सद्य:स्थितीत कार तयार करणे हे सोपे राहिलेले नाही. स्पर्धेत उतरणारे आणि नफ्यात कमी वाटा राखणारे हे एक भिन्न क्षेत्र आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत तर ते आहेच. मात्र एकदा का तुमची या क्षेत्रात घडी बसली की त्याचे परतावे तुम्हाला भिन्न मार्गाने मिळू शकतात. यासाठी तुम्हाला नावीन्यपूर्ण वाहने आणि तेही स्पर्धकांच्या तुलनेत अधिक आकर्षक तयार करणे गरजेचे आहे. जेणे करून खरेदीदार अशा वाहनांना पसंती देतील. अशा उत्पादनांची, वाहनांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करावयाची तर त्यासाठीची रक्कमही त्याच प्रमाणात लागणार, हेही तेवढेच खरे. त्यासाठी सहकार्य असेल तर उत्तम. कार तयार करण्याच्या व्यवसायात दोन नवे खेळाडू येऊ घातले आहेत. त्यांचा व्यवसाय हा २०० अब्ज डॉलर व ६०० अब्ज डॉलरचा असेल.
मी कुणाबद्दल बोलतोय माहितीय? गुगल आणि अ‍ॅपल!
हो. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या दोन अव्वल कंपन्या वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. पैकी पहिली कंपनी आहे सॉफ्टवेअर तर दुसरी मोबाइल क्षेत्रातील. तेव्हा त्यांच्यासाठी पायाभूत सेवा क्षेत्रातील गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे. हे उभय कंपन्यांनी आधी केलेले आहेच. पर्यावरणपूरक अथवा अधिक वेग, इंधन क्षमता देणारे वाहन तयार करण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांपुढे नाहीच. तर त्यांच्यापुढे भविष्यातील कारनिर्मितीचे आव्हान आहे. त्यांची ही कार विजेरी तर असेलच शिवाय ती स्वयंचलित असेल! अ‍ॅपलने तर यासाठी गेल्या वर्षी हजारो अभियंते कंपनीत दाखल करून घेतले. तर गुगलने याची चाचणीही सुरू केली आहे. स्मार्टफोनवर तिचे अधिकाधिक परिचलन होईल. आता बोला..
pranav.sonone@gmail.com