आलिशान गाडीत बसून लाँग ड्राइव्हला जायचं स्वप्न प्रत्येक कारप्रेमी बघत असतो. आणि ही आलिशान गाडी मर्सडिीज, बीएमडब्ल्यू वा ऑडी असेल तर मग बघायलाच नको. हा प्रवास असाच सुरू राहावा, तो कधी संपूच नये, असं वाटत राहातं. नव्या रूपात दाखल झालेली ऑडी ए३ ही सेडान प्रकारातली गाडी अगदी अस्साच अनुभव देते..

जर्मन कारनिर्मात्यांनी लक्झरी कारची सवय लोकांना लावली आहे. मर्सडिीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, फोक्सवॅगन, पोर्श ही त्यातली अगदी परिचयातली आणि सर्वाना आकर्षण असलेली नावं. अगदी स्टेट्स सिम्बॉलच. या नावांभोवतीचं वलयच एवढं आहे की मर्सडिीज, बीएमडब्ल्यू वा ऑडी यांपकी कोणतंही मॉडेल तुमच्याकडे असलं तरी तो चच्रेचा विषय ठरतो. असो. मुद्दा असा आहे की अलीकडेच ऑडीने त्यांच्या ए३ला नव्या रूपात सादर केलं आहे. सेडान प्रकारातली ए३ आणखी आकर्षक रूपात बाजारात दाखल झाली आहे. तीन वर्षांपूर्वी बाजारात आलेली ए३ आणि आताची ए३ यात बऱ्यापकी फरक आहे. मुख्य फरक म्हणजे हिचे वजन थोडे कमी करण्यात आले आहे. इंजिनातही बदल करण्यात आला आहे.

बाह्यरूप

दिसायला साधी परंतु तितकीच आकर्षक ही ए३ची सगळ्यात जमेची बाजू. तिच्या पूर्वसुरीपेक्षा नवी ए३ मात्र थोडी उजवी आहे. कारण यात आता एलईडी हेडलाइट्स जोडून स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. फ्रण्ट ग्रिल अधिक व्यापक करण्यात आले असून त्यावर ऑडीचा प्रख्यात चार बांगडय़ांचा लोगो दिमाखात विराजमान आहे. एखादी गरीब गाय शांतपणे उभी आहे, असंच ए३कडे पाहिल्यावर वाटतं. परंतु गाडी सुरू करताच तिच्यातील ताकदीचा आपल्याला अंदाज येतो. मागच्या बाजूलाही नवीन बम्पर देण्यात आले असून  एलईडी टेललॅम्प आहेत. १६ इंचाचे व्हील्स गाडीच्या रूपात भर घालतात. याआधीच्या ए३मध्ये १६ किंवा १७ इंचाचे व्हील्स असे दोन पर्याय होते. मात्र, नव्यात हा पर्याय देण्यात आलेला नाही. चाकांचा आकार लहान झाल्याने टायर्सना अधिक जागा मिळून गाडीच्या वेगात आणखी भर पडली आहे. त्यातच पूर्वीच्या ए३ला लावण्यात आलेल्या पेरिलीच्या टायर्सची जागा नव्या ए३मध्ये ब्रिजस्टोन टायर्सनी घेतली आहे. भारतीय रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन मुद्दामच नव्या ए३मध्ये ब्रिजस्टोनचे टायर बसविण्यात आले आहेत. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्सही उत्तम असल्याने कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरून ए३ चालवताना त्रास जाणवत नाही.

अंतरंग

आतून प्रशस्त असलेली ए३ तितकीच सुखसोयींनी युक्तही आहे. गाडीत लेदरचे सीट्स तर आहेतच शिवाय तुम्हाला  कपहोल्डर्स, पेपरहोल्डर्सची सुविधा देण्यात आली आहे. मागील बाजूच्या सीटवर मधोमध आर्मरेस्टची सुविधाही आहे. शिवाय एका बाजूचे सीट फोल्ड करून बूट स्पेसही देण्यात आला आहे. म्हणजे बूट स्पेसला ती जागा जोडण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक सामान मागच्या बाजूला स्टोअर करता येऊ शकते. डॅशबोर्डमध्ये फारसा बदल करण्यात आला नसला तरी डॅशबोर्डच्या मधोमध एका स्क्रीनची सुविधा देण्यात आली आहे. गाडी सुरू करताच हा स्क्रीन तुमच्या समोर प्रकट होतो. त्यावर सर्व फंक्शन्स देण्यात आले आहेत. रिव्हर्स कॅमेराही त्याला जोडण्यात आला आहे. त्यामुळे गाडी रिव्हर्स घेताना या स्क्रीनच्या साह्याने तुम्ही गाडी पार्क वगरे करू शकता. उच्चशक्तीचे एसी व्हेंट्स, आणि सनरूफ ही अन्य काही अंतरंगातील वैशिष्टय़े. शिवाय अ‍ॅडजस्टेबल सीट्स, वायरलेस चाìजग कबीहोल या सुविधाही नव्या ऑडी ए३ मध्ये आहेत. ड्रायव्हरच्या उंचीनुसार स्टीअिरग सेट करण्याची सुविधाही आहे. सात ऑटो गीअरने युक्त अशी ही नवी कोरी गाडी वेगात धावते. सुरक्षेसाठी एअरबॅग्जही देण्यात आल्या आहेत. परंतु ऑटो स्टार्ट अथवा स्टॉपचे बटन ए३ मध्ये नाही. जे की हल्ली प्रत्येक नव्या गाडीत देण्यात येते. एवढी एक त्रुटी वगळता अंतरंगातून ए३ अगदी आलिशान वाटते आणि कितीही लांबचा प्रवास केला तरी थकवा जाणवत नाही.

इंजिन

डिझेल (टीडीआय) आणि पेट्रोल (टीएफएसआय) अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ए३ उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन १.४ लिटर क्षमतेचे असून टबरेचाज्र्ड आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये सात ऑटो गीअर्स आहेत तर डिझेल व्हर्जनमध्ये सहा ऑटो गीअर आहेत. पेट्रोल व्हर्जनची ए३ १९ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे, आणि तो काही अंशी खराही आहे. मात्र, त्यासाठी एका विशिष्ट लयीत गाडी चालवावी लागते, हे खरे.

किंमत

  • पेट्रोल व्हर्जन: ३० लाख ५० हजार रुपये
  • डिझेल व्हर्जन: ३२ लाख ५० हजार रुपये
  • (किमती एक्स शोरूम आहेत)

vinay.upasani@expressindia.com