डिसेंबर २०१५ मधील विक्री वाढीने भारतीय वाहन कंपन्यांना स्फूरण चढले आहे. वाहन विक्रेते आणि खरेदीदार तसेच नुसते बघे किंवा ‘मॉडेल’बरोबरचे सेल्फीधारी यांच्यासाठी उत्सव असलेला ‘ऑटो एक्स्पो’ही सज्ज झाला आहे. त्यातच गेल्या वर्षांच्या कटू आठवणी मागे टाकून सेवा आदरातिथ्य, सूट-सवलती, माहिती तंत्रज्ञानाची जोड असे सारे काही घेऊन या क्षेत्रातील कंपन्यांही नवखरेदीदारांसाठी तयार आहे.

एखादी नकारात्मक घटना झाली की पुरता निरुत्साह येतो. घडलेल्या घटनेचा ऊहापोह, कारणमीमांसा केली जाते आणि झालेल्या चुका टाळून नव्याने काही करण्याची ऊर्मी येण्यापूर्वी जर पूरक बाबी जुळून नाही आल्या तर भकास वातावरणात अधिकच भर.
फोस्कवॅगनच्या रूपात प्रदूषण चाचणीतील फसवणुकीवरून समस्त वाहन क्षेत्र पुरते बदनाम झाले. खुद्द कंपनी, क्षेत्र, संबंधित यंत्रणा पुरत्या टीकेच्या लक्ष्य ठरल्या. नुकसान, फटक्याचे आकडेही समोर येऊ लागले. नवे वर्ष सुरू झाले तसे या उद्योगाने कात टाकायला सुरुवात केली.
विचार बदलला. धोरणे नव्याने तयार होऊ लागली. काळाची गरज ओळखून माहिती तंत्रज्ञानाची अधिक कास धरली जाऊ लागली. भारतातही हे सारे दिसू लागले. वाहन उत्पादक कंपन्या एकदम फ्रेश झाल्या!
देशातील वाहन उद्योगाचा गेल्या वर्षांतील प्रवासानेही कंपन्यांच्या उत्साहाला जोड दिली. सलग १४व्या महिन्यात वाढ नोंदविताना प्रवासी कार क्षेत्राने डिसेंबर २०१५ मध्ये तब्बल १३ टक्के विक्री नोंदविली. एवढेच नव्हे तर एप्रिल ते डिसेंबर दरम्यानही प्रवासी वाहनांची विक्री ८ टक्क्यांनी वाढली.
बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय वाहन मेळाही महिन्यावर येऊन ठेपला आहे. ताज्या विक्रीतील वाढीमुळे नवी वाहने या दरम्यान सादर करण्याचा त्यांचा उत्साह द्विगुणित होणार आहेच. वाढत्या स्पर्धेमुळे तर अनेक कंपन्यांनी त्यांच्या नव्या उत्पादनांबाबतची एरवी दिसणारी गुप्तताही राखलेली नाही.
फोक्सव्ॉगनने तीन नवी वाहने सादर करणार असल्याचे आतापासूनच घोषित केले आहे. शिवाय काहीशा नकारात्मक प्रसिद्धी मिळालेल्या या कंपनीचा प्रसार-प्रचार सध्या जोरात सुरू आहेच. तर कॉम्पॅक्ट सेदान, प्रीमियम एसयूव्ही आणि नवी पॅसट (प्रीमियम सेदान) या वाहनांची घोषणा मेळ्यापूर्वीच करण्यात आली आहे.
बजाज ऑटोने गेल्याच आठवडय़ात तिचा २०१४, २०१५चा प्रवास प्रसारमाध्यमांसमोर विशद केला. एन्ट्री (१०० सीसी) आणि स्पोर्ट (१५० सीसीवरील) गटात कंपनी कशी अव्वल असल्याचे सोदाहरण आकडेवारी सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांत मध्यम गटातील दुचाकीमध्ये (११० ते १२५ सीसी) होण्डा पुढे गेली आहे. तेव्हा आपल्यासाठीही ही श्रेणी तेवढीच महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करत या गटातील नवे वाहनच सादर करण्याचे बजाज ऑटोने निश्चयी केले आहे. कंपनी त्यासाठी थेट स्वतंत्र नाममुद्राच आणू पाहातेय.
टाटा मोटर्सही तिच्या विक्री धोरणावर गेल्या काही वर्षांपासून अधिक भर देत आहे. टाटा समूहातील या कंपनीची या गटाकरिता स्वतंत्र व्यवस्थाच आहे. कंपनीने तिची वाहन विक्री दालने केवळ दालन म्हणून न ठेवता तिला सेवा केंद्राची जोड दिली आहे. शिवाय एखाद्या हॉटेलमध्ये असे तांत्रिक साहाय्यभूत वातावरणही उपलब्ध करून दिले आहे. याच जोरावर येत्या चार वर्षांत १,४०० सेवा केंद्राचा मानसही व्यक्त केला आहे.
मानाच्या समजले जाणाऱ्या जेडी पॉवर यादीत (इंडिया कस्टमर सव्‍‌र्हिस इंडेक्स) टाटा मोटर्सचे स्थान यामुळेच पहिल्या तीनमध्ये आले आहे. ग्राहकांना देऊ करण्यात येणाऱ्या सेवांच्या जोरावरच कंपनीने या क्रमवारीत अव्वल स्थान राखण्याची मनीषा व्यक्त केली आहे. किंबहुना सेवा विभागावर भर दिल्यामुळेच कंपनीने एकूण भारतीय वाहन उद्योगाच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदविल्याचा दावा कंपनीच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे (ग्राहक संबंध) उपाध्यक्ष दिनेश भसिन यांनी केला आहे.
पाच वर्षांपूर्वी कंपनीचे स्थान याबाबत सातव्या क्रमांकावर होते. होरायझनेक्स्टद्वारे कंपनीने नवे रूप धारण केले होतेच. या संदर्भातील मालिकेंतर्गत नवी वाहनेही बाजारात आली. मात्र आता ग्राहक सेवा आणि तेही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह देऊ केले आहे. याासाठी सेवा विभागाचे खास बोधचिन्ह वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सच्या माध्यमातून अस्तित्वात आले. एरवी पावसाळादी वेळेस सेवा शिबीर होणाऱ्या कंपन्यांच्या जगतात टाटा मोटर्सने अख्खा सेवा सप्ताहाचीच संकल्पना रूढ केली आहे.
वाहन कंपन्यांमध्ये हा फेरबदल केवळ उत्पादन आणि धोरणे याबाबतच नाही, तर अनेक कंपन्यांनी त्यांच्या वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वातही बदल केला आहे. अमेरिकी जनरल मोटर्सच्या पहिला महिला सीईओच्या मुकुटात आता अध्यक्षपदाचाही मान आहे. तिच्याच भारतातील व्यवयासाची जबाबदारी नव्याने निश्चित करण्यात आली आहे. जर्मनीच्या मर्सिडिज बेन्झनेही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियुक्त्यांमध्ये फेरबदल केले आहेत.
तेव्हा नव्या २०१६ करिता सारे वाहन क्षेत्रच ‘हॅप्पी न्यू ईअर’ करू पाहतेय. विक्रीविषयक ताज्या आकडेवारीने उत्साह असल्याचे दिसून आले आहेच. मात्र तो कितपत टिकतो याची एक झलक गुरगावच्या ऑटो एक्स्पोत नक्कीच दिसेल!
वीरेंद्र तळेगावकर – veerendra.talegaonkar@expreesindia.com