गेल्या १०० वर्षांत कारनिर्मिती क्षेत्रात उत्क्रांती झाली आहे. सुरुवातीला वाहतुकीचे एक साधन म्हणून असलेला हा पर्याय प्रत्येकाच्या वैयक्तिक भावनेशी जोडला गेला. तांत्रिक बाबतीत सिंगल सिलिंडर वन हॉर्सपॉवर इंजिन ते मल्टी सिलिंडर १,००० हून अधिक हॉर्सपॉवर इंजिन असे त्यात मोठय़ा प्रमाणात बदल होत गेले. फार वर्षांपूर्वीची कार आणि आताची कार यात सध्या प्रचंड तफावत आहे.

काळाच्या ओघात वाहन प्रकारातही बदल घडले. आज वाहन प्रकार दिसतात तेवढे पूर्वी तर नव्हतेच. हॅचबॅक, सेदान, स्पोर्ट असे निवडक वाहन श्रेणी त्या वेळी असे. आताचे चित्र वेगळे आहे. डिझाइन, इंजिनाबाबत सध्या येणाऱ्या नवनव्या वाहनांना खरेदीदार पसंती देत आहेत. नव्या डिझाइन, उत्कृष्ट इंजिन याचबरोबर वेगळ्या गटातील वाहनांनाही ते प्रतिसाद देत आहेत. आधीच्या प्रमुख तीन गटाव्यतिरिक्त आता कॉम्पॅक्ट हॅचबॅक, लक्झरी हॅचबॅक, इंडियन कॉम्पॅक्ट सेदान, एन्ट्री लेव्हर सेदान, लक्झरी सेदान, मल्टिपर्पज व्हेकल, कॉम्पॅक्ट एसयूव्ही, लक्झरी एसयूव्ही, अर्बन एसयूव्ही अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत. ही यादी आणखी मोठी आहे. त्यात दिवसागणिक भरच पडत आहे. अशीच एक उल्लेखनीय वाहन श्रेणी आहे, ती म्हणजे हॅचबॅक क्रॉसओव्हर.

मला प्रामाणिकपणे वाटते की, भारतीय वाहन बाजारपेठेत ही श्रेणी काहीशी अनावश्यकच आहे. चार मीटरच्या आतील गटातील हे वाहन. एरवीच्या हॅचबॅकसारखेच. त्याच्या चारही बाजूने प्लास्टिक पॅनल. त्याचा ग्राऊंड क्लिअरन्स केवळ दोन ते तीन सेंमीने वाढविलेला. थोडाफार आकर्षक लूक. रंग, डॅशबोर्ड, सीट, दरवाजे तसेच अंतर्गत रचनेत थोडासा अधिक आकर्षितपणा. एवढे सोडले तर त्यात वेगळे ते काय?

भारतीय ग्राहक हे एसयूव्ही वाहनांना अधिक पसंती देतात. अधिक ग्राऊंड क्लिअरन्स असलेली, उंच सीट असलेल्या वाहनांना त्यांच्याकडून अधिक मागणी असते. थोडेसे बदल आणि अधिकाधिक प्लास्टिकचा वापर यामुळे वाहन अधिक आकर्षक होते. मात्र वाहन जेवढे वजनदार तेवढेच ते इंधनाच्या बाबतीत आर्थिकदृष्टय़ा न परवडणारे. कोणत्याही हॅचबॅक वाहनापेक्षा हे कॉसओव्हर हॅचबॅक वाहन अधिक महागडे. अद्याप एसयूव्हीच लोकांकडून पूर्णत: मान्यताप्राप्त झालेले नाही. अर्थात त्यासाठी येथील रस्ते, वाहतूक स्थितीही कारणीभूत आहे. म्हणूनच हॅचबॅक क्रॉसओव्हरकडेही तेवढे आकर्षित होणे आपल्याला जमलेले नाही. तेव्हा आपली नेहमीची हॅचबॅक किंवा थेट एसयूव्हीच बरी.

pranavsonone@gmail.com