भारत देश तरुण आहे. म्हणजेच तरुणाईची संख्या जास्त आहे. डिजिटल युगामध्ये छानछोकीत राहण्याची वृत्ती वाढतेय. अशात आपल्याकडेही एक छानशी, देखणी कार असावी असेही वाटत असते. बरेच जण पहिल्यांदाच नवीन कार घेणारे असतात. पण एकच वादळ त्यांच्या मनात काहूर माजवून असते, की कोणती कार घेऊ? गरजेनुसार की हौसेसाठी.

भारतात पेट्रोल- डिझेलचे दर चढेच आहेत. कार कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार आणि स्वप्नांनुसार कार बाजारात आणल्या आहेत. गरजेनुसार कार हवी असेल तर जास्त मायलेज देणारी कार उपलब्ध आहे. तसेच मस्त मोठी कार घेऊन फिरायचे असल्यास काही जादा पैसे मोजून महागडे पर्यायही उपलब्ध आहेत. हे सर्व पाहता नवीन कार घेणाऱ्यांना सतत एक प्रश्न भेडसावत असतो. पेट्रोल कार घेऊ की डिझेलवर चालणारी? त्यात काय एवढे विचार करण्यासारखे? मित्र, नातेवाइकांना विचारून त्यांच्या सल्ल्यानुसार घेणारेही बरेच आहेत. मात्र, कार बहुतांश वेळा कर्ज काढूनच घेतली जाते. त्यामुळे नंतर निर्णय चुकला म्हणणारेही बरेच भेटतात. कार घरी आणली की आपसूकच त्यातून फिरणे वाढते. मग इंधनाचा खर्च वाढला. कर्जाचा हप्ता आहेच गाठीला. देखभाल खर्चही किलोमीटरनुसार आलाच. कार फिरवण्याचा खर्च परवडत नाही म्हणून आठ-दहा लाखांची निव्वळ इच्छापूर्तीसाठी घेतलेली कार बऱ्याचदा धूळ खात पार्किंगमध्ये आठवडा-दोन आठवडे उभी असते. एवढी रक्कम मोजून घेतलेली कार अशी उभी करून ठेवणे तरी परवडते का?

पेट्रोल कार घ्यायची की डिझेल?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतील फरक आता १४ ते १६ रुपयांचाच आहे. पेट्रोलची १२०० सीसीची कार साधारण १६ ते १८ मायलेज देते. तर त्याच श्रेणीतील डिझेलची कार २२ ते २३चे मायलेज देते, असे गृहीत धरले तर कार घेणाऱ्याला डिझेलची कारच स्वस्त पर्याय वाटतो. खरंच असं आहे का? उत्तर सोयीनुसार. एकाच श्रेणीतील पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमतीमध्ये जवळपास दीड लाखांचा फरक असतो. बाजारात ८.५ टक्क्यांपासून १०.३० टक्क्यांपर्यंत बँका कर्ज उपलब्ध करून देतात. शिवाय छुपे दर आलेच. पेट्रोलचा दर ७५ आणि डिझेलचा दर ६० धरला तर कर्जाची रक्कम सोडल्यास डिझेलच परवडते. परंतु, कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजाचा विचार केल्यास पेट्रोल कार आणि डिझेल कारचा खर्च तेवढाच येतो. कसे? फरकाच्या सव्वा ते दीड लाखावरील पाच वर्षांचे व्याज आणि मुद्दल असे पकडून १.५ ते दोन लाख होते. डिझेलची कार जरी घेतली तरीही हे पैसे मोजून पुन्हा डिझेलसाठी वेगळे पैसे मोजावेच लागतात. पेट्रोलची कार असल्यास फरकाच्या पैशांतून इंधन भरले जाते. या गणिताचा विचार केल्यास दहा वर्षांत दोन्ही प्रकारच्या कार जवळपास १ लाख किमी चालल्यास त्यांचा खर्च सारखा येतो. अन्यथा डिझेलची कार महागच ठरते.

डिझेल कारचे भविष्य

सध्या पेट्रोल आणि डिझेल कारचे आयुष्य १५ वर्षे निर्धारित केलेले आहे. परंतु भविष्यातील हवा प्रदूषणाचा विळखा पाहता हे आयुर्मान दहा वर्षांवर येण्याची दाट शक्यता आहे. हे पाहिल्यास फरकाचे जादा मोजलेले पैसे वसूल करण्यासाठी दहा वर्षांत प्रत्येक वर्षांला १५ ते २० हजारापेक्षा जास्त किमी कार फिरणे आवश्यक आहे. परंतु, चार-पाच वर्षांतच घेतलेली कार त्या काळानुसार जुनी होत असल्याने ती विकून नवीन घेण्याकडे कल असतो. यानुसार डिझेलची कार हौस भागवणाऱ्यांसाठी खरेच परवडणारी आहे का, हा ही विचार होणे आवश्यक ठरते. शिवाय भविष्यातील डिझेलच्या किमती कुठे पोहोचलेल्या असतील याचा अंदाजही बांधता येत नाही.

पेट्रोल कार कोणासाठी?

आठवडय़ातून एकदाच वीकेंडला फॅमिलीसोबत बाहेर जाणाऱ्यांसाठी किंवा हजार ते दीड हजार किमी महिना चालविणाऱ्यांसाठी पेट्रोल कारच चांगला पर्याय आहे. पाच-सहा दिवस कार उभी असते. पेट्रोल हे डिझेलपेक्षा जलद जळणारे इंधन आहे. यामुळे महिना-दोन महिने जरी कार एकाच जागी उभी असली तरीही ती पहिल्या प्रयत्नातच सुरू होते. आणि चालविणेही कमी असल्याने फरकाचे पैसेही वाचतात.

डिझेल कार कोणासाठी?

डिझेल कार ही दिवसाला ५० ते १०० किमी किंवा त्यापेक्षा जास्तीचा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरते. म्हणजेच महिन्याला दीड-दोन हजारपेक्षा जास्त प्रवास करण्याऱ्यांसाठी. पेट्रोलपेक्षा डिझेलची किंमत कमी व मायलेज जास्त असल्याने त्यांच्यासाठी हा फायद्याचा सौदा असतो. त्यांचा वापरही जास्त असल्याने तीन ते चार वर्षांत कार विकून दुसरी कार घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे व्यावसायिक वापरासाठी डिझेलची कार घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

देखभाल खर्च

डिझेल कारच्या तुलनेमध्ये पेट्रोल कारचा देखभाल खर्चही कमीच असतो. म्हणजेच जर डिझेल कारचा खर्च पाच हजार येणार असेल तर तोच पेट्रोल कारचा खर्च साडेतीन हजारच्या आसपास येतो. तसेच डिझेल कारच्या तुलनेत पेट्रोल कारचे सुटे भागही स्वस्त असतात. पेट्रोल कारचे सुटे भागही लवकर खराब होत नाहीत. डिझेल कार खूप दिवस उभी करणेही देखभाल खर्च वाढविणारे ठरते.