दसरा, दिवाळी आली की घरात नव्या वस्तू खरेदी करण्याचे वेध लागतात. सणासुदीच्या निमित्ताने शुभमुहूर्तावर खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असतो. आपल्याकडे कार घेण्याच्या चर्चेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सहभागी असते आणि त्यातून सर्वाची आवड-निवड आदींचा मेळ घालत निर्णय होतो. वाहन कंपन्यांनी मर्यादित स्वरूपात या वर्षी जुन्या वाहनांची नवी मॉडेल, तर पूर्णत: नवी मॉडेल बाजारात आणली आहेत. सेदान, प्रीमियम हॅच आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये कोणते पर्याय आहेत याची अनेकांना कल्पना नसते. या पाश्र्वभूमीवर कार खरेदी करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या याबाबतचा आढावा.

या वर्षी दसरा-दिवाळीवर नोटबंदी आणि जीएसटीचे सावट असले तरी वाहनविक्रीचा आलेख या आर्थिक वर्षांत सातत्याने चढाच राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक वाहन कंपन्यांनी सण-उत्सवाचा कालावधी डोळ्यापुढे ठेवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी मॉडेल लाँच करीत आहे. पण, हे वर्ष यासाठी काहीसे अपवादात्मक ठरले आहे. कारण निवडक कंपन्यांनीच कारची नवी मॉडेल लाँच केली आहे. तसेच, जुन्या मॉडेलची रिफ्रेश व्हर्जनही क्वचित लाँच झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना जुन्याच मॉडेलमधून निवड करवी लागणार आहे.

कॉम्पॅक्ट सेदान कार पर्याय

मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादन कंपनी असून, कारच्या बाजारपेठेतील कंपनीचा हिस्सा सुमारे पन्नास टक्कय़ांजवळ आहे. त्यानंतर ह्युदाई मोटरचा क्रमांक लागतो. या दोन्ही कंपन्यांचा कारविक्रीतील हिस्सा सुमारे ६५-६७ टक्क्यांदरम्यान आहे. या कंपन्यांकडूनच प्रामुख्याने सण-उत्सवाच्या कालावधीत नवी मॉडेल लाँच होतात. पण, या वर्षी मारुती सुझुकीने केवळ पूर्वाश्रमीच्या स्विफ्ट डिझायर कारचे पूर्णपणे नवे मॉडेल डिझायर लाँच केले आहे.

नवी डिझायर पहिल्या मॉडेलच्या तुलनेत अधिक आरामदायी व मोठी आहे. कारला के सिरीजमधील १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन, तर १२४८ सीसीचे मल्टिजेट इंजिन आहे. दोन्ही इंजिन उत्तम आहे. तसेच, कारला प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने अनेक बदल अंतर्गत व बर्हिगत केले आहेत. क्रोमचा वापर करण्यात आला असून, एलईडी लाइटही समाविष्ट करण्यात आले आहेत. ब्लॅक-बेईजमध्ये इंटिरीयर दिले असून, उत्तम गुणवत्तेचे प्लास्टिक, सॉफ्ट टच मटेरियल वापरले आहे. स्पोर्टी फीलसाठी फ्लॅट बॉटम स्टिअरिंग दिले असून, रिअर एसी व्हेंट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट दिला आहे.

डिझायर ही नव्या फ्लॅटफॉर्मवर असून, त्यामुळे कारचे वजन तब्बल १०५ किलोने कमी झाले आहे. याचा फायदा मायलेज वाढण्यासाठी नक्कीच होत असतो. पेट्रोल कार प्रति लिटर २२ किमी, तर डिझेल कार प्रति लिटर २८.४ किमीचे मायलेज देते, असा दावा कंपनीचा आहे. डिझायरची एक्सेंट, अमेझ, अस्पायर या कारशी तुलना केल्यास मायलेज अधिक वाटते. तसेच, शहरात प्रति लिटर १५-१७ किमी व डिझेलचे १७-२० किमी मायलेज मिळू शकते.

ह्युदाई एक्सेंट, होंडा अमेझ, फोर्ड फिगो अस्पायर या कारमध्ये असणारी फीचर थोडय़ाफार फरकाने सारखी आहेत. मात्र, डिझायरची कामगिरी पहिल्यापासूनच चांगली राहिली आहे. तसेच, स्विफ्ट डिझायरच्या आधीच्या मॉडेलला रिसेल बाजारपेठेतही चांगली किंमत आहे. त्यामुळेच सेदान म्हणजे चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या कार सेगमेंटमध्ये डिझायर उत्तम आहे. पण, याच सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने पुन्हा एकदा प्रवेश केला असून, या वर्षी इम्पॅक्ट डिझाइनवर आधारित पहिली सेदान कार टिगॉर लाँच केली आहे. एका प्रीमियम कारचा लुक वाटावा असे डिझाइन टाटा मोटर्सने टिगॉरमध्ये साकारले आहे. एअर बॅग्स, एबीएस, ईबीडी, सीबीएस ही महत्त्वाची सुरक्षा वैशिष्टय़े या कारमध्ये दिली आहे. तसेच, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, क्रोम, हार्मनकार्डन सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ओआरव्हीएम्स आदी अनेक मोठय़ा कारमध्ये असणारी फीचर या कारमध्ये टाटा मोटर्सने दिली आहेत. तसेच, इंजिनही दमदार आहे. कार टॉप स्पीडला चालवली तरी ती स्थिर राहते. इंजिनाचा आवाज जाणवत नाही. सस्पेन्शन उत्तम आहे. मायलेजच्या बाबतीतही टियागोसारखीच (२३ किमी प्रतिलिटर (पेट्रोल व्हर्जन), असा कंपनीचा दावा) आहे. त्यामुळे एका चांगल्या कॉम्पॅक्ट सेडानच्या शोधात असाल तर टिगॉर हा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे.

प्रीमियम हॅचबॅक कार

प्रीमियम सेदान कारमधील एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी या सेफ्टी फीचरबरोबर इलेक्ट्रॉनिक ओआरव्हीएम्स, क्लायमेट कंट्रोल एसी, स्टिअरिंग माउंडेट कंट्रोल, स्पेस यांचा मेळ घालून हॅचबॅकमध्ये प्रीमियम हॅचबॅक कार सेगमेंट भारतीय कार बाजापेठेत सादर झाला. या सेगमेंटमध्ये सध्या बलेनो, एलईट आय २०, जॅझ, पोलो या कार आहेत. कंपन्यांनी थोडय़ाफार फरकाने यांच्यातील फीचर अपग्रेड केली आहेत.

जॅझ व पोलो यांना सर्वाधिक सीसी असणारे म्हणजे १.५ लिटरचे डिझेल इंजिन, तर आय २० ला १.४ लिटरचे इंजिन आहे. मारुती सुझुकीने बलेनोला १.३ लिटरचे डिझेल इंजिन बसविले असून, हे फियाट सोर्स इंजिन आहे. या सेगमेंटमधील सर्वात कमी सीसीचे इंजिन आहे.

बलेनोचे इंजिन अधिक आजमावण्यात आले असून, ते यशस्वी इंजिन आहे. त्यामुळेच डिझेल मॉडेलमधील मायलेजमध्ये या दोन कार अन्य स्पर्धकांना मागे टाकतात. सर्वात कमी मायलेज पोलोचे असून, प्रति लिटर २०.१४ केएमपीएल आहे. त्यानंतर आय २० कार २०.५४ केएमपीएल मायलेज देते. होंडाचे आयडीव्हीटेक असणारे १.५ लिटरचे डिझेल इंजिन २७.३० केएमपीएल मायलेज देत. त्यामुळे बलोनेची स्पर्धक हीच कार आहे. बलेनो या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी कार असून, प्रति लिटर २७.३९ केएमपीएल जाते. मायलेजमध्ये हा कंपन्यांनी केलेला दावा आहे. तरीही या कार प्रति लिटर १८ ते २१ केएलपीएल मायलेज देतात.

पेट्रोलमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी कार बलोनो असून, कारचे मायलेज प्रति लिटर २१.४० केएपीएल आहे. जॅझ प्रति लिटर १९ केएलपीएस, आय २० प्रति लिटर १८ केएमपीएल मायलेज देते. या सेगमेंटमधील सर्वाधिक कमी मायलेज देणारी कार पोलो असून, प्रति लिटर १६.४७ केएमपीएल मायलेज आहे. सर्व कारना १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन असून, आय २० १.४ लिटर इंजिनमध्येही उपलब्ध आहे.

बलेनो बाजारपेठेते येऊन बरेच महिने झाले आहेत. विक्रीच्या आकडेवारीवरून बलेनो, आय २० मध्ये स्पर्धा तीव्र असली तरी स्टाइलिंगबाबत आय २० बलेनोला मागे टाकते. एलआईट आय २० चे डिझाइन हे संपूर्ण बाजूने युरोपीय शैलीचे आणि रेसिंग कारशी मिळते जुळते आहे. त्यामुळे ही कार या सेगमेंटमध्ये सर्वाधिक स्टाइलिश आहे. या उलट बलेनोचे बोनेट म्हणावे इतके आकर्षक वाटत नाही. जॅझचे मॉडेल पूर्ण नवे असले तरी या सेगमेंटमध्ये कमी आकर्षक वाटणारे डिझाइन आहे. तसेच, पोलोचे डिझाइनही बरेच जुने असून, त्यात कंपनीने फार काही बदल केलेला नाही. मात्र, त्यावर जर्मन इंजिनिअरिंगची छाप नक्की आहे. बलेनोला काळा रंगाचे इंटिरीयर असल्याने आतून रचना आकर्षक वाटते. तसेच केबिन स्पेसही चांगली आहे. सर्वाधिक आकर्षक रचना व गुणवत्तेचा मेळ आय २० मध्ये दिसून येतो.  आय २० ही या सेगेंमधील सर्वात वेगळी कार असून, मायलेजबाबत थोडा विचार न करणाऱ्यांना व डिझाइन, परफॉर्मन्सचा विचार करणाऱ्यांनी या प्रीमियम हॅचबॅकचा विचार करावा. मात्र, कितना देती है विचारसरणी असणाऱ्यांसाठी बलोनो उत्तम आहे.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही

हा भारतीय बाजारपेठेत तयार झालेला नवा सेगमेंट आहे. यात मारुती ब्रेझा, महिंद्र टीयूव्ही ३००, फोर्ड ईको स्पोर्ट, होंडा डब्लूआरव्ही आहे. या सेगमेंटची सुरुवात ईको स्पोर्टने केली. त्यांनर अन्य मॉडेल लाँच झाली आहेत. मात्र, सध्या या सेगमेंटमध्ये ब्रेझाची कामगिरी दमदार असून, डब्लूआरव्ही नुकतीच लाँच झालेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ब्रेझाचे हँडलिंग उत्तम आहे, तर टीयूव्ही ३०० मध्ये सात आसनांचा पर्याय असल्याने ही जमेची बाजू आहे. अर्थात, ती किती आरामदायी आहेत, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे एसयूव्ही घेणाऱ्यांसाठी ब्रेझा ही नक्कीच एक चांगला पर्याय आहे. अर्थात, लवकरच टाटा मोटर्सन नेक्सॉन लाँच होत आहे. यास १.२ लिटरचे पेट्रोल व १.५ लिटरचे डिझेल इंजिन असून, सहा स्पीडचे इंजिन बसविण्यात आले आहे. एसबीएस, ईबीडीसारखी सुरक्षा फीचर स्टँडर्ड फीचर म्हणून दिली जाणार आहेत. तसेच, यामध्ये क्लायमेट कंट्रोल एसी, तीन ड्रायव्हिंग मोड (सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच), रिअर एसी व्हेंट, हार्मन कार्डन सिस्टिम (पहिल्यांदाच) दिली आहे. त्यामुळेच या सेगमेंटमधील वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर नेस्कॉनची टेस्ट ड्राइव्ह व यातील फीचर पाहूनच निर्णय घेणे योग्य राहील, असे वाटते. या सेगमेंटमधील गाडय़ा ७.३० लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहेत.

ls.driveit@gmail.com