स्टिअिरगच्या मधोमध लाल-पिवळ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर असलेला विंचू अर्थात स्कॉर्पिअन तुमचं लक्ष वेधून घेतो. धडधाकट बॉडी आणि दणकट इंजिन, स्पोर्ट्स कारसाठी आवश्यक असलेले सारे काही गुण इथे एकवटतात आणि तब्बल १४५ ब्रेक हॉर्स पॉवर्सची सर्व ताकद एकवटून गाडी सुसाट धावू लागते.. हीच मजा आहे या इटालियन सौंदर्यवती अर्थात इटालियन ब्युटीची..
भलामोठ्ठा रस्ता, त्यावर आखलेल्या मार्गिका, या माíगकांमधून सुसाट वेगाने धावणाऱ्या गाडय़ा, पुढच्या गाडीला मागे टाकण्यासाठी झपकन माíगका बदलणाऱ्या गाडय़ा, अशा या वेगवान घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर रस्त्याच्या बाजूला जागोजागी लावलेले वेगाच्या नियमांचे पालन करा, असे सांगणारे सूचनाफलक उगाचच केविलवाणे भासू लागतात. केविलवाणे अशासाठी की हे सूचनाफलक आपल्या सुरक्षेसाठीच आहेत, हेही कोणाच्या गावी नसते.. वेगवान गाडी हातात असली की असे होतेच. अ‍ॅक्सिलेटरवरचा पाय बाजूला करावासाच वाटत नाही.. त्यात तुमच्याकडे सर्वोत्तम हॅचबॅक असेल तर मग काय पाहणं..
सर्वोत्तम हॅचबॅक? होय, भारतातली सर्वोत्तम हॅचबॅक.. अबार्थ पुन्टो..
फियाटने गेल्या वर्षी सणासुदीच्या काळातच अबार्थ पुन्टो बाजारात आणली. आपल्याच पुन्टो या हॅचबॅकचे सुधारित रूप बाजारात उतरवण्याची फियाटची ही खेळी कमालीची यशस्वी ठरली आहे. रूपवान, स्टायलिश आणि प्रचंड ताकदवान असलेल्या पुन्टोच्या या नव्या अवताराला कारप्रेमींची पसंती मिळाली नसती तरच नवल. गाडी सुरू केल्यापासून अवघ्या आठव्या सेकंदाला अबार्थ पुन्टो शून्य ते १०० किमी प्रतितास एवढा वेग घेऊ शकते.. मग अशा या वेगवान गाडीला शहराच्या वाहतूककोंडीतच का गुंतवून ठेवायचे.. अशा गाडय़ांसाठी वर उल्लेखल्याप्रमाणे मोकळाढाकळा रस्ता आणि त्यावर शिस्तीत आखलेल्या माíगका हेच जास्त आव्हानात्मक ठरत असते आणि त्यांची जागा तिथेच आहे. अबार्थ पुन्टोही त्याला अपवाद ठरली नाहीच.
१४५ बीएचपी पॉवर्सचे इंजिन, १३८६ सीसीचे इंजिन आणि पाच मॅन्युअल गीअर्स या ताकदीवर सहज सफर करणारी अबार्थ पुन्टो अर्थातच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. त्यात तिचे रंगरूप तर एकदम ऑसमच.. पांढऱ्या रंगावर गाडीच्या बॉनेटवरील एअरोडायनामिक अँगलपासून निघालेला लाल रंगाचा फर्राटा टपावरून थेट मागच्या साइडला उतरलेला. आणि दोन्ही साइडला तोच लाल रंगाचा फर्राटा, दोन्ही साइड मिररचा रंगही लालच, तर फॉग लाइट्सची शेडही तीच. चाकांच्या मधोमध असलेले मेटलही लालच. पुढे बॉनेटला लाल-पिवळ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर असलेला काळाकभिन्न रंगाचा विंचू, अर्थात अबार्थचा लोगो आणि चाकांच्या मधोमध असलेल्या मेटलवरही तोच तो काळाकभिन्न विंचू.. या सर्व बा’ाावताराने पाहताक्षणीच या गाडीच्या प्रेमात पडतो आपण.
शिवाय डायमंड कट अलॉय व्हील्स, उंच असा ग्राऊंड क्लिअरन्स आणि भलीमोठी बूट स्पेस या गोष्टींनी अबार्थचा लूक आणखी खुलतो.
गाडीत प्रवेश केल्यावर तिच्यातील साधेपणा लगेच लक्षात येतो. मात्र, असे असले तरी हिच्या साधं असण्यावर जायचं काहीच कारण नाही. कारण एकदा का गाडी तुमच्या हातात आली की, तिचं रूप पालटतं. तुम्ही फक्त गीअर बदलायचा अवकाश की गाडी सुसाट निघाली म्हणून समजा. बरं गाडीचा वेग वाढावा यासाठी तुम्हाला काही कष्ट करावे लागतच नाहीत. अगदी सेकंड गीअरपासूनच याचा अनुभव यायला लागतो. पाच हजार आरपीएम एवढय़ा क्षमतेची ही गाडी रस्त्यावरून क्रूझ करू लागते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती न ठरो.
गाडीचा डॅशबोर्ड फार काही आकर्षक नाही शिवाय त्याच्यावरील फीचर्सही तेच आहेत जे पुन्टोमध्ये आहेत. मागील बाजूला बसणाऱ्यांसाठी एसीचे रिअर व्हेंट देण्यात आले आहेतच शिवाय बाकीच्या सुविधा म्हणाल तर एअरबॅग्ज, एबीएस, कपहोल्डर्स, ऑक्झिन सिस्टीम वगरे तर आहेतच. मुख्य वैशिष्टय़ आहे या गाडीचे पॉवरबाज इंजिन. गाडी वेगवान असली म्हणजे तिचे इंजिन आवाज करते, कुरकुरते वगरे किंतु उपस्थित केले जातात. अबार्थच्या बाबतीत मात्र ही शंकाही मनात आणायला नको. गाडीचा वेग कितीही असला तरी इंजिनाचा आवाज येत नाही..
गाडी आतून स्पोर्ट्स कार भासते. अर्थात तिचे निर्माते स्पोर्ट्स कारच्या निर्मितीसाठीच प्रसिद्ध आहेत म्हणूनही असेल, परंतु अबार्थ पुन्टो एखाद्या स्पोर्ट्स कारपेक्षाही काही कमी नाही. रस्त्यावर राज्य करण्यासाठीच तिची निर्मिती झाली आहे. इंधन टाकी पूर्ण क्षमतेने भरली तर तुम्ही नक्कीच लाँग ड्राइव्हसाठी निश्चिंत होऊ शकता. हिचा मायलेज किमान १४ ते १६ किमी प्रतिलिटर एवढा आहे. डिस्क ब्रेक सिस्टीमही आहे आणि सुरक्षाकवच तर आहेतच अबार्थमध्ये. मागे तिघे आणि पुढे दोघे (अर्थात ड्रायव्हरसह) असे पाच जण आरामात यातून प्रवास करू शकतात. फियाटच्या लिनिया, पुन्टो, पुन्टो इव्हो या गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तसाच अबार्थलाही मिळतो आहे. दहा लाखांच्या आसपासची ही ताकदवान हॅचबॅक खरोखरीच उत्तम आहे.

अबार्थ काय आहे?
कार्लो अबार्थ यांनी १९४९ मध्ये इटलीमध्ये अबार्थ या कंपनीची स्थापना केली. रेसिंग कारची निर्मिती हे या कंपनीचे मुख्य काम. आता अबार्थ फियाट ख्रायस्लर ऑटोमोबाइल्स यांचा एक भाग आहे. फियाटसाठी स्पोर्ट्स कार तयार करणे तसेच त्यांची अंतर्गत रचना करणे वगरेची जबाबदारी सध्या अबार्थकडे आहे.

विनय उपासनी vinay.upasani@expressindia.com