12 August 2020

News Flash

टॉप गीअर : मोटारसायकलच ब्रँड होतो तेव्हा..

साध्या पल्सरपासून सुरू झालेला प्रवास नक्कीच एका ब्रँडची कहाणी सांगतो.

बजाज ऑटो या कंपनीने स्कूटरचे उत्पादन बंद करून केवळ मोटारसायकलचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि तशीच परिस्थिती अजूनही आहे. कारण देशात ऑटोमॅकिट स्कूटरला पसंती वाढत असताना आपली कंपनी मोटारसायकल उत्पादनावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे बजाज ऑटोकडून सांगितले जाते. एक्झिकेटिव्ह प्रीमियम मोटारसायकल सेगमेंटमध्ये बजाज ऑटोने पल्सर मोटारसायकलच्या माध्यमातून मोटारसायकल निर्माण करणारी कंपनी, अशी ओळख निर्माण केली. तसेच, केवळ भारतीय बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता अन्य उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये म्हणजे दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील काही देशांमध्ये आपला विस्तार केला आहे.

बजाज ऑटो सध्या प्लॅटिना, सीटी १००, डिस्कव्हर, व्ही, अ‍ॅव्हेंजर, डॉमिनर या मोटारसायकलबरोबर पल्सर मोटारसायकलचे उत्पादन करते. यातील प्लॅटिना, डिस्कव्हर, सीटी १०० या मोटारसायकलची स्वतची अशी बाजारपेठ असली तरी स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत या मोटारसायकलची विक्री मर्यादित राहिली आहे. कंपनीने या मोटारसायकलच्या फीचर, डिझाइनमध्ये वारंवार बदल करूनही बाजारपेठेने या मोटारसायकलना फारसे स्वीकारलेले नाही. व्ही आणि डॉमिनर या दोन मोटारसायकल बजाज ऑटोने नुकत्याच लाँच केल्या आहेत. त्यामुळे या मोटारसायकलचे यश समजण्यास अजून काही कालावधी जावा लागणार आहे. पण, बजाज ऑटो एका मोटारसायकलची ब्रँड म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. पल्सर हे आता मोटारसायकलचे नाव राहिलेले नाही. आता तो ब्रँड झाला आहे. मी पल्सर घेतली, असे एखाद्याने सांगितल्यावर बजाज ऑटो, दीडशे सीसीची मोटारसायकल असे चित्र निर्माण होते. माझ्याकडे पल्सर आहे, हे प्रतिष्ठेकडे इंगित करते. कारण कंपनीने या मोटारसायकलची ओळख वेग, पॉवर, स्टेट्स अशीच केली आहे. त्यामुळे बजाज ऑटोची व्यावसायिक पातळीवरील ओळखही बदलली, ती याच मोटारसायकलमुळे. दीडशे सीसीपेक्षा अधिक सीसी क्षमतेच्या मोटारसायकलच्या बाजारपेठेत पल्सरचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे बजाज ऑटोचा पल्सरचा दीडशे सीसी इंजिनपासून सुरू झालेला प्रवास २२० सीसी इंजिनपर्यंत आहे. यामध्ये नेकेड स्पोर्ट (एनएस) २००, एएस २००-१५०, आरएस २०० या मॉडेलची भर गेल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत पडली आहे. यातील आरएस २०० हे मॉडेल रेसिंग इन्स्पायर्ड आहे. त्यामुळे या मोटारसायकलमध्ये ट्विजन हॅलोजन लॅम्प, एबीएस, डिस्कब्रेक्स आदी देण्यात आले आहे. साध्या पल्सरपासून सुरू झालेला प्रवास नक्कीच एका ब्रँडची कहाणी सांगतो.

पल्सरचा प्रवास सुरू असतानाच युरोपीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या हेतूने आणि जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविण्याचे प्रयत्न बजाज ऑटोने सुरू केले. युरोपीय बाजारपेठेतील आणि रेसिंग मोटारसायकल उत्पादन कंपनी केटीएममधील हिस्सा २००७ मध्ये बजाज ऑटोने घेतला आणि पुढे हा हिस्सा पन्नास टक्क्यांच्या आसपास पोचला आहे. कंपनीने पल्सरबरोबर केटीएम या स्पोर्ट्स मोटारसायकल ब्रँडच्या मोटरसायकल भारतातही लाँच केल्या आहेत. यामध्ये केटीएम ड्यूकचा समावेश असून, नेकेड स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स सेगमेंटमधील मोटारसायकलचा समावेश आहे. या मोटारसायकलनी डिझाइन, कलर, लूक्समुळे तरुणवर्गात स्वतची ओळख निर्माण केली आहे. केटीएमच्या काही मोटारसायकलचेच उत्पादन बजाज ऑटोच्या चाकणमधील प्रकल्पात होते आणि या मोटरसायकल युरोपीय बाजारपेठेबरोबर अन्य ठिकाणी विक्रीसाठी जातात. भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण, एकेकाळी परदेशी कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने दुचाकी निर्मितीसाठी घ्यावी लागलेली मदत हा देशातील वाहन उद्योगाचा इतिहास असताना वाहन तंत्रज्ञानात स्वतची क्षमता निर्माण करण्याबरोबर एका परकी कंपनीमधील हिस्सा खरेदी करणे, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. त्यामुळे बजाज ऑटोचा मोटारसायकल उत्पादक म्हणून सुरू झालेला प्रवास वेगवान राहू शकण्याबरोबर जागतिक बाजारपेठेत स्वतचे नाव अधोरेखित करणारा म्हणून नक्कीच राहील, अशी अपेक्षा आहे. तसेच, बजाज ऑटो हा जागतिक पातळीवर दुचाकी उत्पादक ब्रँड म्हणून ओळख निर्माण करीत आहे.    (उत्तरार्ध)

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2017 12:11 am

Web Title: bajaj auto bajaj motorcycle
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 टेस्ट ड्राइव्ह : मारुततुल्य वेगम्
3 टॉप गीअर : स्कूटर उत्पादक ते मोटरसायकल निर्माती
Just Now!
X