पुढील महिन्याच्या सुरुवातीला नोइडा येथे ऑटो एक्स्पो सुरू होणार आहे. जगभरातील वाहननिर्माते या एक्स्पोमध्ये नवनवीन वाहनांचे सादरीकरण करणार आहेत. मारुती सुझुकीही त्यांच्या बहुप्रतीक्षित व्हितारा ब्रेझा या गाडीचे अनावरण करणार आहे. त्यानिमित्ताने मारुती सुझुकीचे मुख्य अभियंता सी. व्ही. रमन यांच्याशी साधलेला संवाद..
* व्हितारा ब्रेझाच्या निर्मितीमागे मुख्य अभियंता म्हणून आपली आणि संशोधन व विकास विभागाची भूमिका काय होती?
* व्हितारा ब्रेझाबाबतचे संशोधन आणि निर्मिती हे मारुती सुझुकीच्या संशोधन व विकास विभागासाठी आजपर्यंतचा मैलाचा दगड ठरली आहे. आमच्यापुढे गुणवत्ता आणि गाडीचा विकास करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र ते पेलण्यात आम्ही यशस्वी झालो. गाडीची संरचना आणि वैशिष्टय़े कंपनीला साजेशी आहेत.
* मारुती सुझुकीची भारतातील संशोधन व विकास विभागाचा प्रवास कसा झाला?
* गेल्या १५ ते १७ वर्षांमध्ये आमच्या संशोधन व विकास विभागाने खूप विकास केला. काही वर्षांपासून सुझुकीसोबत काही जागतिक दर्जाच्या गाडय़ांवरही काम केले आहे. भारतात २०१२ मधील अल्टो आणि २०१४ मधील अल्टो के १० च्या मॉडेलवर आम्ही काम केले आहे. दोन्ही गाडय़ांची रचना, बांधणी आणि नमुना आम्ही येथेच केले आहेत. मात्र त्याला मान्यता आणि चाचणी आमचे रोहटकचे संशोधन व विकास केंद्र तेव्हा अस्तित्वात नसल्याने एसएमसीला करावे लागले. आता सारे काही रोहटकवरूनच चालते.
* व्हितारा ब्रेझाची भारतामध्येच चाचणी झाली आहे, असे म्हणता येईल का?
* व्हितारा ब्रेझाची पूर्ण चाचणी भारतात झाली आहे. फक्त विंड टनेल चाचणी आणि दीर्घकालीन गंजविरोधकता याची चाचणी आपल्याकडे सुविधा नसल्याने बाहेर करावी लागली. बाकी सर्व रोड टेस्ट, अपघातसारख्या चाचण्या रोहतकलाच केल्या.
* ब्रेझा प्रकल्पाचा कालावधी, रचना आणि प्रमाणीकरण काय होते?
* व्हितारा ब्रेझाचा प्रकल्प २०१२ मध्ये सुरू केला. पूर्ण होण्यास साडेतीन वर्षे लागली.
* या प्रकल्पावर काम करताना कोणत्या अडचणी आल्या?
* व्हितारा ब्रेझा ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही या प्रकारामध्ये मोडते. गाडी दणकट आणि सुंदर दिसणारी असायला हवी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात होती. यासाठी आम्ही प्रयत्न केले. व्हिताराला १६ इंचांचे अलॉय आणि आकर्षक लुक दिला आहे. मारुती स्टुडिओमध्ये याचे डिझाईन बनविण्यात आले. यासाठी सूचना स्थानिक ग्राहक आणि मारुतीशी संबंधित तज्ज्ञांकडून घेण्यात आल्या. हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यामध्ये सुझुकीने सहभाग घेतला नव्हता. सर्व मंजुऱ्या स्थानिक पातळीवर घेण्यात आल्या. मात्र यासाठी सुझुकीची जागतिक दर्जाच्या गाडय़ांसाठी वापरण्यात येणारी प्रणाली आणि नियम पाळण्यात आले.
* बोलेरोसारखी ब्रेझाची निर्यात करण्याचा मानस आहे का?
* व्हितारा ब्रेझा हे जागतिक दर्जाचे मॉडेल आहे. मात्र आम्ही प्रथम स्थानिक बाजारपेठेला महत्त्व देणार आहोत. त्यानंतर उजव्या बाजूला चालक असलेल्या बाजारपेठांवर लक्ष पुरविणार आहोत. तसेच आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमध्ये ही कार बाजारात आणणार आहेत.
* हा अनुभव गाठीला असताना तुम्ही जागतिक स्तरावरील वाहननिर्मितीसाठी प्रयत्नशील व्हाल का?
* गेल्या काही वर्षांपासून आम्ही सुझुकी इंजिनीअरिंग सोबत एकत्र काम केले आहे. जागतिक स्तरावर काम करण्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मारुती आणि सुझुकीच्या संशोधन व विकास विभागाच्या टीम वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात. सुझुकीने २०२० पर्यंत २० नव्या गाडय़ा बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी किमान १५ गाडय़ा भारतात उतरविण्याची शक्यता आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करणार आहोत. व्हितारा ब्रेझाच्या निर्मितीतून खूप काही शिकायला मिळाले.
* ब्रेझाचे लाँचिंग आधीच करता आले असते?
* हा प्रश्न प्राधान्याविषयीचा आहे. गेल्या दोन वर्षांत मारुतीने चांगल्या कार बाजारात आणल्या आणि त्या स्थिरावल्याही. आम्ही एकत्र काम नाही केले, तर आम्ही एवढय़ा प्रमाणात कारची मॉडेल्स आणू शकत नाही. या काळातच आम्ही हा प्रकल्प सुरू केला. मात्र परीक्षणासाठी आम्ही कार सुझुकीकडे पाठविली नाही. आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे आणि शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
* आरअँडडी विभागात किती कर्मचारी आहेत?
* दहा वर्षांपूर्वी आमच्याकडे ३०० जण होते. आता ही संख्या १३०० झाली आहे. संख्या किती आहे ते महत्त्वाचे नसून गुणवत्ता आणि अनुभव महत्त्वाचा ठरतो.
* ऑटो एक्स्पोचा विषय कायापालट आहे. कंपनी आणि ग्राहक यांच्या कायापालटाविषयी काय सांगाल?
* सध्या बाजारात १८ ते १९ उत्पादने आहेत. ९०च्या दशकात हे प्रमाण ५ ते ७ होते. २००० सालामध्ये बाजारपेठेने एक दशलक्षचा आकडा पार केला, मात्र तोही खूप उशिराने. सध्या भारतीय वाहननिर्मिती क्षेत्र २.७ दशलक्षावर पोहोचले आहे. २०२० पर्यंत ते ४.४ दशलक्षावर पोहोचण्याचा अंदाज आहे. यामध्ये आम्ही सिंहाचा वाटा उचलणार आहोत.
गेल्या १५ वर्षांमध्ये ग्राहक बदलला आहे. यापूर्वी ‘एका कुटुंबासाठी एक कार’ अशी मानसिकता होती. आता प्रत्येक सदस्यासाठी कार हवी आहे. त्याचबरोबर कार दणकट, आकर्षक, सुरक्षित आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त घेण्याकडे कल वाढला आहे. ग्राहकासाठी सर्वसमावेशक तंत्रज्ञानयुक्त गाडी देणे कंपन्याची गरज बनली आहे. स्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टम, एजीएस, एसएचव्हीएस यांसारखी तंत्रज्ञान आम्ही निर्माण केले आहे. ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये बूस्टजेट हे तंत्रज्ञान आम्ही मांडणार आहोत. ही बलेनो आरएस या कन्सेप्ट कारची आणि नव्या पिढीच्या ग्राहकासाठी बनविलेली संकल्पना आहे. बाजारपेठ वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये विस्तारत चालली आहे. आम्हीही त्यापर्यंत पोहोचू, पण परवडण्याजोगे तंत्रज्ञान घेऊन.
प्रतिनिधी – ls.driveit@gmail.com