News Flash

बायकर्स अड्डा : पावसाळ्यातले बायकिंग..

नाताळ व त्यानंतर लागून आलेल्या लाँग विकेंडमुळे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा बाईक ट्रिपचे वेध लागले.

दर्शन घेऊन आम्ही पुढे भोरच्या दिशेने निघालो तो वाटेत निसर्गाचे आणखी एक सुंदर शिल्प लागले.

नाताळ व त्यानंतर लागून आलेल्या लाँग विकेंडमुळे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा बाईक ट्रिपचे वेध लागले. याआधी महाबळेश्वर, लोणावळा, गोकाक धबधबा, रेड्डी-सावंतवाडी व पंढरपूर-जत अशी बाइक सवारी केली होती. त्यामुळे कोकण दौरा पक्का केला. विशेष म्हणजे सौ.ही कुरकुर न करता तयार झाली. २५ तारखेला सकाळी पुण्यातून निघून मुळशी, ताम्हिणी माग्रे निघून खेडमध्ये मावशीच्या घरी मुक्कामाला जायचे व २७ ला परत निघायचे ठरले. मुळशीपर्यंतचा प्रवास याआधी पावसाळ्यात केला होता.
आजूबाजूला दिसणारी हिरवळ यावेळी कमी होऊन त्याजागी वाळलेले गवत दिसत होते. खळाळणाऱ्या छोटय़ामोठय़ा धबधब्यांच्या तर केवळ खुणाच उरल्या होत्या. त्यानंतर पुढे ताम्हिणी घाटात उतरल्यानंतर जो निसर्ग पाहायला मिळाला तो केवळ अद्भुत, विशेषत: मधोमध असणारी दरी. उरात धडकीच भरली ती दरी पाहून. घाट उतरला व माणगावमधून पुढे गेल्यानंतर अचानकपणे मुंबई-गोवा हायवे समोर आला. नंतर पोलादपूर व कशेडी घाटाचे सौंदर्य न्याहाळत डोंगररांगातून मावळत्या सूर्यिबबाचे दर्शन घेऊन संध्याकाळपर्यंत खेडला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता उठलो तरी थंडी अजूनही कमी नव्हती झालेली. कोकणातल्या हवामानाचे एक वैशिष्टय़ म्हणजे इथे उन्हाळ्यात कडक ऊन, पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते.
त्या दिवशीही अशीच बोचरी थंडी असल्यामुळे निवांत आवरायला घेतलं. दुपारी तांदळाची भाकरी, डाळ व मसाले भात हादडून दापोलीला कूच केले. दापोलीजवळ हर्णे बंदर, दिवा घर व छोटेखानी किल्ला आहे. तो मागेच पाहिला होता. त्यामुळे यावेळी जवळचाच मुरुड बीच गाठला. खूप गर्दी होती. कदाचित सलग सुटय़ा असल्यामुळे असेल. मुख्य रस्त्यापासून बीचपर्यंत जाणारा दोन किमीचा एकेरी अरुंद रस्ता पार करायला अर्धा तास लागला. शेवटी पोहोचलो एकदाचे बीचवर. शांत समुद्र, पाण्यात डुंबणारे पर्यटक, वाळूत किल्ला करणारी शाळेच्या सहलीतील मुले आणि बीचवर हातात हात घालून फिरणारे कपल्स. क्या बात..! इकडे पहिल्यांदाच मी जिवंत तारा मासा पाहिला. एकेकाळी कमी गर्दी असणारा मुरुड बीचदेखील आता खूप बदलला आहे, तिकडेही वॉटर स्पोर्ट्स सुरू झालेत. त्यानंतर दिवसातला सर्वात सुंदर क्षण- सूर्यास्त. तो मनमोहक क्षण डोळ्यात व मनात साठवून परतलो.
पुढचा दिवस रविवार, परतीचा प्रवास. येताना भोर घाटातून रस्त्यात शिवथरघळ पाहून परतायचे होते. शिवथरघळ पाहायचे खूप दिवसांपासून मनात होते, पण आता तो योग आला होता. मुख्य रस्त्यापासून १२ किलोमीटर नागमोडी वळणे घेत कधी गर्द झाडी, तर कधी खुल्या रस्त्यावरून जात अखेर शिवथरघळीजवळच्या कोकणातील अस्सल गावी शिवथरला पोहोचलो. चोहोबाजूंना उंचउंच डोंगर, उतरत्या छपराची घरे, गर्द वनराई, गावची लोकवस्ती असेल साधारण २००च्या आसपास. तेथून थोडे पुढे गेल्यावर दिसते सुंदर मठाची कमान. घळ म्हणजे दोन दरीतली चिंचोळी अरुंद जागा, तिथे उभे राहणेही मुश्किल. समर्थ रामदास व त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांचे दासबोध लिहित असलेले शिल्प या गुहेत आहे. बाजूलाच साधारण ७०-८० फुटांवरून कोसळणारा धबधबा. पाणी खूप कमी असल्यामुळे तो काही तितकासा नजरेत भरत नव्हता. दर्शन घेऊन आम्ही पुढे भोरच्या दिशेने निघालो तो वाटेत निसर्गाचे आणखी एक सुंदर शिल्प लागले. वरंध घाट. याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य. चोहोबाजूंनी उत्तुंग सह्य़ाद्री व समोरच हजार फूट खोल दरी. तिथे घाटात अर्धा एक तास थांबून गरमागरम भजी व चहा घेऊन पुढे मार्गस्थ झालो. परतताना पुढे नागमोडी रस्ता व त्या बाजूने भोर धरणाच्या बॅकवॉटरचे निळेशार पाणी सोबतीला होते. तीन दिवसात साधारण ५६० किमीचा प्रवास करून रविवारी संध्याकाळी पुण्यात पोहोचलो तो मनात पुन्हा एकदा याच मार्गावर प्रवास करण्याचा संकल्प करून. तोही पुढील पावसाळ्यानंतर लगेचच..
– अभ्युदय खाडे

बाइक काढायची आणि भटकंती करायची ही अनेकांची आवड. त्यानिमित्ताने बायकर्स ग्रुप तयार होत असतात. ग्रुपने दूरदूरवर भटकंती करायची हा मुख्य हेतू. प्रवासाचे नियोजन, प्रवासात आलेल्या अडचणी यामुळे अनुभवाची शिदोरी मोठी होते. अशाच बायकर्स ग्रुपना आम्ही स्पेस देणार आहोत, व्हील ड्राइव्ह पानावर.. नव्या वर्षांत..! एकच करायचं, तुमच्या ग्रुपचा एक छानसा फोटो आम्हाला पाठवायचा. तुम्ही राबवलेल्या मोहिमांचा लेखाजोखा मांडायचा. कडुगोड अनुभव शेअर करायचे..सर्व मजकूर फक्त २०० शब्दांतच बसवायचा..
इमेल : ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 12:15 am

Web Title: bike riding in monsoon
Next Stories
1 न्युट्रल व्ह्य़ू : आदर्श रस्ता व्यवस्था
2 हरवत चाललेले ‘कार’नामे
3 मुंबई-आग्रा व्हाया दिल्ली, सुरक्षा संदेश..
Just Now!
X