तत्कालीन हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर ही मोटरसायकल उत्तम कामगिरी करीत होती. मात्र, या मोटरसायकलचा लूक हा पारंपरिक होता. त्यामुळे तरुणांना भावेल, अशी मोटरसायकल म्हणजे काहीसे स्पोर्टी डिझाइन तरीही मायलेज देणारी हिरो होंडाकडे नव्हती. त्यातूनच नव्या डिझाइनबरोबर नव्या उत्पादनाचा जन्म झाला. हिरो होंडानं पॅशन ही मोटरसायकल २००१ मध्ये बाजारात लाँच केली. इंजिन शंभर सीसीचंच ठेवण्यात आलं होतं, मात्र या मोटरसायकलच्या डिझाइन स्टायिलगमध्ये हिरो होंडाच्या आधीच्या मोटरसायकलच्या तुलनेत मोठा बदल केलेला होता. कॉलेजमध्ये जाण्यास सुरुवात झालेला आणि नोकरी-धंद्यास लागून काही वष्रे झालेला ग्राहक लक्षात घेऊन हिरो होंडाने पॅशन लाँच केली होती. त्यामुळेच पॅशनमध्ये अधिकाधिक ग्राफिक, हेडलाइटचा काउल मोठा करण्याबरोबरच आरपीएम, ट्रिप मीटर, स्पीड मीटरचे दोन गॅग, पास ऑन लाइट दिला होता. रेसिंस इन्स्पार्ड असल्याने सीटची रचना म्हणजे रायिडग पोझिशन थोडी खाली व मागे बसणाऱ्याच्या सीटची उंची वर करण्यात आली. पुढील आणि मागील चाकाचा व्यास व रुंदी वाढली. तसेच, मोटरसायकलची लांबीही थोडी वाढविण्यात आली.

स्प्लेंडरच्या तुलनेत वजनास अधिक जड केल्यानं विशेषत हायवेवर मोटरसायकल चालविताना कमी व्हॉबल (हलणे) होत असे. त्यामुळेच २००१ मध्ये हिरो होंडाने लाँच केलेल्या पॅशनला बाजारपेठेतून प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.

स्प्लेंडरनंतर कंपनीच्या मोटरसायकल विक्रीत पॅशनचा समावेश झाला. २००२-०३ च्या सुमारासच हिरो होंडा देशातील आणि जगातील सर्वात मोठी दुचाकी विकणारी कंपनी बनली.

बाजारपेठेत निर्माण होऊ घातलेली स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने २००३ मध्ये मोटरसायकलमध्ये काही बदल केले. यात स्टाइिलगमध्ये थोडा बदल केला. तसेच, मोटरसायकलचं नाव पॅशनवरून पॅशन प्लस करण्यात आलं. ही मोटरसायकल बॉर्न इन स्टुडिओ नॉट इन फॅक्टरी अशा आशयाची जाहिरातही करण्यात आली होती. तसेच, ही मोटरसायकल स्टाइलिश आहे, असेही जाहिरातींतून सांगण्यात येत होतं. २००३ मध्ये सादर झालेल्या पॅशन प्रोमध्ये ग्राफिकमध्ये बदल करून अधिक आकर्षक करण्यात आली आणि नवे रंगही लाँच करण्यात आले. आणि त्यात ड्युएल कलर स्टाइलचा समावेश केला. तसेच, आधीच्या क्रोम फिनििशगमध्ये असलेल्या पारंपरिक रिअर ग्रिप कॅरियरच्या जागी नवं सिल्व्हर फिनििशग असणारं ग्रॅब रेल दिलं आणि एक्झॉस्टला गार्ड दिला. यामुळे तरुणांना ही मोटरसायकल अधिक भावली.

२००६ नंतर देशातील बाजारपेठ झपाटय़ानं बदलू लागली आणि दुचाकीमध्येही लाँच होत असलेल्या मॉडेलवरून ते स्पष्ट होत होतं. त्यामुळेच स्पध्रेत शंभर सीसी मोटरसायकलच्या सेगमेंटमध्ये आपला हिस्सा कायम अधिक राहण्यासाठी कंपनीने पॅशन प्लसमध्ये पुन्हा बदल केले. या वेळी नुसतेच ग्राफिक्स नाही तर काही मूलभूत बदल झाले. त्यामध्ये स्पोक व्हीलच्या जागी अलॉय व्हील्स दिली आणि संपूर्ण काळ्या रंगाने कोटिंग केलेले इंजिन समाविष्ट झाले तसेच बटन स्टार्ट व डिस्कब्रेकचा पर्याय असणाऱ्या मॉडेलचा समावेश केला आणि अशी नवी फीचर असलेली पॅशन ही पॅशन प्रो म्हणून बाजारात आली. ही मोटरसायकल ७.८ पीएस पॉवर साडेसात हजार आरपीएमवर निर्माण करणारी होती आणि ८ एनएम टॉर्क साडेचार हजार आरपीएमवर. एका कम्यूटर मोटरसायकलसाठी एवढी पॉवर पुरेशी ठरते. त्यामुळेच पॅशनने प्रति लिटर ५५ ते ६० किमी दरम्यान मायलेज दिलं आहे. त्यामुळेच एक्झिक्युटिव्ह मोटरसायकल सेगमेंटमध्येही लोकप्रिय झाली. काळाच्या ओघात मोटरसायकलला डिस्कब्रेक, टय़ुबलेस टायर्स, डिजिटल अ‍ॅनॅलॉग ही फीचर दिली गेली.

पर्यावरण मानक बदलल्यावर हिरोमोटो कॉर्पने पॅशनचे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. इंजिन शंभर सीसीचे असले तरी त्यामध्ये बीएस फोरनुसार बदल करून ते अधिक चांगले करण्यात आले आहे. तसेच, कंपनीने आय३एस हे इंधन वाचविणारे तंत्रज्ञान या मोटरसायकलला बसविले आहे. त्यामुळे मोटरसायकलचे मायलेज सुधारले आहे. नजीकच्या प्रवासाठी म्हणजे ५०-६० किलोमीटर व शहरात प्रवास करण्यासाठी ही मोटरसायकल चांगली आहे. प्रति लिटर ८० किमीपेक्षा अधिक मायलेज मिळते, असा कंपनीचा दावा आहे. चालविण्याची सवय, शहरातील वाहतूक आदींचा विचार केल्यास ५५ ते ६० किमी शहरात मायलेज मिळायला हरकत नाही. पॉवर, पिकअप, मायलेज व स्टाइल यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न हिरो मोटकॉर्पने केला आहे. त्यामुळे शंभर सीसीची मोटरसायकल घेणाऱ्यांनी पॅशन प्रो आय3एस ची टेस्ट राइड घेऊन व अन्य मोटरसायकलशी तुलना करून निर्णय घ्यावा.

obhide@gmail.com