* मी ग्रामीण भागात राहतो. मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझे बजेट पाच लाख रुपये आहे. गाडीचा रोजचा वापर जास्त नसेल. आम्ही घरात पाच जण आहोत. त्यामुळे सर्वासाठी योग्य ठरेल अशी गाडी सुचवा.
– अर्जुन क्षीरसागर, नाशिक
* तुम्हाला व्ॉगन आर ही गाडी योग्य ठरेल. हिचे नवीन मॉडेल तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुमच्या बजेटात बसणारी ही गाडी आहे.
* होंडा जॅझ घ्यावी की मारुती बलेनो. खूप गोंधळ आहे. गाडीचा वापर कमी असेल. योग्य सल्ला द्या.
– मुक्ता पवार
* वापर कमी असेल तर मारुती बलेनो घ्यावी. कारण साधारणत होंडाचा सव्र्हिसिंग खर्च मारुतीपेक्षा नक्कीच जास्त आहे. वापर कमी असला तरी सव्र्हिसिंगचा खर्च जास्तच द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही बलेनोच घ्या.
* माझे वय ६२ वर्षे आहे. मी पुणे-मुंबई शहरांत गाडी वापरते. वर्षांतून दोनदा तरी कोल्हापूपर्यंतचा प्रवास असतो. मी गेल्या काही वर्षांपासून अल्टो के१० वापरते आहे. या गाडीचा काही त्रास नाही. पण आता नवीन गाडी घ्यायची असेल तर चार जणांना प्रवास करता येऊ शकेल, पार्किंगला सोपी, उत्तम मायलेज देणारी अशी गाडी कोणती आहे. कृपया सांगा.
– राधा मराठे
* तुम्ही मारुती सेलेरिओ एएमटी ही गाडी घेऊ शकता. तिचा मायलेज के१० एवढाच आहे आणि कसलाच त्रास नाही. आय१०ला मायलेज थोडे कमी आहे.
* आम्हाला पेट्रोल व्हर्जन कार घ्यायची आहे. दररोजचा प्रवास १५ ते २० किमीचा असून अधूनमधून बाहेरगावी जाण्यासाठी योग्य अशी नवीन कार सुचवा. बजेट साधारणत आठ ते साडेआठ लाख रुपये आहे.
– प्राजक्ता फणसे, नाशिक
* तुम्हाला पेट्रोल व्हर्जनमध्ये सेडान कार हवी असेल तर नक्कीच फोर्डची अस्पायर ही गाडी तुमच्यासाठी योग्य ठरेल. तिचे इंजिन ताकदवान आहे आणि मायलेजही उत्तम आहे. तसेच ही गाडी प्रशस्तही आहे. आठ लाखांत तुम्हाला अधिकाधिक फीचर्स या गाडीत मिळतील. हॅचबॅकमध्ये तुम्ही ह्य़ुंदाई आय२० अॅक्टिव्ह ही गाडी घेऊ शकता किंवा एसयूव्हीमध्ये फोर्डची इकोस्पोर्टही घेऊ शकता.
* माझ्या घरात आम्ही पाच जण आहोत. मला सात आसनी गाडी घ्यायची आहे. माझे ड्रायव्हिंग दरमहा हजार किमी असेल. कोणती गाडी घ्यावी.
– स्वप्निल देशमुख
* मारुती अर्टिगा ही गाडी तुमच्या कुटुंबासाठी अगदी योग्य गाडी आहे. परंतु तुम्ही सीएनजी मॉडेल घेतले तर सीएनजी भरायला वेळ लागेल. त्यामुळे सीएनजी घेताना जरा विचार करूनच गाडी घ्या. अन्यथा पेट्रोल व्हर्जन केव्हाही सर्वोत्तमच.
* मला अल्टो के१० विषयी सांगा. आमच्या घरात आम्ही पाच जण आहोत. ही गाडी चांगली आहे का, की व्ॉगन आर घ्यावी. माझे बजेट चार लाख रुपये आहे.
– विनय सावंत
* तुम्हाला स्वस्तातली ऑटो गीअर गाडी घ्यायची असेल तरच अल्टो के१०चा विचार करा. अन्यथा तुम्ही रेनॉची क्विड ही गाडी घ्यावी. ही तुमच्यासाठी उत्तम गाडी ठरेल.
* मी मारुती सुझुकी सेलेरिओ व्हीएक्सआय ही कार घेण्याचा विचार करत आहे. मला दररोज ३० किमीचे रनिंग आहे. माझी निवड योग्य आहे की, अन्य कोणत्या गाडीचा विचार करावा.
– जयश्री अवताडे
* तुम्हाला जर ऑटो ट्रान्समिशनमधील सेलेरिओ कार घ्यायची असेल तरच ही गाडी घ्या. मॅन्युअलमध्ये ग्रँड आय१० किंवा मारुती बलेनो घ्यावी या गाडय़ा मजबूत आणि दणकट आहेत.
* मला रेनॉची क्विड ही गाडी घ्यायची आहे. परंतु मला तुमचा सल्ला हवा आहे.
– अक्षय लाड
* क्विड ही गाडी आकर्षक आणि योग्य आहे. परंतु तुम्हाला कमी फीचर्स चालत असतील तरच ही गाडी घ्यावी. अन्यथा जास्त फीचर्सवाली सध्याची चांगली गाडी म्हणजे फोर्ड फिगो ही आहे.
* मला मे, २०१६ मध्ये पेट्रोल व्हर्जनमधील मारुती अर्टिगा ही गाडी घ्यायची आहे. माझ्या घरात पाच जण आहेत तसेच माझे रोजचे ड्रायव्हिंग २५ ते ३० किमीचे असेल.
– अरुण करमरकर
* तुम्हाला सात आसनीच कार घ्यायची असेल तरच तुम्ही अर्टिगा ही गाडी घ्या. अन्यथा तुमचे पैसे
वाया जातील. तुम्ही फोर्ड इकोस्पोर्ट किंवा मारुती ब्रिझा या गाडय़ांचा विचार करू शकता. या गाडय़ा
उत्तम आहेत.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com