News Flash

टेस्ट ड्राइव्ह : देखणी ‘कॅप्चर’

कॅप्चर ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात रेनॉकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

| October 6, 2017 12:40 am

जागतिक बाजारामध्ये मानाचे स्थान असलेल्या व पाहताक्षणी छाप पाडण्याची क्षमता असलेल्या रेनॉ कॅप्चर एसयूव्हीने २२ सप्टेंबरपासून भारतामध्ये बुकिंग घ्यायला सुरुवात केली आहे. या महिन्यातील दिवाळीच्या सणासुदीत ही कार भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर रेनॉ कॅप्चरच्या ड्रायव्हिंगचा अनुभव कसा होता, त्याचा घेतलेला आढावा..

केबिनमध्ये ठेवण्यात आलेली भरपूर मोकळी जागा, उत्तम ग्राउंड क्लीअरन्स, आकर्षक डिझाइन, सुरक्षिततेला सर्वोत्तम प्राधान्य देणारी ‘कॅप्चर’ ही एसयूव्ही रेनॉ भारतीय बाजारात लवकरच दाखल करणार आहे. एसयूव्हीमध्ये ग्राहकांना जे जे आवश्यक असते, ते सर्व काही रेनॉने आपल्या ‘कॅप्चर’ या नव्या एसयूव्हीमध्ये दिले आहे. त्यामुळे रेनॉची ‘कॅप्चर’ खरेदी करण्यासाठी अनेकांच्या उडय़ा पडल्यास नवल नाही.

कॅप्चर ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात रेनॉकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेनॉ कॅप्चरच्या डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारात १.५ लिटरचे सिलिंडर बसवण्यात आले आहेत. डिझेल मोटारमध्ये ४ हजार आरपीएमची १०८ बीएचपीची ऊर्जा मिळते, तर पीक टॉर्क १७५० आरपीएमला २४० एनएम आहे. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल कॅप्चर कारमध्ये पेट्रोल इंजिन ५६०० आरपीएमला १०६ बीएचपी ऊर्जा मिळते. याचा टॉर्क ४ हजार आरपीएमला १४२ एनएम आहे. डिझेल इंजिनमध्ये ६ स्पिड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले असून, पेट्रोल एसयूव्हीमध्ये ५ स्पिड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.

नवीन जनरेशनच्या रेनॉ कॅप्चरची लांबी ४३२९ एमएम असून, रुंदी ही १८१३ एमएम आहे. तर उंची १६१९ एमएम आहे. कारचा ग्राऊंड क्लीअरन्सही उत्तम असून, तो २१० एमएम आहे. कॅप्चरमधील मोकळी जागा अधिक असल्याने प्रवासामध्ये अवघडल्यासारखे वाटत नाही. कॅप्चर डस्टरच्या तुलनेत थोडी लांब आहे. मात्र ती डस्टरच्या तुलनेत थोडी संकुचित आणि लहान वाटते. डस्टरप्रमाणेच व्हीलबेस २६७३ एमएम आहे. या सर्व वैशिष्टय़ांमुळे कॅप्चर एसयूव्ही नवीन लुकसह अधिक स्टायलिश वाटते. कॅप्चरचा समोरील भाग, डयूअल टोन अलॉईज आणि सर्व एलईडी हेड लाईट्स व टेल लॅम्पमुळे ती ही रेनॉ कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच अधिक आकर्षक वाटते.

अंतर्गत रचना

रेनॉ कॅप्चरमध्ये सर्व नवीन आणि अद्ययावत अशी केबिन ठेवण्यात आली आहे. केबिनमध्ये डय़ूअल टोन काळय़ा आणि पांढऱ्या छटा देण्यात आल्या आहेत. कॅप्चरमध्ये मोठय़ा आकाराची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम बसवण्यात आली असून, ती आतील रंगाला योग्य अशी आहे. कॅप्चरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये विशेष अशी ट्विन पॉड युनिट डिजिटल इन्फोटेनमेंटसह देण्यात आली आहेत.

मागील आसन ही खूप मोठे नसले तरी निराश करणारे नक्कीच नाही. गुडघे पुढील सीटला लागत नसल्याने आरामदायक वाटते. पाठीमागे वातानुकूलित यंत्रणा असल्याने तात्काळ गाडीतील वातावरणाशी मिळतेजुळते होण्यास मदत मिळते. रेनॉच्या गाडीची किंमत जरी अधिक असली तरी मागे बसल्यावर अधिक उबदार वाटत असल्याने अधिक असणारी किंमत विसरण्यास होते. कॅप्चरमधील सर्व आसने अधिक आरामदायी वाटतात. आसनांची उंची अधिक दिल्याने आपल्याला प्रवास करताना बसण्याची कोणतीही समस्या येत नाही. भारतीय प्रवाशांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी अधिक मेहनत घेण्यात आली आहे. आम्ही कॅप्चरचे डिझेल व्हर्जन टेस्ट ड्राइव्हसाठी निवडले. ही गाडी अगदी डस्टरसारखीच कार्य करते. त्यामुळे यात आश्र्चयकारक असे काही नाही. दोन्ही गाडय़ा सारखीच कामगिरी करतात. ज्यावेळी तुम्ही गाडीचे इंजिन सुरू करता आणि कमीत कमी अंतरामध्ये अधिक वेग घेते त्यावेळी कॅप्चर रॉकेटसारखीच वेग घेत असल्याचा भास होतो. कॅप्चर रस्त्यावरून धावत असताना थेट सरळ रेषेत धावते. त्यामुळे चालवताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही. पीक टॉर्क १८०० आरपीएम अंतर्गत असल्याने तुम्ही शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर आवश्यक तो वेग पकडू शकता. केबिनमध्ये इंजिनचा आवाज येत नसल्याने अजिबात त्रासदायक वाटत नाही. डस्टरच्या तुलनेत कॅप्चरमधून येणारा इंजिनचा आवाज हा कमी आहे. हा सगळय़ात मोठा फरक आहे. कॅप्चरची अंतर्गत रचना आणि वापरण्यात आलेली एकंदर सामग्री याबाबत ही कार इतरांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहे. या गाडीची हाताळणी करण्याबाबत सांगणे एक आश्चर्यजनक आहे. २१० एमएम ग्राउंड क्लीअरन्स असल्यामुळे अस्थिर भावना निर्माण होईल अशी शंका होती. मात्र असे काही झाले नाही. कार कॉर्नर चांगले घेते. मात्र म्हणून तीचा उल्लेख अतिशय स्पोर्टी कार असे करणे जरा घाईचे ठरेल. सस्पेंशन कमी असल्याने ड्रायव्हिंग करणे हे डस्टरसारखेच वाटते. मात्र कार हाताळणे अतिशय उत्तम आहे. रेनॉने जगभरातील आपल्या इतर कारच्या तुलनेत भारतामध्ये ग्राउंड क्लिअरन्स सर्वात जास्त दिला आहे. रशिया कॅप्चर आणि आपल्या डस्टरच्या तुलनेत ५ एमएमने क्लीअरन्स जास्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतीय व्हर्जनच्या कॅप्चरमध्ये सर्वाधिक गाउंड क्लीअरन्स असून तो २१० एमएम आहे.

रेनॉ कॅप्चरच्या पेट्रोल व्हर्जनचे मायलेज १२ किमी प्रति लिटर असून, डिझेल व्हर्जनचे मायलेज १७ किमी प्रति लिटर आहे.

निष्कर्ष

रेनॉ कॅप्चर ही पाहताक्षणी छाप पाडणारी कार असून, उत्तम ड्रायव्हिंग आणि उत्कृष्ट रचना यामुळे ही कार खरेदीदारांना आकर्षित करेल. रेनॉ कॅप्चरने ग्राहकांना आवश्यक असणारे सेगमेंट यामध्ये दिल्याने बाजारात ही कार आपला पाया भक्कम करते. अखेरीस रेनॉ कॅप्चरची किंमत ‘मेक किंवा ब्रेक फॅक्टर’ ठरू शकेल. या सेगमेंटमधील प्रतिस्पर्धी अधिक भक्कम असल्याने जर रेनॉने किमतीमध्ये अधिक प्रमाणात वाढ करून कॅप्चर सादर केली तर खरेदीदार या कारला नापसंती दर्शवतील. तथापि, जर रेनॉ कॅप्चरने ह्युंदाई क्रेटाला मागे टाकले तर खासकरून शहरी भागामध्ये कॅप्चर बाजारात आपले स्थान स्थान निर्माण करू शकेल. रेनॉ कॅप्चरच्या अनावरणासाठी फक्त काही दिवस उरले असल्याने आपण या सर्व बाबींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

वैशिष्टय़े

 • रेनॉ कॅप्चर अतिशय प्रीमियम अशा सुविधा देते. यातील मुख्य सुविधा खालीलप्रमाणे.
 • आर-लिंक अ‍ॅप कॉम्पॅटिब्लिटी
 • एलईडी हेडलॅम्प
 • टचस्क्रीन इंटरफेस इन्फोटेनमेंट
 • नेव्हिगेशन
 • ब्लूटूथ
 • १७ इंच अलॉय व्हिल्स
 • इंजिन सुरू/बंद करण्याची प्रणाली
 • रिअर एअरकॉन व्हेन्ट्स
 • अ‍ॅटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
 • रेन सेन्सिंग वायपर
 • अ‍ॅटोमॅटिक हेडलॅम्प्स
 • व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल
 • एबीएस
 • ईबीडी
 • ब्रेक असिस्ट
 • कॉर्निग लॅम्प्स
 • हिल स्टार्ट असिस्ट
 • सहा एअरबॅग्स
 • क्रूज कंट्रोल
 • लहान मुलासाठी आसन

सुरक्षेची वैशिष्टय़े

रेनॉने कॅप्चरला अतिशय प्रभावी सुरक्षा वैशिष्टय़ांसह सादर केले आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांच्या तुलनेत ती अधिक प्रभावी ठरते. डय़ूअल फ्रंट एअरबॅग्ज आणि एबीएससह ईबीडी प्रणाली देण्यात आल्यामुळे सुरक्षेची सर्व मानके कॅप्चर पूर्ण करण्यास समर्थ ठरते. तयार करण्यात आलेल्या भक्कम रचनेमुळे ती अपघातादरम्यान उच्च सुरक्षितता प्रदान करते. क्रॉसओव्हरमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेराही देण्यात आला आहे. त्यामुळे एकंदर सुरक्षा मानके पूर्ण करण्यात कॅप्चर इतर स्पर्धकांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

कॅप्चरचे खास फायदे

 • केबिनमध्ये भरपूर जागा
 • पैशाचे योग्य मूल्य
 • सुलभ वापरण्यासारखे स्टेअरिंग
 • ग्राउंड क्लीअरन्स उत्तम
 • शांत केबिन
 • एसयूव्ही डिझाइन

गाडीमध्ये जाणवणाऱ्या त्रुटी

 • गाडी चालवताना रोमांचकारी अनुभवाचा अभाव
 • ४ बाय ४चा पर्याय
 • ताकद कमी
 • सस्पेंशनमध्ये अधिक सुधारणा आवश्यक

ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2017 12:40 am

Web Title: article on renault captur renault car
Next Stories
1 टॉप गीअर : हिरो मोटोकॉर्पची प्लेजर
2 कोणती कार घेऊ?
3 अडथळय़ांची शर्यत!
Just Now!
X