गोष्टीही बुद्धिस्ट आणि जैन धर्माकडून वेदिक ब्राह्मिनिझमने सामावून घेतल्या. बुद्धिस्ट विहारांमध्ये आदरणीय म्हणून बुद्धांच्या प्रतिमेला स्थान दिले जाई, पण ब्राह्मिनिझमने पुजाऱ्यांचे आणि कर्मकांडांचे महत्त्व वाढविणारी जागा म्हणून मंदिरे उभारली.

या प्रकारे बुद्धिस्टांच्या तात्त्विक, नतिक आणि सामाजिक संकल्पना सामावून घेताना, त्या आपल्याकडेही आहेत असे भासविण्याचा प्रयत्न ब्राह्मिनिझमने केला. बुद्धाला ‘विष्णूचा अवतार’ मानण्याचा प्रकार हा तर सामावून घेण्याच्या   प्रक्रियेचा उच्चांक होता. वेदिक ब्राह्मिनिझमची सद्दी टिकून राहावी, यासाठी या खेळी होत्या. महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेत ब्राह्मिनिझम जरी थोडाफार बदलल्यासारखा दिसत असेल, तरीही वेदिक ब्राह्मिनिझमचा गाभा- कर्मकांड आणि फक्त विशिष्ट व्यक्तींनाच (पुजारी वा पुरोहितांना) ही कर्मकांडे करण्याचा अधिकार- कायम ठेवण्यात आला. कालांतराने, कथित ‘उच्च’ जातींचे विशेषाधिकार आणि त्यांना मिळणारे लाभ कायम ठेवण्यासाठी जातिव्यवस्था आणखी बळकट करण्यात आली. बुद्धिस्ट धर्मव्यवस्थेला अशा निवडकपणे आणि भासमानपणे सामावून घेण्याचा ब्राह्मिनिझमचा यशस्वी प्रयत्न, हे भारतातून बौद्ध धम्माची पीछेहाट होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, असे काही अभ्यासक मानतात. ब्राह्मिनिझमने बुद्धिझमचे महत्त्व संपविण्याच्या या प्रकाराचे स्वामी विवेकानंदांनी केलेले वर्णन ‘जीवघेणी मत्रीपूर्ण मिठी’ असे केले.

समावेशन आणि भासमान सारखेपणाचा स्वीकार करण्याची हीच खेळी पुढे मध्ययुगात, जेव्हा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीने ब्राह्मिनिझमला नवे आव्हान दिले तेव्हादेखील वापरली गेली. धार्मिक आणि सामाजिक पातळीवर सर्व जाती समान आहेत, स्त्री-पुरुष समान आहेत, आपण सारे बंधुभावाने राहू आणि वागू, अशी भक्ती चळवळीची शिकवण होती. अंधश्रद्धा, कर्मकांडे, हिंसा आणि आíथक शोषण यांना या चळवळीचा विरोध होता. आचरणात समानता असली पाहिजे, यावर भर देणारी ही भक्ती चळवळ समाजात बदल घडवू पाहात होती, सामाजिक समानता आणू पाहात होती. महाराष्ट्रातील वेदिक ब्राह्मिनिझमने पुन्हा तीच खेळी केली : भक्ती चळवळीतील सुधारकांना ‘संत’ म्हणून त्यांचे देव्हारे उभारण्यात आले, पण त्यांची शिकवण मात्र स्वीकारली गेली नाही. बुद्धाला ज्यांनी ‘विष्णूचा अवतार’ मानले, त्यांनीच महाराष्ट्रात संतांना देवासारखे मानले आणि या संतांची देवळेही उभारली. ज्यांचे विचार वाचावेत, आचरणात आणावेत अशा नामदेव, तुकाराम, इतकेच नव्हे तर गाडगेबाबा आणि संत तुकडोजींनाही देव्हाऱ्यात बसवले गेले. समानता, प्रेम आणि बंधुभावाची या संतांनी दिलेली शिकवण जणू देव्हाऱ्यातच गोठवून टाकण्यात आली, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ती शिकवण लांबच ठेवली गेली. पूजेचे उपचार अथवा कर्मकांडे आणि पुजाऱ्यांना महत्त्व या साऱ्याला ज्या सुधारकांनी विरोध केला होता, त्यांचीच देवळे बांधून त्या देवळांमध्ये पूजा, आरती, पुजारी, कर्मकांड हे सारे सुरू ठेवण्यात आले. संत म्हणून स्वीकार करायचा आणि याच संतांची शिकवण मात्र दूर लोटायची असा प्रकार या सुधारकांचा काही परिणामच होऊ नये, या हेतूने करण्यात आला. पुन्हा इथेही मूर्तीपुढे शरण जाणे, कर्मकांडे, पुजारी हे ब्राह्मिनिझमचे पहिले वैशिष्टय़ आणि जातिभेदांची व्यवस्था हे दुसरे वैशिष्टय़, अशी दोन्ही वैशिष्टय़े कायमच राहिली.

आजच्या काळात हा असाच प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत होऊ लागलेला आहे. वेदिक ब्राह्मिनिझम आणि त्यातील जातिव्यवस्था झिडकारून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी ज्यांच्याविरुद्ध बंड केले आणि ज्यांच्याविरुद्ध सामाजिक लढा उभारला, तेच आता डॉ. आंबेडकरांचे गोडवे गाऊ लागलेले पाहणे हे दलितांसाठी आणि इतरांसाठी आश्चर्यकारकच आहे. जी खेळी बुद्धकाळात आणि मध्ययुगात ब्राह्मिनिझमच्या वर्चस्वासाठी करण्यात आली, तिचीच चाहूल आजही लागते आहे : डॉ. आंबेडकर महान होते असे म्हणायचे, त्यांचे व बुद्धाचे विचार पुढे करायचे आणि त्याच वेळी त्यांच्या शिकवणीच्या विपरीत अनुसरण करायचे. ही नीती म्हणा, खेळी म्हणा किंवा ‘जीवघेणी मत्रीपूर्ण मिठी मारणे’ म्हणा, या कृतीचा हेतू हा शिकवण नाकारण्याचा आहे.

‘समावेशना’मागच्या कुटिल हेतूविषयीचा हा आरोप निराधार नाही, हे आपल्याला बुद्ध हा ‘अवतार’ मानून बुद्धिस्ट शिकवण फेकून देण्याच्या ‘समावेशन’ खेळीतून समजेल आणि मध्ययुगापासूनच्या संतांचा सामाजिक परिणाम नष्ट करून टाकण्याच्या खेळीतूनही उमगेल. हे सारे, जातिव्यवस्था आजतागायत अबाधित राखण्यासाठीच होते असे इतिहास सांगतो. या इतिहासापासून आपण बोध घ्यायचा तो असा की, समानतेची, बंधुत्वाची आणि स्वातंत्र्याची शिकवण केवळ गाथांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये बंद राहून चालणार नाही. ही शिकवण जर आचरणात आणली, तरच जातिव्यवस्थेने बरबटलेला समाज बदलू लागेल आणि नवे सामाजिक संबंध आकाराला येतील.

पुढल्या लेखात आपण अलीकडेच ‘हिंदू राष्ट्रा’च्या व्याख्येत आणि वर्णनात जे बदल करण्यात आले आहेत, त्याविषयीची चर्चा करू.

thoratsukhadeo@yahoo.co.in

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुप्रतिष्ठ प्राध्यापक, तसेच ‘असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी’चे अध्यक्ष आहेत.)