वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची समस्या हे एक मोठे दुष्टचक्र आहे. ते नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढवणारे ठरले आहे. वाहन निर्मित प्रदूषण कमी करणाच्या दृष्टीने वाहन निर्मात्यांवर सरकारने योग्य ते र्निबध घातले असून ते प्रसंगी कठोरही केले आहेत. उत्पादकांनीसुद्धा भविष्याची पावले ओळखून त्याला प्रतिसाद देत कमी प्रदूषण करणारी (पर्यावरणस्नेही) अशी यंत्रणा विकसित करून प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दशकभरात इलेक्ट्रिक कारचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. सरकार आणि कार निर्मात्या कंपन्या यासाठी प्रयत्न करत आहेत. या पाश्र्वभूमीवर भारतामध्ये या कारचे भविष्य काय असेल याचा घेतलेला आढावा.

आपल्या देशातील (विकसित शहरांमधील) वाहन निर्मित प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या साऱ्यांवर ठोस उपाय म्हणून आपल्या सरकारने शून्य प्रदूषण करणाऱ्या इलेक्ट्रिक कारला ‘चालना’ द्यायचे धोरण अवलंबिले आहे. इलेक्ट्रिक कार हा बदल जसा अनिवार्य आहे, तसाच तो आमूलाग्र अन क्रांतिकारी देखील ठरणार आहे. त्यामुळे ‘इलेक्ट्रिक कार’ हा विषय आबालवृद्धांच्या कुतुहलाचा तर उत्पादकांसाठी आव्हानात्मक तसेच काही पारंपरिक गोष्टींसाठी आणि व्यवसायांसाठी चिंतेचासुद्धा ठरणार आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

भारतात ‘इलेक्ट्रिक कार’ पहिल्यांदा आणली ती ‘मैनी मोटर्स’ने. ‘मैनी मोटार्स’ची ‘रेवा’ ही २ आसनी छोटेखानी सिटी कार १९९७-१९९८ साली रस्त्यावर दिसू लागली. यथावकाश ‘रेवा’ प्रकल्प उद्योगपती आनंद महिंद्र यांनी खरेदी करून आपल्या वाहनांच्या ताफ्यात समाविष्ट केली. ‘रेवा’ आणि तिच्या तंत्रज्ञानावर संस्कार करून महिंद्रा नाममुद्रेची पहिली इलेक्ट्रिक कार रस्त्यावर यशस्वीरीत्या आणली.

आजवर प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने जगभर वाहन उत्पादक नवनवीन साधने, उपसाधने आपल्या प्रचलित इंजिन्सना जोडून पर्यावरणस्नेही वाहने बनवत होते. काही आघाडीचे उत्पादक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली वाहने कमी प्रदूषण करतात असे आभासी चित्र उभे करून अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात मोठी फसवणूक केल्याने शिक्षेसही पात्र ठरले आहेत.

आजवर प्रचलित असलेले अंतर्गत ज्वलन (इंटरनल कॉमब्युस्टेशन) पद्धतीचे इंजिन आणि वेगवेगळ्या प्रकारचे गिअर बॉक्स या साऱ्याला छेद देणारी अशी यंत्रणा इलेक्ट्रिक कारमध्ये असणार आहे.

कारची बॅटरी 

यशस्वी ठरलेल्या टेस्ला कारमधील बॅटरीविषयीची ज्ञात माहिती अशी आहे की, गाडीच्या फ्लोरिंगला एक बॅटरी बेड जोडलेला असतो. ज्यात साधारणत: शीतपेयाच्या टीनच्या आकाराचे ६ ते ७ हजार सेल्स एकमेकांशी सिरीज अथवा समांतर पद्धतीने जोडलेले असतात. सदर बॅटरी थंड ठेवण्यासाठी रेडिएटर असलेली कूलिंग पद्धती (वॉटर कूल) वापरलेली असते. इलेक्ट्रिक कारमध्ये लिथीयम-आयन (एलआय-आयन) धातूची बॅटरी वापरतात. वजनदार बॅटरी बेड गाडीच्या फ्लोरिंगला जोडल्याने गाडीला स्थिर होण्यास मदत मिळते. व गाडीचा गुरुत्व मध्यही खाली येतो. (सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट). टेस्ला गाडीत वापरल्या जाणाऱ्या बॅटरीज एकदा चार्ज केल्यानंतर किमान ३५० किमी अगदी सहज चालतात. भारतात सरकारने निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे इलेक्ट्रिक कारची बॅटरी किमान १३० किलोमीटर चालणे आवश्यक आहे. लिथियम आयन बॅटरीजवर तापमान आणि आद्र्रतेचा परिणाम होत असून जास्त तापमानात त्यांची कार्यक्षमता कमी असते. थंड हवेच्या प्रदेशात या बॅटरी अधिक कार्यक्षम ठरतात.

कारचे इंजिन

इंजिनमध्ये एक इंडक्शन मोटर वापरलेली असते. (या मोटरचा शोध १८८७ साली ‘निकोला टेसला’ यांनी लावला) सदर मोटर एसी (अल्टरनेटिव्ह करंट) द्वारे चालते. गाडीच्या बॅटरीमधून डीसी (डायरेक्ट करंट) पाठवला जातो. मोटरसोबत एक इन्व्हर्टर जोडलेला असतो. हा इन्व्हर्टर बॅटरीत साठवलेला डीसी पुरवठा एसीमध्ये रूपांतरित करून इंडक्शन मोटरला देतो. त्याद्वारे मोटर चालायला लागते. सदर मोटरला एक सिंगल स्पीड गिअर बॉक्स आणि डिफ्रेन्शिअल जोडलेले असते. त्याद्वारे गती प्रत्यक्ष गाडीच्या चाकांपर्यंत पोहोचवली जाते.

कारचा मेंटेनन्स आणि कामगिरी

इलेक्ट्रिक कारमध्ये प्रस्थापित इंजिनच्या ऐवजी इंडक्शन मोटर इंजिनचे काम करते. याच प्रमाणे स्टार्टर, गिअर बॉक्स प्रचलित पद्धतीचे ब्रेक्स, लुब्रिकंट नसल्याने गाडीच्या देखभालीचा खर्च हा अत्यल्प असतो. आणि २ सव्‍‌र्हिसिंगमधील कालावधी (सव्‍‌र्हिस इंटरवल) जास्त असतो. इलेक्ट्रिक कारमध्ये फक्त ब्रेक आणि अ‍ॅक्सेलरेटर पेडेल येते. क्लच पेडेल येत नाही.  क्रॅश टेस्टमध्ये इलेक्ट्रिक कार अधिक सक्षम आणि सुरक्षित मानली गेली आहे. पेट्रोल, डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारचा पिकअप हा दुप्पट असतो. त्याचप्रमाणे टोर्कही अधिक मिळते. सद्य:स्थितीत नॉर्वे, स्वीडन आणि अन्य युरोपियन राष्ट्रांमध्ये अंदाजे १५ टक्के गाडय़ा इलेक्ट्रिक कार्स आहेत. इलेक्ट्रिक कारची बॅटरी चार्ज व्हायला सध्या ४० मिनिटे लागतात. एकदा चार्ज केल्यानंतर गाडी ३०० ते ३५० किमीपर्यंत थंड हवेच्या प्रदेशात चालते. चार्जिगसाठी लागणारा वेळ कमी व्हावा अन एकदा चार्ज केल्यानंतर गाडी किमान ५०० ते ६५० किमी चालावी यासाठी तंत्रज्ञान विकसित होत असून येत्या १-२ वर्षांत तसे दृश परिणाम दिसू लागतील.

रिजनरेटिव्ह ब्रेक्स

इलेक्ट्रिक कारमध्ये चारही चाकांच्या जवळ इलेक्ट्रिक मोटर यंत्रणा लावलेली असते. स्लो स्पीड ब्रेकिंग किंवा टॉप अ‍ॅण्ड गो ट्राफिकच्या वेळी ब्रेक दाबल्यानंतर चाकाला जोडलेल्या मोटर मध्ये विद्युत विकर्ष रेषा भंग पावल्याने गतीज ऊर्जेतून (कायनेटिक ऊर्जा) वीज निर्मिती होते. सदर वीज बॅटरीत (विद्युत विघटन होऊन) साठवली जाते याला रिजनरेटिव्ह ब्रेक असे म्हणतात.

भारत सरकारला १० हजार इलेक्ट्रिक गाडय़ा (६००० टाटा टिगोर आणि ४ हजार महिंद्रा वेरिटो) भारतीय उत्पादक येत्या २ ते ३ वर्षांत देणार असून त्यादृष्टीने गाडय़ांची निर्मिती सुरू झाली आहे. तसेच इलेक्ट्रिक बस (अशोक लेलॅण्ड आणि टाटा मोटर्स)च्या प्राथमिक टप्प्यातील चाचण्या सुरू असून, लवकरच त्या रस्त्यावर धावताना दिसतील. पिआजिओ नामक सुप्रसिद्ध कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू करीत असून येथून इलक्ट्रिक स्कूटरची निर्यात देखील होणार आहे. काळाची पावले ओळखून मारुती सुझुकी इंडियाचा इलेक्ट्रिक कारसाठी लागणाऱ्या बॅटरीचा प्रकल्प गुजरातमध्ये निर्माण होत असून मारुतीची इलेक्ट्रिक गाडी निर्माण होण्यासाठी लागणारा तंत्रज्ञान विकास आणि टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे.

वाहन निर्मिती क्षेत्रात खरोखरच आमूलाग्र बदल घडविणाऱ्या विद्युत गाडीची किंमत किती असेल? ती खरोखरच बॅटरी चार्ज केल्यानंतर किती किमी धावेल? भारतातील रस्त्यांची परिस्थिती पाहता ती खरोखरच सक्षम असेल का? असे अनेक प्रश्न सामान्य ग्राहकाला पडलेले दिसतात. मात्र अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले तरी येणाऱ्या दशकात विद्युत वाहनांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल, यात तिळमात्र शंका नाही.

आपले सरकार २०३० पर्यंत विद्युत वाहने रस्त्यावर दिसतील असे स्वप्न पाहत आहे. प्रदूषणमुक्त भारतासाठी सारेच आग्रही आहेत. असायलाही हवेत, पण काही गोष्टी मात्र मनात अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करत आहेत.

  • किफायतशीर दर आणि अत्यल्प प्रदूषण म्हणून सीएनजी इंधनाची वाहने आली पण सीएनजी इंधनाची मागणी आणि पुरवठा यातील तफावत इतकी आहे की पंपावर किमान एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागते.
  • आपल्या देशात विजेचीसुद्धा मागणी अन पुरवठा यातील तफावतीने लोड शेडिंग आजही चालू आहे. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रावर आधीच चिंताजनक स्थिती आहे.
  • त्यात इलेक्ट्रिक कारची भर पडल्यास तिला लागणारी वीज कुठून आणायची? त्यासाठी बहुदा अपरंपरागत ऊर्जास्रोत वापरण्यासाठी खर्चिक स्वरूपाच्या पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतील.
  • कार चार्जिग स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी सारख्या व्होल्टेजची वीज उपलब्ध असेल का?
  • खनिज तेलावर चालणाऱ्या गाडय़ांची निर्मिती थांबेल की मंदावेल?
  • खनिज तेलाचा वापर कमी झाल्याने अगदी पेट्रोलपंप मालक ते तेल उत्पादक राष्ट्रे काय भूमिका घेतील? इलेक्ट्रिक कारला ते किती अन कसा विरोध करतील?
  • विद्युत वाहन निर्मिती क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञ (आर.सी.भार्गव) यांनी १०० टक्के इलेक्ट्रिक गाडी यशस्वी होण्याच्या दृष्टीने शंका उपस्थित केली असून, सद्य:स्थितीत हायब्रीड इंजिन प्रकारातील गाडय़ा हा सर्वार्थाने योग्य पर्याय आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे.

ls.driveit@gmail.com