16 December 2017

News Flash

ऑटो न्यूज.. रेनॉमध्येही प्रदूषण चाचणी घोटाळा

आपले उत्पादन विकण्यासाठी विविध क्लृप्त्या योजणाऱ्या अनेक कंपन्या जगात आहेत. व्या

पॅरिस : | Updated: March 17, 2017 2:59 AM

आपले उत्पादन विकण्यासाठी विविध क्लृप्त्या योजणाऱ्या अनेक कंपन्या जगात आहेत. व्यावसायिक स्पर्धेत प्रतिस्पध्र्याला गारद करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचीही या कंपन्या तयारी ठेवतात. वाहननिर्मात्या कंपन्याही त्याला अपवाद नाहीत. प्रदूषण चाचण्यांना खोटे निष्कर्ष मिळावेत यासाठी इंजिनात फेरफार करणाऱ्या फोक्सवॅगनला भरमसाठ दंडाला सामोरे जावे लागलेले असतानाच आता अशाच प्रकारचा घोटाळा रेनॉ या फ्रेंच कारनिर्मात्या कंपनीत पुढे आला आहे. तोही २५ वर्षे जुना. म्हणजे प्रदूषण चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे यावेत, यासाठी इंजिनात फेरफार करण्याचे काम याही कंपनीत सुरू होते आणि त्याला व्यवस्थापनाचा आशीर्वाद लाभला होता. यावरून आता फ्रान्समध्ये रेनॉच्या अधिकाऱ्यांवर खटला सुरू आहे. कंपनीचे मुख्याधिकारी कालरेस घोश्न यांना याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. घोटाळेबाज धोरण आखून कंपनीने देशाच्या कायद्यांना हरताळ फासल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घोटाळ्याची बिजे थेट ९०च्या दशकात जातात. डिझेल आणि पेट्रोलच्या इंजिनांत फेरफार करून ते प्रदूषण चाचण्यांत उत्तीर्ण ठरतील अशी त्यांची रचना करण्याचा रेनॉचा डाव होता आणि गेल्या २५ वर्षांपासून तो बिनबोभाट सुरू होता. रेनॉच्या एका माजी कर्मचाऱ्याच्या चौकशीतून हे सर्व प्रकरण पुढे आले.

पोर्शच्या १८ हजार गाडय़ांमध्ये तांत्रिक दोष

वॉशिंग्टन : पोर्शने ९११, ७१८ आणि मकॅन एसयूव्ही या तीनही प्रकारांतील एकूण १८ हजार गाडय़ा बाजारातून माघारी बोलावल्या आहेत. या गाडय़ांच्या एअरबॅग्जमध्ये दोष असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, ‘रिकॉल’ करण्याचा हा निर्णय फक्त अमेरिकेतील गाडय़ांसाठी लागू आहे. या तीनही प्रकारांतील गाडय़ांच्या पुढील बाजूला असलेल्या एअरबॅग्ज अपघातावेळी पूर्णपणे मोकळ्या होत नसल्याचे प्रायोगिक चाचण्यांत स्पष्ट झाले. या पाश्र्वभूमीवर ९११, ७१८ आणि मकॅन एसयूव्ही या  गाडय़ा बाजारातून माघारी बोलावून त्यांच्यातील तांत्रिक दोष दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एअरबॅग्जमधील हा दोष पोर्शला एअरबॅग्जचा पुरवठा करणाऱ्या ऑटोलिव्ह या कंपनीच्या लक्षात आला. त्यानंतर गाडय़ा माघारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

टोयोटाची इंग्लंडमध्ये अब्जावधींची गुंतवणूक

टोकियो : इंग्लंडने युरोपीय महासंघातून बाहेर पडून (ब्रेग्झिट) सवतासुभा मांडण्याचा निर्णय घेतल्याने इंग्लंडमधील परकीय गुंतवणुकीचा ओघ ओसरेल, हा अर्थतज्ज्ञांचा अंदाज काहीसा खरा ठरत असला तरी जपानी कारनिर्मात्या टोयोटा कंपनीने इंग्लंडमध्ये अब्जावधींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या मध्यवर्ती भागात टोयोटा असेम्ब्ली प्लांटची निर्मिती करणार असून त्यासाठी तब्बल २९३ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात इंग्लंडची सरकारी गुंतवणूक २१ दशलक्ष डॉलरची असेल. टोयोटाचा वेल्समध्ये कारखाना असून त्यात तीन हजार ४०० कामगार काम करतात.

First Published on March 17, 2017 2:59 am

Web Title: auto news automobiles news automobile industry latest auto news