12 December 2017

News Flash

टॉप गीअर : हिरो मोटोकॉर्प माइस्ट्रो एज..

कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाने काम केल्याचे स्कूटरकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येते.

ओंकार भिडे | Updated: September 22, 2017 2:29 AM

हिरो मोटोकॉर्प ही प्रामुख्याने मोटरसायकल उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जात असली तरी कंपनी स्कूटर म्हणजे गिअरलेस स्कूटरच्या बाजारपेठेत आपले स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच कंपनीने डय़ूएट व माइस्ट्रो एज या दोन गिअरलेस स्कूटर बाजारपेठेत उतरविल्या आहेत. दोनही स्कूटर गेल्या दोन वर्षांत लाँच झाल्या असून, कंपनीच्या या स्कूटरना प्रतिसाद मिळत आहे. यातील माइस्ट्रो एज ही स्कूटर पुरुष ग्राहकवर्ग डोळ्यापुढे ठेवून बनविण्यात आली आहे. होंडापासून विभक्त झाल्यावर लाँच झालेली पहिली स्कूटर आहे. कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाने काम केल्याचे स्कूटरकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येते.

स्टाइल व फीचरबाबतही बऱ्याच गोष्टी नवीन आहेत. एकूण स्कूटरला मस्क्यूलर लुक देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. पुढील बाजूकडे पाहिल्यावर ते जाणवतोही. फ्रंट मडगार्ड, हेट लॅम्प, बॉडीलाइनकडे पाहून मोटोस्कूटरचा आभास होतो. तसेच, बाजनेही स्कूटर आकर्षक वाटते. साइड पॅनल्सवर काही लाइन्स देण्यात आल्या आहेत. तसेच, नव्या बॉडी ग्राफिक्समुळे डय़ुएल टोन स्कूटरला असल्याचे वाटते. कंपनीने पुढे व मागे अलॉय व्हील दिले आहे. मात्र, दोन्हींमध्ये फरक असून, पुढील बाजूस १२ इंच इंच व मागील १० इंचाचे अलॉय व्हील दिले आहे. कंपनीने असे का केले हे स्पष्ट होत नाही. खरं तर मागील चाक पुढील चाकापेक्षा आकाराने मोठे असते. मात्र, या स्कूटरचे चाक त्याला अपवाद आहे. अन्य स्कूटरच्या तुलनेत मायस्ट्रो एजचा एक्झॉस्ट जरा वेगळा असून, त्याला रंगही टिटानियम ग्रे दिला आहे. फूट रेस्ट अल्युमिनियमची असून, रिअर ग्रॅबरेल बॉडी कलरमध्ये आहे. कंपनीने क्रिस्टल क्लिअर इंडिकेटरसह एलईडी टेल लॅम्प दिले आहेत. त्यामुळे स्कूटरमध्ये एक प्रीमियम फील देण्याचा प्रयत्न केल्याचे वाटते.

फीचर्सविषयी

कंपनीने ग्राहकांना आपल्याकडून अधिक काय देता येईल, याव विचार केल्याचे यातील फीचर पाहून लक्षात येते. सेमी-डिजिटल ट्रीम मीटर, साइड स्टँड इंडिकेटर, सव्‍‌र्हिस रिमांडर, इंजिन इममोबिलायजर, एक्स्टरनल फ्यूएल फिलर, स्टोरेजच्या आतमध्ये छोटासा दिवा, मोबाइल चार्जिग पॉइंट दिला आहे. याच जोडीला टय़ूबलेस टायर, पासिंग लाइट, इंटिग्रेटेड ब्रेकिंग फीचरही यात आहे. पुढील चाकास टेलिस्कोपिक, स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक डॅम्पनर सस्पेन्शन दिले आहे.

काय करावे?

एकूण स्कूटर स्टाइल, फीचर, मायलेज, किंमत (५३ ते ५५ हजार रुपये, एक्स-शोरूम) विचार केल्यास हटके लुक, स्टाइलसाठी माइस्ट्रो एजचा नक्कीच विचार होऊ शकतो. अर्थात, या स्कूटरला होंडा अ‍ॅक्टिव्हा, टीव्हीएस ज्यूपीटर या स्कूटर स्पर्धक आहेत. त्यामुळे या दोन्हींची टेस्ट डाइव्ह घेऊन निर्णय घ्यावा. महत्त्वाचे, दुचाकी वाहन कोणतेही असो हेल्मेट नक्की घाला.

इंजिन कसे आहे?

देशात एकूण विकल्या जाणाऱ्या गिअरलेस स्कूटरमध्ये सत्तर टक्क्यांहून अधिक हिस्सा १०० व ११० सीसी स्कूटरचा आहे. हीरो मोटकॉर्पची माइस्ट्रो एज याचा सेगमेंटमध्ये आहे. स्कूटरला ११०.९ सीसीचे ८ बीएचपीचे फोरस्ट्रोक इंजिन बसविले आहे. खरे तर गिअरलेस स्कूटर वेगाने चालविण्याचे वाहन नाही. ते प्लेजर राइड घेण्याचे साधन आहे. त्यामुळे ती किती सेकंदात ताशी किती वेग गाठू शकते, याचा विचार केलेला नाही. अर्थात, स्कूटरचे इंजिन मोठा आवाज करत नाही आणि स्मूथ आहे. इकॉनॉमी वेगाची मर्यादा पाळल्यास गिअरलेस स्कूटरची कामगिरी चांगली राहते. प्रतिलिटर ६५.८ किमी मायलेज मिळते, असे कंपनीचे म्हणणे आहे. अर्थात, हे मायलेज नियंत्रित ठिकाणी केलेले असते. त्यामुळे नेहमीच्या ट्रॅफिकमध्ये ही स्कूटर प्रतिलिटर ४५ ते ५० किमी मायलेज (अपवाद असू शकतो) देऊ  शकते. हायवेवर हे मायलेज प्रतिलिटर ५२ किमीच्या पुढे जाऊ  शकते. स्कूटरचे सस्पेन्शन चांगले असून, दणके कमी जाणवतात.

obhide@gmail.com

First Published on September 22, 2017 2:29 am

Web Title: hero motocorp maestro edge hero motocorp scooty