News Flash

‘कार’ण  की..!

जगभरातील कार उत्पादक कंपन्यांना महत्त्वाचे इंजिन पुरविणारी कंपनी म्हणून फियाट कंपनीकडे पाहिले जाते

Electric car, CNG Cars ,Best Car Battery,
प्रतिनिधिक छायाचित्र

भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाहन चालवायचे की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात बॅरलचे दर कोसळलेले असले तरीही राज्य आणि केंद्र सरकार दर काही कमी करण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या सक्तीविषयीचे भाष्य प्रसारमाध्यमांतून लोकांच्या आणि कंपन्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न झाला; परंतु नवीन पर्याय वापरण्याचे उद्दिष्ट दूर असताना, अस्तित्वात असलेल्या आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक अशा एलपीजी आणि सीएनजीच्या उपलब्धतेकडे सरकारने आणि काही कंपन्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले नाही ना, अशी शंका घेण्यास वाव मिळत आहे.

एलपीजीचे पंप जवळपास सर्व जिल्ह्य़ांत पसरलेले आहेत. मात्र, एलपीजीचा वापर सुरक्षित नसल्याचे मत वाहनचालकांमध्ये बळाऊ लागले आणि सीएनजीचा पर्याय समोर आला; पण यात महत्त्वाची बाब अशी की, सीएनजीची उडी केवळ मुंबई परिसर आणि पुणे परिसरातच मर्यादित राहिली आहे. याच तुलनेत अमेरिका, युरोपमध्ये जवळपास सर्वच कंपन्यांच्या कार सीएनजी पर्यायात मिळतात. भारतात केवळ मारुती सुझुकी काही मोजक्या कारच सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध करत आहे. टाटा, ह्य़ुंदाई, होंडा या कंपन्यांनी एखाददुसरी कारच सीएनजी पर्यायात उपलब्ध केली आहे. याला कारणेही तशीच आहेत.

मुख्य शहरांबाहेर सीएनजी उपलब्ध होत नसल्याने आणि साहित्य ठेवण्याची जागाही गॅस टाकीमुळे व्यापली जात असल्याने ग्राहक सीएनजी कारकडे पाठ फिरवत असल्याचे कारण काही कंपन्या पुढे करत आहेत. तरीही मारुती सुझुकीसारखी कंपनी अल्टो, इको, के १०, सेलेरिओसारख्या मध्यमवर्गाला परवडणाऱ्या गाडय़ा सीएनजीवर उपलब्ध करत आहे. फोक्सव्ॉगन, फियाट, फोर्ड, होंडा, जनरल मोटर्ससारख्या कंपन्या मात्र त्यांच्याकडे परदेशांमध्ये उत्तम तंत्रज्ञान आणि विविध श्रेणींमध्ये सीएनजी कार असूनही त्या भारतात आणण्यामध्ये नकारात्मक भूमिका ठेवून आहेत. अमेरिका, युरोपमध्ये मर्सिडीज, व्होल्वोसारख्या कंपन्याही सीएनजी कार पुरवीत आहेत. मग भारतातच का नाही?

फियाट

जगभरातील कार उत्पादक कंपन्यांना महत्त्वाचे इंजिन पुरविणारी कंपनी म्हणून फियाट कंपनीकडे पाहिले जाते. या कंपनीचे इंजिनविक्रीतूनच एवढे उत्पन्न आहे की, त्यांना सध्या कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष घालण्याची गरज वाटत नाहीय. मात्र, काळानुसार बदलावे लागते, या उक्तीप्रमाणे फियाट कंपनीलाही पर्यायांची गरज भासणार आहे. मारुती सुझुकी ही कंपनी इंजिनच्या बाबतीत फियाटवर सध्या अवलंबून आहे. इंजिनवरच जास्त खर्च होत असल्याने मारुतीनेही आता स्वत:चे इंजिन बनविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर कंपन्यांचेही आहे. फियाटच्या नैसर्गिक स्रोतांवर चालणाऱ्या पुंटो, ग्रँडे पुंटोसारख्या ७ गाडय़ा आहेत.

ह्य़ुंदाई, रेनॉ, होंडा

ह्य़ुंदाई या कंपनीचा उत्पादन प्रकल्प चेन्नईला आहे. रेनॉचाही तिथेच आहे. तामिळनाडूमध्ये सीएनजीला परवानगी नसल्याने परवाना मिळत नाही. यामुळे सीएनजी कारची निर्मिती करत नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे, तर ह्य़ुंदाई कंपनी ग्रँड आय १०, एक्ससेंट या कारमध्ये डीलरच्या पातळीवर सीएनजी किट बसवून देत आहे. यामध्ये आधी गाडीची आरटीओ नोंदणी करायची आणि नंतर सीएनजी किट बसवून दिले जात आहे व किट बसविल्यानंतर पुन्हा आरटीओकडे वाहनचालकांना जावे लागत आहे, तर होंडा कंपनीकडेही सीएनजीवर केवळ अमेझ ही कारच उपलब्ध आहे.

फोक्सवॅगन

फोक्सवॅगनसारख्या कंपनीकडे उत्तम सीएनजी तंत्रज्ञान आहे. आठ किलो सीएनजी टाकीपासून २८ किलोच्या टाकीपर्यंत सीएनजी भरू शकतो, महत्त्वाचे म्हणजे गाडीतील लगेज स्पेसला काडीचाही धक्का न लावता. आश्चर्य वाटतेय ना? पण खरे आहे. कॅडी इकोफ्युअल नावाच्या कारमध्ये तब्बल ५ सिलिंडर बसविण्यात आले आहेत. ही गाडी एकदा सीएनजी भरला की कमीत कमी ५०० ते ७०० किमीचे अंतर कापू शकते. पसाट २१ किलो, टोरान २४ किलो, कॅडी २६/३७ किलो, गोल्फ १५ किलो, ट्रान्सपोर्टर २८ किलो अशा श्रेणींमध्ये कार अमेरिकन बाजारात विकल्या जातात. मात्र, हीच कंपनी भारतात केवळ पेट्रोल आणि डिझेल कार विकत आहे. या कारच्या सीटखाली सिलेंडरला जागा देण्यात आली आहे. यामुळे पाठीमागील लगेज स्पेस वाचते.

फोर्ड

ग्राहकांची सुरक्षितता अग्रभागी ठेवून भारतात आलेल्या या अमेरिकन कंपनीने सुरुवातीला सेवा पुरविण्यास टंगळमंगळ चालविली. याचा फटका या कंपनीला आजही बसत आहे. शिवाय सेवा खर्चही इतरांच्या तुलनेत जास्त होता. यामुळे आता कुठे ही कंपनी आपली काळवंडलेली छबी उजळवण्याचा प्रयत्न करत आहे. सीएनजीबाबत ही कंपनी देखभाल खर्च वाढेल, इंजिनला नुकसान पोहोचेल अशी काहीशी मानसिकता ग्राहकांमध्ये निर्माण करत आहे. फोर्डकडेही क्राऊन व्हिक्टोरिया, कंटूर, फ्युजन, फोकस, माँडीओ, कुगासारख्या ११ सीएनजीवर चालणाऱ्या गाडय़ा आहेत. तरीही ही कंपनी भारतामध्ये केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या कार विकत आहे.

मानसिकता बदलण्याची गरज

परदेशामध्ये व्होल्वोच्या आठ कार, मर्सिडीजच्या ३-४ कार सीएनजीवर उपलब्ध आहेत. मात्र, सीएनजीवर कार चालविणे हे भारतीय मानसिकतेत गरिबीचे लक्षण वाटते. यामुळे या आलिशान गाडय़ांमध्येच काय तर ५ ते ६ लाखांच्या वरील गाडय़ांमध्ये सीएनजी बसवून घेणे हे भारतीय ग्राहकांना कमीपणाचे वाटत आहे. यामुळे या पर्यावरणपूरक इंधन प्रकाराकडे वळण्यापेक्षा तुलनेने महाग आणि नुकसानकारक पेट्रोल आणि डिझेलकडे मानसिकता झुकत आहे.

निस्सान ईव्हीबाबत

निस्सान या जपानच्या कंपनीकडेही विजेवर चालणाऱ्या कारचे उत्तम तंत्रज्ञान आहे. त्यांच्या कार एका चार्जिगवर १०० ते तब्बल ६०० किमी धावू शकतात. अर्थात ६०० किमी धावणाऱ्या कारचे उत्पादन २०२० मध्ये सुरू होणार असले तरीही सध्या त्यांच्या ताफ्यात ४०० किमीपर्यंत जाऊ शकणाऱ्या कार आहेत. टोयोटाही साधारण एका चार्जिगमध्ये १००० किमीपर्यंत जाऊ शकणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानामध्ये सध्याच्या घडीला संशोधन सुरू असले तरीही हे तंत्रज्ञान भारतात यायला अजून १५ वर्षे उजाडण्याची शक्यता आहे.

दोन कंपन्या येणार, पण..

भारतात २०१९ च्या अखेपर्यंत ह्य़ुंदाईची उपकंपनी असलेली दक्षिण कोरियातील किया मोटर्स आणि चीनची सर्वात मोठी कंपनी शांघाय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉपरेरेशनची मालकी असलेल्या एमजी मोटर्सच्या कार येणार आहेत. यापैकी किया मोटर्सकडे सीएनजी कार आहेत; परंतु, भारताची बाजारपेठ पाहता या दोन्ही कंपन्यांकडून सीएनजी किंवा विजेवर चालणाऱ्या वाहनांची विक्री होणे अशक्यच आहे. चीन वायू प्रदूषणाच्या बाबतीमध्ये किती बदनाम आहे, हे काही सांगण्याची गरज नाही.

महिंद्रा, टाटा

स्वदेशी कंपन्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या महिंद्रा आणि टाटा कंपनीनेही सीएनजी पर्यायाकडे पाठच फिरविली आहे. डिझेल गाडय़ांच्या खपावर अवलंबून असलेल्या महिंद्राने खप कमी झाल्यावर इलेक्ट्रिक कारकडे लक्ष केंद्रित केले असले तरीही या कारची रेंज १०० किमीच्या वर नेण्यात अद्याप यश आलेले नाही, तर टाटा कारने नॅनो आणि इंडिका कार सीएनजी पर्यायावर उपलब्ध केली होती. मात्र, या कारना बाजारपेठ मिळवून देण्यात अपयशी ठरल्याने पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या श्रेणीवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

टेस्लाने चीनला कवटाळले

टेस्ला ही विजेवर चालणाऱ्या कारनिर्मिती कंपन्यांमध्ये आघाडीवर आहे. अमेरिकेमध्ये कमी काळात बस्तान बसविल्यानंतर अमेरिकेबाहेरील पहिला प्लांट निर्माण करण्यास टेस्लाने चीनला पसंती दिली आहे. यामुळे भारतामध्ये विजेवर चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या कार महागच मिळणार आहेत. त्यामुळे भारताच्या २०३० पर्यंत विजेवर चालणाऱ्या कारच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. महिंद्राची विजेवर चालणारी कार फार तर एका चार्जिगमध्ये १०० किमी जाऊ शकते. मात्र, टेस्लाची कार ३०० किमीपर्यंत जाऊ शकते. तसेच एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कंपनी थेट कारच्या यंत्रणेशी संपर्क करत काही प्रोग्राम बंद करून ही रेंज वाढवू शकते. नुकत्याच अमेरिकेमध्ये झालेल्या वादळावेळी ही सोय कंपनीने केली होती.

सरकारचे काय चुकतेय?

सीएनजीच्या उपलब्धतेबाबत सरकारची उदासीनता मुख्य कारण आहे. भारतात शहर आणि ग्रामीण भागातील विजेची उपलब्धता आणि भारनियमनाचे संकट पाहता २०३० पर्यंत कार विजेवर चालविण्याचे उद्दिष्ट कठीण दिसत आहे. सीएनजीचे वाहन हेदेखील एक आव्हान असले तरीही शेजारच्या गुजरात राज्यामध्ये ही समस्या सोडविण्यात आली आहे. बाहेर सीएनजी उपलब्ध होत नसल्याने सुरुवातीला सीएनजी वाहनांचा पर्याय स्वीकारणाऱ्या वाहनचालकांनीही आता पेट्रोल किंवा डिझेल वाहनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कंपन्यांकडे मागणी रोडावल्याने कंपन्यांनीही मागणी असेल तरच पुरवठा हे धोरण अवलंबिले आहे. नेमकी हीच बाब देशाच्या अर्थकारण आणि पर्यावरणाच्या मुळावर आली आहे. सीएनजी वापरासाठी केवळ शहरापुरतेच मर्यादित न राहता तो किमान तालुक्यांच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यास लोकांची गैरसोय दूर होईलच याचबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमालीचे घटेल. मात्र सरकार हातात असलेल्या पर्यायांचा विचार न करता भारनियमनाने झाकोळलेल्या देशात विजेवर कार चालविण्याची स्वप्ने पाहत आहे.

– हेमंत बावकर hemant.bavkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2017 4:05 am

Web Title: electric car cng cars best car battery
Next Stories
1 टॉप गीअर : टीव्हीएस स्टार सिटी प्लस
2 विद्युत वाहनांचे भविष्य
3 टॉप गीअर : बजाज प्लॅटिना
Just Now!
X