31 May 2020

News Flash

परदेशातील शिक्षण आणि नियम

परदेशात खास करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या नियमांची आणि शिष्यवृत्तीची माहिती.

परदेशात खास करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या नियमांची आणि शिष्यवृत्तीची माहिती.
इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, जर्मनी यांसारख्या प्रगत देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालये यांचे मोठय़ा प्रमाणावर आकर्षण भारतीय विद्यार्थ्यांना असते. इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेच्या एका अहवालानुसार सध्या भारतातील विविध राज्यांतून १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये ‘स्टेम’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ७७ टक्क्यांच्या आसपास आहे. स्टेम अभ्यासक्रमामध्ये सायन्स (विज्ञान), टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान), इंजिनीअिरग (अभियांत्रिकी) आणि मॅथेमॅटिक्स (गणित) यांचा समावेश होतो.
अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे की, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयांचा समावेश असलेल्या स्टेम विषयांचा कठीण अभ्यासक्रम करणे बऱ्याच अमेरिकन विद्यार्थ्यांना झेपत नाही वा या विषयांच्या अभ्यासासाठी झोकून देणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे स्टेम विषयातील बुद्धिमान व परिश्रमी विद्यार्थ्यांची गरज अमेरिकेला सतत भासत असते. ही गरज भारतीय विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर भागवत असतात. यामुळेही मोठय़ा संख्येने भारतीय विद्यार्थी ‘स्टेम’ अभ्यासक्रमांना पहिली पसंती देतात.
अमेरिकेतील सुरक्षा उच्च कोटीची असल्याने व अनेक शैक्षणिक संस्था या सुरक्षित वातावरणात कार्यरत असल्याने अनेक परदेशी विद्यार्थी आकर्षति होत असतात. इंग्लंडमधील व्हिसाच्या नियमांच्या तुलनेत अमेरिकेतील व्हिसाचे नियम लवचीक आहेत. या देशात इतर युरोपियन देशांपेक्षा रोजगाराच्या संधीही अधिक आहेत. अनेक भारतीय अमेरिकेत स्थायिक झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांना घरगुती वातावरणासारखे वाटत असते. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा अमेरिकेकडे अधिक असतो.
अमेरिकेतील शिक्षण संस्थांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी अशा शिक्षण संस्थांची वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त केल्याशिवाय प्रवेशासाठी विचार करणे घातक ठरू शकते, असे अनेक अभ्यासकांचे सांगणे आहे. ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी संशयास्पद वा दुय्यम वा तिय्यम श्रेणीच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला असेल त्यांना बाहेर घालवण्यात आले आहे.

ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग-
अमेरिकन होमलँड सिक्युरिटी विभागाच्या नव्या नियमानुसार ‘स्टेम’ पदवी अभ्यासक्रमांना अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग या सुविधेंतर्गत अधिक कालावधी व्यतीत करू शकतात. अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये ‘स्टेम’ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर साधारणत: एक वर्षांपर्यंत ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग करण्याची सुविधा उपलब्ध होती. पुढे यात आणखी १७ महिनेपर्यंत वाढ मिळत असे. १० मेपासून अस्तित्वात आलेल्या नियमानुसार ही वाढ २४ महिन्यांपर्यंत मिळू शकते.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी पदवी मिळवल्यानंतर अमेरिकेत त्याचा विद्यार्थी म्हणून असलेला दर्जा संपतो. विद्यार्थ्यांकडे आवश्यक व्हिसा असूनही भागत नाही. मात्र आता त्यास ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुविधेमुळे अधिक काळ अमेरिकेत राहता येते. ही सुविधा संपल्यावर अमेरिकेत राहण्यासाठी एच-वन-बी या प्रकारातील व्हिसाची गरज भासते. अमेरिकेत सुयोग्य नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुविधेच्या कालावधीत करण्यात आलेल्या वाढीचा फायदा होऊ शकतो. अशी नोकरी या कालावधीत मिळवता आली तर तो एच-वन-बी व्हिसासाठी पात्र ठरू शकतो. या व्हिसामुळे परदेशी व्यक्तींना अमेरिकन कंपन्या तात्पुरत्या स्वरूपात स्पेशलाइज्ड क्षेत्रात नोकरी देऊ शकतात.
‘स्टेम’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अमेरिकेतील कंपन्यांमध्ये मनाजोगती नोकरी मिळवणे हे एक महत्त्वाचे ध्येय असते. ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुविधेमध्ये केलेल्या नव्या बदलांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळण्याची अपेक्षा ठेवूनच भारत व परदेशांतील विद्यार्थी अमेरिकेतील शिक्षणासाठी गुंतवणूक करण्यास तयार होतात. यातूनच सुंदर पिचाई (गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्यासारख्या भारतीयांना उच्चपदी कार्यरत होण्याची संधी मिळू शकली.
इंग्लंडमध्ये ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटताना दिसते. मात्र अमेरिकेतील अशा सुविधेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांत अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुविधेमुळे वैविध्यपूर्ण काम करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्वरूपाचा आवाका प्राप्त होतो. या सुविधेचा कालावधी वाढवल्याने अशी संधी शोधून ती हस्तगत करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे शक्य होऊ शकते. नव्या नियमानुसार वाढवलेल्या कालावधीत उमेदवार इलेक्ट्रॉनिकली प्रमाणित केलेल्या कंपनीकडेच नोकरी वा काम करू शकतो. परदेशी उमेदवारांना नोकरी देताना अमेरिकन उमेदवार डावलले नाहीत ही बाब संबंधित कंपनीस घोषित करावी लागेल. शिवाय नोकरीच्या वार्षकि कामगिरीचा अहवालही सादर करावा लागेल. संबंधित उमेदवार अपेक्षेनुसार कामगिरी करत नसेल तर नव्या नियमानुसार त्यास नोकरीपासून वंचित राहावे लागू शकते. उमेदवाराने ज्या विषयात अभ्यास केला असेल त्याच क्षेत्रात त्याने काम करणे अपेक्षित आहे.‘स्टेम’ विषयात अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार सेवा क्षेत्रात काम करू शकत नाहीत.

चारपॅक स्कॉलरशिप :
चारपॅक स्कॉलरशिप योजना भारतातील फ्रान्सच्या दूतावासामार्फत राबवण्यात येते. यामध्ये पुढील प्रकारे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. =रीसर्च इंटर्नशिप प्रोग्रॅम- फ्रान्समधील प्रयोगशाळा किंवा संस्थांमध्ये जे विद्यार्थी अर्थशास्त्र, अभियांत्रिकी व विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील इंटर्नशिप करू इच्छितात त्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. कालावधी- मे ते जुल =एक्स्चेंज प्रोग्रॅम- पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो. ही योजना जानेवारी ते जून आणि सप्टेंबर ते डिसेंबर अशा कालावधीसाठी राबवली जाते. हा कालावधी एक ते चार महिन्यांपर्यंत राहू शकतो. या योजनेचा लाभ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. =मास्टर्स प्रोग्रॅम- फ्रान्समध्ये एक ते दोन वष्रे कालावधीच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. निवड प्रक्रिया- शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यातील सातत्य, स्टेटमेंट ऑफ परपज (हेतूपत्र) ची गुणवत्ता या बाबी लक्षात घेतल्या जातात. स्टेटमेंट ऑफ परपज हे स्वत:चे (अस्सल) असावे. फ्रेंच भाषेचे ज्ञान असल्यास निवडीत प्राधान्य मिळू शकते. या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी व्हिसा फी सूट, मासिक पाठय़वेतन (याचा कालावधी आणि रक्कम अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी राहू शकते.) वैद्यकीय विमा, परवडणाऱ्या निवासस्थानाची हमी. संपर्क- १) कॅम्पस फ्रान्स- अलायंस फ्रँकैस (francaise) दे बॉम्बे, थिऑसॉफी हॉल, ४०, न्यू मरिन लाइन्स, मुंबई-४०००२०, ई-मेल – mumbai@india-campusfrance.org २) कलाछाया कॅम्पस, २७० डी पत्रकार नगर ,सेनापती बापट रोड, विखेपाटील शाळेच्या विरुद्ध दिशेला, पुणे- ४११०१६, ई-मेल- pune@india-campusfrance.org, , संकेतस्थळ- http://www.inde.campusfrance.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 5:12 am

Web Title: foreign education and law
Next Stories
1 नवे अभ्यासक्रम, नव्या संधी
2 योग साधनेतील अभ्यासक्रम
3 सिनेछायाचित्रणासाठी संधी
Just Now!
X