20 November 2017

News Flash

अर्ज ‘किआ’ है..

२०१२ मध्ये ह्य़ुंदाई इंडिया मोटर सोडून ते किआ मोटरमध्ये दाखल झाले.

वीरेंद्र तळेगावकर | Updated: August 18, 2017 2:07 AM

वक्त का ये खिलौना

न जाने कहाँ किस्मत जाए

पर हमने है ये माना

देर आये दुरुस्त आये..

एखादी संकल्पना प्रत्यक्षात येण्यास किती वेळ लागू शकतो? त्यासाठी पूरक वातावरण किती कालावधीत तयार होऊ शकते? काही दिवस, काही महिने, काही वर्षे?

२००० च्या दशकात एका कंपनीतील काही उच्चपदस्थ ह्य़ुंदाई मोटर्समध्ये होते. स्पर्धक कंपनीच्या नव्या ध्येयाने ते आकर्षित झाले आणि तेथे रुजूही झाले. मात्र ज्या उद्देशाने ते नव्या कंपनीत दाखल झाले तिचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण होणे शक्य नव्हते. त्याकरिता आवश्यक वातावरणाची कमतरता हे त्यासाठी निमित्त होते. मग काय नव्या कंपनीत राहून अन्य बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले. आणि मग ध्येयपूर्तीकरिता योग्य वातावरण तयार होताच ते पुन्हा झटले आणि आता स्वप्न प्रत्यक्षात आणू पाहू लागले.

याँग किम हे त्यातलेच एक. २०१२ मध्ये ह्य़ुंदाई इंडिया मोटर सोडून ते किआ मोटरमध्ये दाखल झाले. प्रवासी वाहन निर्मिती क्षेत्रातील दोन्ही कंपन्या या कोरियातीलच. जवळपास दोन दशकांच्या ह्य़ुंदाईतील अनुभवाच्या जोरावर किम यांच्याकडे किआच्या भारत शिरकावाची जबाबदारी टाकण्यात आली. मात्र भारतीय (वाहन) ग्राहक जाण असलेल्या किम यांना नेमकी परिस्थिती नसल्याचे जाणवले. नव्या कंपनीलाही त्यांनी तूर्त थांबण्याचा सल्ला दिला. मग काय किम यांच्या मार्गदर्शनाखाली किआ मोटर अन्य देशांवर भर देऊ लागली. कोरिआत तर ती अव्वल आहेच.

किआ मोटर आता भारतात खऱ्या अर्थाने येऊ पाहतेय. तशी जय्यत तयारीही झाली आहे. येथे कोणती आणि कोणत्या गटातील वाहने आणायची हेही तिने ठरविले आहे. कंपनीचा आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे २.३० कोटी चौरस फूट जागेतील प्रकल्पाची पायाभरणी चालू वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होईल. प्रत्यक्ष वाहन निर्मिती २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होईल. याकरिता कंपनी ७,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. वार्षिक ३ लाख वाहन निर्मिती क्षमता असलेल्या या प्रकल्पात ४,००० रोजगारनिर्मिती होईल.

कंपनी अर्थातच सुरुवातीच्या टप्प्यात कॉम्पॅक एसयूव्ही आणि कॉम्पॅक सेदान श्रेणीतील वाहने तयार करणार आहे. अन्य गटातील वाहने व निर्यातीचा कार्यक्रम नंतरच्या टप्प्यात राबवेल, असे किआ मोटर इंडियाचे कार्यकारी संचालक किम स्पष्ट करतात.

भारतीय वाहन निर्मिती बाजारपेठेत एवढय़ा उशिराने दाखल होण्याबाबत किम यांना पश्चात्ताप मुळीच वाटत नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘देर आये दुरुस्त आये’! किम म्हणतात, भारतीय वाहन बाजारपेठेत उतरण्यासाठी काही वर्षांपूर्वी येथे पूरक वातावरण नव्हते. आता भारताकडे एक भक्कम अर्थव्यवस्था म्हणून सारेच जग पाहत आहे. शिवाय येथील सरकारची ध्येयधोरणेही व्यवसायानुकूल असल्याचे जाणवते आहे. २०१५ च्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेने प्रेरित होऊन आणि आंध्र प्रदेशकडून व्यवसायपूरकतेकरिता पुढाकार घेतला गेल्याने आम्ही आता प्रत्यक्ष वाहन निर्मिती व सादरीकरणासाठी सज्ज झालो आहोत. खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आमचे विक्रीजाळेही देशातील प्रमुख १०० शहरांमध्ये विणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

भारत ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी नव्या वाहनांसाठीची बाजारपेठ मानली जाते. २०१६ मध्ये ३३ लाख वाहने येथे तयार झाली. जागतिक स्तरावर भारत याबाबत पाचव्या स्थानावर आहे. बाजारतज्ज्ञांच्या विश्वासानुसार २०२० पर्यंत तो तिसऱ्या स्थानावर येण्याची क्षमता राखून आहे. येत्या पाच वर्षांत वार्षिक ५० लाख वाहने येथे तयार होतील.

१९४४ पासून कोरियात आहे. विविध पाच देशांमध्ये तिचे १४ उत्पादन प्रकल्प आहेत. ३० लाखांहून अधिक वाहने ही कंपनी तयार करते. दक्षिण कोरियात अव्वल असलेल्या किआने अमेरिकी, युरोपिय, जपानी तसेच चिनी वाहन कंपन्यांच्या पंक्तीत स्थान पटकाविले आहेच. कंपनी आता भारतातील प्रवेशाच्या निमित्ताने तिचे दक्षिण पूर्व आशियातील प्रमुख केंद्र म्हणून विस्तार करू पाहत आहे. भविष्यात ते निर्यात हबही ठरू शकते.

किआ मोटरची वाहने डिझाइन आणि इंजिनसाठी अन्य देशांमध्ये मानली जातात. त्याच जोरावर कंपनीने भारतात पाय रोवण्याचे निश्चित केले आहे. कंपनीचे भारतात तयार होणारे कॉम्पॅक एसयूव्ही गटातील वाहन हे जागतिक स्तरावर प्रथमच सादर होणारे वाहन असेल. याबाबत कंपनी अधिक काहीही स्पष्ट करत नाही. मात्र कंपनीची देशांतर्गत बाजारपेठेतील स्पर्धा ही खुद्द ह्य़ुंदाईबरोबरच मारुती, होंडा, टोयोटासारख्या कंपन्यांबरोबर राहणार हे निश्चित. भारतातील वाहन क्षेत्रात अल्पावधीत आमूलाग्र बदल होत आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर धावणाऱ्या वाहन निर्मितीला सरकारचे आर्थिक सहकार्य मिळत असतानाच दुसरीकडे त्यावरील करभार मात्र वाढतो आहे. नुकत्याच लागू झालेल्या वस्तू व सेवा कराव्यतिरिक्त अधिभाराचे प्रमाण सध्याच्या १५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत नेण्याचेही प्रस्तावित आहे. तरीदेखील येणाऱ्या दसरा-दिवाळीच्या सण हंगामावर या क्षेत्राची मदार आहेच. अशा स्थितीत याच मुहूर्तावर मात्र दोन वर्षांनी दाखल होणाऱ्या किआ मोटरच्या रूपात एक नवा खेळाडू मैदानात उतरत आहे.

veerendra.talegaonkar@expressindia.com

First Published on August 18, 2017 2:07 am

Web Title: article on kia motors kia motors cars