वाढते पेट्रोल, महागाई यांच्यामुळे सेमी स्पोर्ट्स लुक, मायलेज चांगले, किंमत रास्त अशा कम्युटर सेगमेंटमधील मोटरसायकलना मागणी आहे; पण त्यातही १०० व ११० सीसीपेक्षा अधिक इंजिन क्षमतेच्या मोटरसायकलला अधिक. त्यामुळे या सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढत आहे. हिरो, होंडा, बजाज ऑटो या कंपन्यांच्या मोटरसायकल या सेगमेंटमध्ये बऱ्याच कालावधीपासून आहेत. प्रत्येक कंपनीने या सेगमेंटमध्ये आपला हिस्सा कायम राखणे व त्याचबरोबर तो वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यासाठी मोटरसायकलमध्ये कॉस्मेटिक फरक असोत वा तांत्रिक पातळीवर म्हणजे नवे इंजिन; पण संपूर्णपणे नवे डिझाईन केलेले मॉडेल लाँच होणे अपवादात्मक ठरले आहे.

हिरो मोटोकॉर्पने या सेगमेंटमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी पूर्ण नवी डिझाईन केलेली १२५ सीसी सेगमेंटमधील आपली आधीची मोटरसायकल या वर्षी लाँच केली आणि ती म्हणजे ग्लॅमर. वस्तुत: ग्लॅमर बाजारपेठेत येऊन दशकाहून अधिक काळ लोटला आहे; पण या मोटरसायकलला स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत १२५ सीसी सेगमेंटमध्ये स्वत:ची छाप सोडता आलेली नाही; पण या वाढत्या सेगमेंटकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे कंपनीला नक्कीच उमजले आहे. त्यामुळे स्प्लेंडर या मोटरसायकलनंतर जयपूर येथील कंपनीच्या संशोधन आणि विकास केंद्रात ग्लॅमर मोटरसायकलची फेररचना करण्यात आली.

इंजिन अन् बरेच काही

पूर्णपणे नव्याने विकसित केलेले १२५ सीसीचे इंजिन ग्लॅमरला बसविण्यात आले असून, त्याची पोझिशनही बदलली आहे. पूर्वीच्या ग्लॅमरला हॉरिझॉन्टलऐवजी व्हर्टिकल स्ट्रोक असणारे इंजिन करण्यात आले आहे. १२५ सीसी इंजिनची पॉवर ११.५ असून, पहिल्या मोटरसायकलच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षा अधिकने वाढ झाली आहे. चालविताना पॉवर वाढल्याचा फरक लक्षात येतो. तसेच, कंपनीने स्प्लेंडरप्रमाणे या मोटरसायकललाही आयथ्रीएस तंत्रज्ञान बसविले आहे. त्यामुळे मायलेजमध्ये फरक पडतो, असा कंपनीचा दावा आहे. मोटरसायकलला डिस्कब्रेचा पर्याय देण्यात आला आहे. १२५ सीसी मोटरसायकल साधारणपणे प्रति लिटर ५० ते ५५ किमी मायलेज देते. कंपनीने फ्यूएल इंजक्शन तंत्रज्ञानाने युक्त ग्लॅमरचे व्हर्जनही उपलब्ध केले आहे; पण यापूर्वीही असे व्हर्जन होते. तसेच, अनेक कंपन्यांनी अशी मॉडेल उपलब्ध केली आहेत; पण फ्यूएल इंजेक्शन तंत्रज्ञान प्रगत असले तरी लोकांना ते उमजलेले नाही. त्यामुळे फ्यूएल इंजेक्शनच्या मोटरसायकल कम्युटर सेगमेंटमध्ये आपल्याकडे प्रचलित नाहीत, असेच म्हणावे लागेल.

काय करावे?

कंपनीने नव्या ग्लॅमरबरोबर आधीचे मॉडेलही विक्रीस ठेवले आहे. मात्र, मोटरसायकलमधील झालेले बदल लक्षात घेता नवी मोटरसायकलच चांगली वाटते. स्टाइल, कम्फर्ट, मायलेज, किंमत यांचा विचार केल्यास ग्लॅमर नक्कीच एक चांगली मोटरसायकल वाटते. पहिल्यापासून हिरोचे चाहते असणाऱ्या व १२५ सीसी मोटरसायकल नक्कीच खुणावू शकते. त्यामुळे हिरोचे चाहते असणाऱ्यांनी नक्कीच या मोटरसायकलची टेस्ट राइड घ्यावी व निर्णय घ्यावा.

डिझाईन

नव्या ग्लॅमर मोटरसायकलमध्ये बरेच काही नवीन आणि मोटरसायकल पाहता क्षणी संशोधन आणि विकास केंद्राने चांगले काम केल्याचे जाणवते. हेडलॅम्प अधिक चांगला डिझायनर झाला असून, तो स्पोर्टी दिसतो. मोटरसायकलची पेट्रोल टाकीची रचना नवी असून, रिअर काऊलला शार्प कट्स दिले आहे. कम्युटर सेगमेंटमधील मोटरसायकलच्या रचनेत सेमी स्पोर्टस लुकचा समतोल साधण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे. मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीची रचना मस्क्यूलर असल्याने स्पोर्टी लुक आवडणाऱ्यांची निराशा होत नाही. मोटरसायकलच्या मूळ कलेबरोबर ग्राफिक्सचा वापर विशेषत: चेकर्ड ग्राफिक्स केलेला वापर सुरेख दिसतो. रायडर पोझिशन चांगली असून, पिलन रायडर पोझिशन वर उचलण्यात आली आहे. तसेच, सीट थोडेसे निमुळते होत गेले आहे. त्यामुळे मागे बसणाऱ्यांना कमी आरामदायी प्रवास वाटू शकतो. तसेच, कंपनीने इनर मडगार्ड दिले आहे. (पावसाळ्यात या गार्डचा उपयोग मागे बसणाऱ्याला नक्कीच कळेल, कारण यामुळे पायावर चिखल उडत नाही.) मात्र, ते फारसे आकर्षक नाही. अर्थात, काहींना ते आवडू शकते. टेल लॅम्प सीटच्या खाली असला तरी एजी आहे. एलईडी ब्रेक लाइटबरोबर दोन लाइट बार दिले असल्याने टेल लाइट आकर्षक वाटतो. एक्झॉस्ट ब्लॅक फिनिशमध्ये दिला असला तरी तो स्पोर्टी वाटत नाही. इन्स्ट्रमेंट क्लटरमध्ये फरक झाला असून, ते सेमी डिजिटल झाले आहे. यामध्ये मायलेज किती मिळाले आहे तसेच ट्रिप व ओडो मीटरसाठी स्विच दिला आहे. नव्या नियमानुसार कंपनीने ऑटो हेडलॅम्प ऑन फीचर दिले आहे. तसेच, टय़ूबलेस टायर्स दिले आहेत.

obhide@gmail.com