येत्या सहा महिन्यांत अनेक कंपन्यांची नवनवी वाहने बाजारात दाखल होणार आहेत. सर्व सेगमेंटच्या वाहनांना मिळणारा प्रतिसादही कायम आहे. अमूक एकाच श्रेणीतील वाहनांना अधिक पसंती हे चित्र पुसले गेले आहे.

दसरा-दिवाळी म्हणजे हमखास खरेदीचा हंगाम. या सणांच्या मुहूर्तावरच जास्तीत जास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. अगदी घरगुती वस्तूंपासून ते घर, गाडी घेण्यापर्यंतच्या सर्व व्यवहारांचा त्यात समावेश होतो. म्हणूनच तर सर्वत्र खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असतो, या सणांच्या आगेमागे..

तर सालाबादप्रमाणे यंदाही बाजारपेठ सजली आहे. पावसाने कृपावृष्टी केली आहे. त्यामुळे पीक-पाण्याचा प्रश्न मिटलाय. नोकरदारांच्या खिशातही दोन पसे जास्त खुळखुळणार आहेत. त्यामुळे गाडी घेण्याचा विचार करीत असाल तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. वाहननिर्मात्यांनीही या सणांच्या मुहूर्तावर अनेक गाडय़ांचे सादरीकरण करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्रात एक अनोखा उत्साह संचारला आहे. गाडी घेऊ इच्छिणारेही नवनवीन पर्याय पडताळून पाहू लागले आहेत. आमची नवीन गाडी घ्यायची असेल तर अमुक वर्ष फ्री सíव्हस इथपासून ते घसघशीत सूट इथपर्यंत, अशा जाहिरातींचा मारा केला जाऊ लागला आहे. त्यामुळे नवा ग्राहक हरखून गेला आहे. तर जुना ग्राहक आपल्या पारंपरिक गाडीच्या ब्रॅण्डव्यतिरिक्त अन्य ब्रॅण्डचा विचार करू लागला आहे. हे कमी म्हणून की काय, बँका आणि वित्तीय संस्थांनीही कर्जाच्या थल्या मोकळ्या सोडल्या आहेत. तसेच विविध सवलतीही देऊ केल्या आहेत.

वाहन क्षेत्राचा गेल्या काही महिन्यांपासूनचा प्रवास सुखकारक राहिला आहे. सर्व प्रकारच्या गाडय़ांची उत्तम विक्री झाल्याची नोंद आहे. महिन्यागणिक वाहनांची विक्रीही वाढत आहे. नव्या उत्पादनांनाही वाहनप्रेमींकडून पसंतीची पोचपावती दिली जात आहे. सणासुदीच्या निमित्ताने त्यात अधिक भर घातली जाणार आहे. येत्या सहा महिन्यांत अनेक कंपन्यांची नवनवी वाहने बाजारात दाखल होणार आहेत. सर्व सेगमेंटच्या वाहनांना मिळणारा प्रतिसादही कायम आहे. अमूक एकाच श्रेणीतील वाहनांना अधिक पसंती हे चित्र पुसले गेले आहे.

एकूणच वाहन क्षेत्राला देशात नजीकच्या भविष्यात तेजीचे पाठबळ मिळणार आहे. त्यासाठी विविध निमित्तेही दिली जात आहेत. यंदा मान्सून तर तुलनेत चांगला झालेलाच आहे. उत्तम कृषिउत्पादनांवर तर ग्रामीण भागातील क्रयशक्तीची मदार असते. ट्रॅक्टर, मोटारसायकल अशा वाहनगटांना या कालावधीत विशेष मागणी असते.

खरेदीउत्साह दुणावण्यास आणखी एक घटक कारणीभूत असेल, आणि तो म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेला सातवा वेतन आयोग. त्यामुळे दसरा-दिवाळीत वाहननिर्मात्यांच्या आणि वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांच्या आनंदाला अजिबात तोटा राहणार नाही, याची छान बेगमी झालेली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेनेही व्याजदरात कपात केल्याने वाहनखरेदीसाठी मिळणारे कर्जही स्वस्त होणार आहे. त्याच्या जोडीला अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी सणासुदीच्या निमित्ताने डाऊन पेमेंट शून्यावर आणून ठेवले आहे. वाहनकर्ज घेतले की त्याची तीन ते पाच वर्षांत परतफेड करता येते.

आशादायी भविष्यकाळ

नजीकच्या काळात वाहन खरेदीचा हा उत्साह कायम राहणार असून उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागणीला जास्त पसंती असेल, असा होराही व्यक्त केला जात आहे. शिवाय छोटय़ा प्रवासी गाडय़ांच्या पर्यायांमध्ये वाढ होत असल्याने त्यांनाही चांगली मागणी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेनॉच्या डस्टरनंतर छोटेखानी क्विड, निस्सानची डॅटसन गो, मारुतीची ब्रेझा, ह्युंदाईची क्रेटा, टाटाची टियागो, झेस्ट, मिहद्राची केयूव्ही आणि टीयूव्ही या गाडय़ांना सध्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे या क्षेत्राला नजीकच्या भविष्याकडून मोठी अपेक्षा आहे. आणि त्याची सुरुवात अर्थातच सणासुदीच्या हंगामापासूनच होणार आहे. दुचाकीच्या क्षेत्रातही हिरो, होंडा, बजाज, आयशर मोटर्स, पिआज्जिओ, टीव्हीएस आदींच्या नव्या दुचाकींची भर पडणार आहे. प्रवासी वाहनांच्या तुलनेत वाणिज्यिक वापरासाठीच्या वाहनांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एकूणच निर्मिती, सेवा तसेच पायाभूत सेवा क्षेत्रांच्या संथगतीमुळे ही विक्री काहीशी रोडावली आहे. मात्र, सणांच्या मुहूर्तावर त्यालाही गती मिळेल, अशी आशा वाहन उत्पादक बाळगून आहेत.

नवीन काय..

बाजारात यंदा काही नवीन वाहने दाखल होत आहेत. गेल्या काही महिन्यांत प्रवासी कारची विक्री काहीशी मंदावली होती. मात्र, त्याचवेळी कॉम्पॅक्ट एसयूव्ही, एसयूव्ही, एमपीव्ही अशा प्रकारच्या वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याची नोंद आहे. यंदा टाटा, मिहद्रा, मारुती, फियाट, निस्सान आणि रेनॉ या नामांकित वाहन निर्मात्या कंपन्यांच्या नवनवीन गाडय़ा बाजारात दाखल होणार आहेत. एकूणच वाहन उत्पादकांना यंदाचे वर्ष अच्छे दिनांचे आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

विद्यमान वर्षांत वाहनविक्रीत चांगली वाढ झाली आहे. आíथक मंदी, प्रदूषण करणाऱ्या वाहनांना बंदी वगरे चर्चानी सुरुवातीच्या काळात क्षेत्राला थोडा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, एकंदर प्रतिसाद पाहता चित्र उत्साहवर्धक आहे. देशात प्रवासी वाहनांना चांगली मागणी आहे. त्यामुळे एकूण वाहनविक्री दुहेरी आकडय़ाच्या पुढे असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

– सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सिआम)

वीरेंद्र तळेगावकर  – veerendra.talegaonkar@expressindia.com