ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये जर्मन किंवा जपानी गाडय़ांच्या इंजिन आणि तंत्रज्ञानाचा हात धरणारे दुसरे कोणी नाही. भारतात जागतिकीकरणानंतर झपाटय़ाने विस्तारायला सुरुवात झालेल्या ऑटोमोबाइल क्षेत्रात ऑडी या जर्मन कंपनीने आपले बस्तान बसवले. या कंपनीची कदाचित सर्वाना आवडणारी गाडी म्हणजे ऑडी क्यू-३..

जर्मनीबद्दल भारतीयांमध्ये एक विशेष कुतूहल आणि ममत्व असते. त्या देशाने आपल्या उत्पादनांचा दर्जा प्रचंड वरचा ठरवला असल्याने तेथील उत्पादनांबद्दल लोकांच्या मनात खात्रीही असते. घडय़ाळांच्या बाबतीत स्विस कंपन्यांचे जे महत्त्व तेच महत्त्व ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये जर्मन कंपन्यांना प्राप्त झाले आहे. मर्सडिीझचा तारा तर अनेक वष्रे ऑटोमोबाइल क्षेत्रावर दिमाखात झळकत आहे. बीएमडब्ल्यूने आपल्या एकापेक्षा एक सरस गाडय़ांनी भारतीय बाजारपेठेत शिरकाव केला आहे. याच मांदियाळीतील आणखी एक कंपनी म्हणजे ऑडी! नाव काढले, तरीही या कंपनीचा एम्ब्लेम असलेली एकामध्ये एक गुंफलेली चार वर्तुळे दिसतात. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्या चार कंपन्यांनी ऑडी या कंपनीचे हक्क विकत घेतले, त्या चार कंपन्यांचे प्रतिनिधित्व ही एकमेकांमध्ये गुंतलेली चार वर्तुळे करतात. या कंपनीने भारतीय बाजारपेठेत शिरकाव करत कॉम्पॅक्ट एसयूव्ही, सेडान आणि एसयूव्ही अशा श्रेणींमध्ये आपल्या गाडय़ा आणल्या आणि भारतीयांनी या गाडय़ांना पसंती दिली. ऑडी क्यू-३ ही कॉम्पॅक क्रॉसओव्हर एसयूव्ही श्रेणीतील गाडी भारतीयांच्या पसंतीला पडली नाही, तरच नवल!

hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

गाडीचे बाह्य़ रूप

ही गाडी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही असली, तरीही भारतात आलेल्या इतर क्रॉसओव्हर गाडय़ांप्रमाणे या गाडीला कुठेही उगाचच स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न केलेला नाही. या गाडीची रचनाच स्पोर्टी आहे. योग्य ठिकाणी उत्तम वळणदार आकार असेल, तर तो गाडीच्या सौंदर्यात नेहमीच भर पाडतो. या गाडीची रचना करतानाही हे पथ्य पाळले आहे. १७० मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स असल्याने गाडी चांगलीच उंच दिसते. गाडीकडे समोरून बघताना अर्धवट डोळे उघडलेल्या चित्त्यासारखे तिचे हेडलॅम्प्स लक्ष वेधून घेतात. हे एलईडी लाइट्स ऑटोमॅटिक कंट्रोलवर असल्याने बाहेरील प्रकाशानुसार ते काम करतात. गाडीच्याच आकारात असलेले बंपर्स, नंबर प्लेट आणि गाडीच्या एम्ब्लेमच्या भागात काळी ग्रिल यामुळे गाडीच्या सौंदर्यात भर पडते. कोणत्याही कॉम्पॅक्ट एसयूव्हीला असलेले जाड टायर्स हेदेखील या गाडीचे वैशिष्टय़ आहे. या टायर्समुळे गाडी काहीशी बसकी वाटत असली, तरी तिचा दिमाख वाढतो आणि गाडी चालवताना गाडीला भक्कम ग्रिप मिळते. गाडीचे साइड मिर्स गाडीच्या रंगात असून त्या मिर्सलाही एलईडी लाइटद्वारे साइड सिग्नल्स दिसण्याची व्यवस्था आहे. गाडीत सन-मून रूफ असल्याने गाडी वरून पाहतानाही खूप मस्त दिसते. ऑडी क्यू-३चे मागचे दिवे खास असून दोन रांगांमध्ये हे दिवे आहेत. तरीही मागून पाहताना ते जास्त जाडही दिसत नाहीत. गाडीला रूफ टेल दिल्याने तिच्या स्पोर्टी लुकमध्ये भर पडतो. गाडीच्या दोन्ही बाजूंना टपावर काळ्या रंगात रूफ रेल्स आहेत.

सुरक्षा

सुरक्षेच्या दृष्टीने जर्मन गाडय़ा कधीही उत्तम असतात, हे निरीक्षण आहे. ऑडी क्यू-३ ही गाडीही त्याला अपवाद नाही. गाडी धावताना अचानक ब्रेक मारल्यास ब्रेक लॉक होऊ शकतात. ते होऊ नयेत, यासाठी या गाडीत अँटी लॉक ब्रेक सिस्टम आहे. त्याशिवाय पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक आदी फीचर्समुळेही सुरक्षेत भर पडते. गाडीने वेग घेतल्यावर गाडीचे दरवाजे चालकाने लॉक केले नसतील, तर ते आपोआप लॉक होतात. पुढील दोन आसनांच्या समोर आणि बाजूला एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी सीटबेल्ट्स, सीटबेल्ट्स लावले नसल्यास तसे संकेत देणारी यंत्रणा, फ्रंट आणि साइड इम्पॅक्ट बीम्स, क्रॅश सेन्सर्स, अँटी थेफ्ट डिव्हाइस अशा अनेक फीचर्समुळे ही गाडी अधिक सुरक्षित होते.

अंतर्गत सजावट

ही गाडी पाच जणांसाठी अत्यंत उत्कृष्ट गाडी आहे. गाडीच्या पुढील दोन्ही सीट्स ऑटो अ‍ॅडजेस्टेबल आहेत. या सीट्सच्या बाजूला असलेल्या बटणांद्वारे त्या पुढे-मागे, वर-खाली करता येऊ शकतात. डॅशबोर्डवर मध्यभागी इन्फोटेन्मेण्टसाठी एलईडी स्क्रीन आहे. ही स्क्रीन डॅशबोर्डमध्येच दुमडली जाऊ शकते. त्यामुळे हव्या त्या वेळी तिचा वापर करता येतो आणि नको तेव्हा ती मिटून ठेवता येते. मागच्या सीटवर एसीची हवा लागावी, यासाठी मध्यभागी एसीचा ब्लोअर दिला आहे. त्याशिवाय पुढील दोन्ही सीट्सना कप होल्डर आणि मागे बसणाऱ्या बाजूच्या दोन सीट्सना कप व बॉटल होल्डर देण्यात आला आहे. स्टीअिरग व्हीलवर दिलेल्या कंट्रोलमध्ये गाडीची संपूर्ण इन्फोटेन्मेण्ट हाताळली जाऊ शकते. त्यात फोन उचलण्यापासून एफएम चॅनल निवडण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

इंजिन आणि टॉर्क

गाडीचं इंजिन २.० डिझेल इंजिन आहे. १९६८ सीसी क्षमतेच्या या इंजिनाचा टॉर्क ३८० एनएम एवढा प्रचंड असल्याने अपेक्षित वेग पकडण्यासाठी वेळ लागत नाही. गाडी ० ते १०० एवढा वेग घेण्यासाठी केवळ ८ सेकंदांचा कालावधी घेते. गाडी पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर असून सात स्पीड गिअर्सवर धावते. त्याशिवाय स्टीअिरग व्हीलजवळ पॅडल शिफ्टर्स दिले असून त्यानेही गिअर्स शिफ्ट करता येऊ शकतात

कम्फर्ट

गाडी चालवणाऱ्यासाठी ऑडी क्यू-३ ही गाडी प्रचंड आरामदायक आहे. ड्रायव्हरची सीट ऑटो अ‍ॅडजेस्टेबल असल्याने कम्फर्टची सुरुवात तेथून होते. त्याशिवाय ड्रायव्हरचा थकवा घालवण्यासाठी या सीटला बॅक मसाजची व्यवस्था देण्यात आली आहे. सीटच्या उजव्या बाजूला खाली असलेल्या बटणांद्वारे हा मसाज घेता येऊ शकतो. त्याशिवाय क्रुझ कंट्रोल या फीचरमुळेही सरळ रस्त्यावर चालकाच्या पायांना आराम मिळू शकतो. डॅशबोर्डवर असलेली सगळी बटणे छोटेखानी स्वरूपात ड्रायव्हरसमोर स्टीअिरग व्हीलवरही असल्याने ड्रायव्हरचे लक्ष विचलित होण्याची शक्यता खूपच कमी आहे. बाजूच्या आसनावर बसलेल्या प्रवाशालाही ही गाडी तेवढाच कम्फर्ट देते. गाडीत मागे बसलेल्या प्रवाशांना वाचण्यासाठी जवळपास प्रत्येक सीटवर पडेल असे दोन दिवे आहेत. त्याचप्रमाणे पुढल्या आणि मागच्या सीटमधल्या अंतरामुळे लेग स्पेसही चांगली मिळते. त्याशिवाय पॉवर िवडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंधन कमी असल्यास सूचना देणारा लाइट, उंचीप्रमाणे वर-खाली करता येणारं स्टीअिरग व्हील, गाडीत नॅव्हिगेशन कंट्रोल सिस्टम आदी गोष्टींमुळेही गाडीच्या कम्फर्टमध्ये भर पडते.

किंमत

३० ते ४० लाख रुपयांपर्यंत

अनुभव

ऑडी क्यू-३ गाडी चालवण्याचा अनुभव खूपच सुखद आहे. मोकळ्या रस्त्यांवर ही गाडी हरणासारखी पळते, तर प्रचंड वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यावर गाडी चालवताना चालकाला यातील आरामदायक फीचर्समुळे कमीत कमी त्रास होतो. द्रुतगती महामार्गावर ही गाडी १६० ते १७० च्या वेगातही रस्ता सोडत नाही किंवा गाडीतून व्हायब्रेशन्सही जाणवत नाहीत. तसेच अचानक वेगावर नियंत्रण मिळवणेही खूप सोपे आहे. साधारणपणे भारतीय बनावटीच्या किंवा भारतात चालणाऱ्या गाडय़ांचे उजव्या-डाव्या बाजूला वळण्यासाठीचे सिग्नल्स स्टीअिरग व्हीलवर उजव्या हाताला असतात आणि वायपर कंट्रोल डाव्या हाताला असतो; पण या गाडीच्या स्टीअिरग व्हीलखाली हे कंट्रोल्स नेमके विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे गाडी चालवताना या गोष्टींचे भान बाळगावे लागते; पण एकदा का ते भान आले, की ही गाडी चालवण्यासारखा दुसरा आनंद नाही.

rohan.tillu@expressindia.com