इंधनाच्या दरांचं अलीकडे भांडवली बाजाराच्या निर्देशांकासारखं झालंय. कधी हे दर कमी असतात तर कधी एकदम उसळी घेतात. दर पंधरा दिवसांनी आपल्या देशांतर्गत तेलउत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची उपलब्धता आणि त्याचा दर यांचा आढावा घेऊन मग आपल्याकडील दरांत चढ-उतार करत असतात. पेट्रोल आणि डिझेल यापकी नेमकी कोणती गाडी योग्य, याविषयी वाद असला तरी तुमचं रिनग जास्त असेल तर तज्ज्ञ तुम्हाला डिझेलवर चालणारी गाडी घेण्याचाच सल्ला देतात. डिझेलवर चालणाऱ्या आणि परवडू शकणाऱ्या गाडय़ांची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत..

हल्ली गाडी घेताना तिच्या किमतीबरोबरच ती कमीतकमी इंधनात जास्तीतजास्त मायलेज देऊ शकते का, तिचा मेन्टेनन्सचा खर्चही जास्त नाही ना, वगरे मुद्दे ग्राहक विचारात घेत असतो. या पाश्र्वभूमीवर आता कारउत्पादकही जास्त ताकदीच्या इंजिनांची निर्मिती करू लागले आहेत. गाडीची इंधनस्नेही क्षमता वाढविण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातो. मारुती सुझुकीने असे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्याचे नाव स्मार्ट हायब्रीड व्हेइकल बाय सुझुकी (एसएचव्हीएस) असे हे. हे एसएचव्हीएस तंत्रज्ञान मारुतीच्या ज्या गाडय़ांमध्ये आहे, त्या गाडय़ांची इंधनस्नेही क्षमता आणि ब्रेकिंग पद्धती उच्च दर्जाची असल्याचे आढळून आले आहे. अशाच काही सर्वोत्तम डिझेल गाडय़ांची आम्ही येथे ओळख करून देणार आहोत.

मारुती सुझुकी सेलेरिओ :

मारुती सुझुकी सेलेरिओ ही मारुतीची सगळ्यात स्वस्त अशी डिझेल हॅचबॅक आहे. आणि हिचा मायलेज २७.६३ किमी प्रतिलिटर एवढा असल्याचा कंपनीचा दावा आहे. सेलेरिओ डिझेलची किंमत चार लाख ८१ हजार ते पाच लाख ९० हजार रुपयांदरम्यान आहे. या गाडीला ७९३ सीसी क्षमतेचे डीडीआयएस इंजिन असून पाच मॅन्युअल गीअर सेलेरिओमध्ये आहेत.

मारुती सुझुकी सिआझ :

मारुतीने २०१४च्या ऑटो एक्स्पोमध्ये सिआझ प्रदर्शनासाठी ठेवली आणि २०१५ मध्ये भारतात लाँचही केली. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. डिझेल प्रकारातल्या सिआझमध्ये माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञान आहे. मारुती सुझुकी सिआझ एसएचव्हीएस डिझेल या व्हेरिएन्टची किंमत सात लाख ७३ हजार ते नऊ लाख ५४ हजार यांदरम्यान आहे. या गाडीचा मायलेज २८ किमी प्रतिलिटर एवढा आहे. १.३ लिटर डीडीआयएस इंजिन असलेल्या या सिआझमध्ये पाच मॅन्युअल गीअर्स आहेत. ही गाडी होंडा सिटी, हय़ुंडाई व्हेरना, निसान सनी, फियाट लिनिया आणि फोक्सवॅगन व्हेंटो या गाडय़ांशी स्पर्धा करते.

होंडा जॅझ :

जॅझ ही होंडाची सर्वात उत्तम गाडी. जॅझला नव्या रूपात २०१५ साली भारतात सादर केले गेले. सध्या डिझेल व्हेरिएन्टमध्येही जॅझ उपलब्ध आहे. जॅझला १.५ लिटर क्षमतेचे आय-डिटेक हे इंजिन जोडण्यात आले असून चार सििलडर डिझेल इंजिन असलेल्या या गाडीचा टॉर्क २०० एनएम एवढा आहे. होंडाच्या इतर गाडय़ांपेक्षा जॅझमध्ये सहा गीअर देण्यात आले आहेत. डिझेल जॅझ आपल्याला २७.३० किमी मायलेज देते. या गाडीची लांबी तीन हजार ९५५ मिमी असून उंची १५९४ मिमी एवढी आहे. तर रुंदी १६९४ मिमी एवढी आहे. हिचा व्हेलबेस २५३०मिमी आहे. जॅझ आतूनही प्रशस्त कार आहे. या गाडीची किंमत सव्वासात लाख ते नऊ लाख रुपये एवढी आहे. जॅझ डिझेल मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे.

फोर्ड फिगो आणि फोर्ड अस्पायर :

डिझेल गाडय़ांमध्ये सर्वात कमी मायलेज देणाऱ्या गाडय़ांत फिगो आणि अस्पायरची गणना होते. मात्र, असे असले तरी त्यांचे टॉर्क आणि ताकदवान इंजिन या दोन्ही बाबी ही उणीव भरून काढतात. दोन्ही गाडय़ांचा मायलेज २५.८३ किमी प्रतिलिटर एवढा आहे. फिगो आणि अस्पायरच्या मॉडेल्समध्ये नियमानुसार आता ड्रायव्हर एअरबॅग्ज उपलब्ध आहेत. याशिवाय या दोन्ही गाडय़ांच्या टॉप एण्ड मॉडेल्समध्ये कीलेस एन्ट्री, फोर्ड मायकी, प्रवासी तसेच आजूबाजूला कर्टन एअरबॅग्ज आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. पाच गीअर या गाडय़ांना आहेत.

टाटा टियागो :

टाटांच्या टियागोने गेल्या वर्षी बरीच लोकप्रियता मिळवली. दणकट इंजिन, मायलेज जास्त आणि मेन्टेनन्स कमी यांमुळे ही गाडी भाव खाऊन गेली. त्यामुळे गेल्या वर्षीच लाँच झालेल्या टियागोला अनेकांनी पसंती दिली आणि अजूनही तिची लोकप्रियता टिकून आहे. हिचे रिव्होटॉर्क डिझेल इंजिन दणकट असून टियागो डिझेल तुम्हाला २७.२८ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. ग्रँड आय १० आणि सेलेरिओ यांना स्पर्धा करणारी टियागो तीन लाख ९४ हजारांपासून ते पाच लाख ७१ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी बलेनो :

मारुती सुझुकी बलेनो ही यंदाची सर्वोत्कृष्ट प्रीमियम हॅचबॅक आहे. बलेनो डिझेल व्हेरिएन्टला १२४८ सीसी क्षमतेचे इंजिन आहे. या गाडीला पाच मॅन्युअल गीअर असून तिचा मायलेज २७ किमी प्रतिलिटर एवढा आहे. बलेनोचा पत्रा हलका असला तरी इंजिन दणकट असल्याने वेगात असताना ती रस्ता सोडत नाही. तसेच स्टर्डीनेस तिला खूप आहे. त्यामुळे बलेनो अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे.

होंडा सिटी :

होंडा सिटी डिझेल ही होंडाची सर्वात किफायतशीर गाडी आहे. हिचा मायलेज २६ किमी प्रतिलिटर एवढा असल्याचा कंपनीचा दावा आहे. होंडा सिटीच्या डिझेल व्हेरिएन्ट्सची किंमत नऊ लाख ४४ हजार रुपयांपासून १२ लाख ५४ हजार रुपयांपर्यंत आहे. १.५ लिटर क्षमतेचे हिचे डिझेल इंजिन प्रचंड ऊर्जा निर्माण करते. हिला सहा गीअर्स आहेत.

सर्व किमती एक्स शोरूम आहेत..