तत्कालीन हिरो होंडा कंपनीचे विभाजन होण्यापूर्वी हिरो होंडा कंपनीने २००५ मध्ये महिला ग्राहक डोळ्यापुढे ठेवून प्लेजर नावाची स्कूटर बाजारपेठेत आणली. कारण त्यापूर्वी होंडा कंपनीने स्वतंत्रपणे फोरस्ट्रोक अ‍ॅक्टिव्हा ही स्कूटर बाजारात सादर केली होती. दोन्ही स्कूटर एकमेकांना स्पर्धक ठरू नयेत हा त्यामागचा उद्देश असावा. विशेषकरून महिला ग्राहकांना बाजारपेठेत स्कूटरमध्ये फारसे पर्याय नव्हते. टीव्हीएसची स्कूटी, स्कूटी पेप हेच पर्याय प्रामुख्याने होते. त्यामुळे १०० सीसी क्षमतेची व वजनास हलकी असणाऱ्या स्कूटरचा बाजारपेठेत अभाव होता. अशा वेळी हीच उणीव प्लेजरच्या माध्यमातून त्या काळी भरण्यास मदत झाली. कारण, होंडा अ‍ॅक्टिव्हा घेणाऱ्या महिला ग्राहकही होत्या. मात्र, वजन हा मोठा अडसर होता. व्हॉय शूड बॉइज व्हॅ ऑल द फन अशा टॅग लाइनचा वापर करून प्लेजरचे मार्केट करण्यात आले. यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना पाचारण करण्यात आले होते. एकूण लुक, कामगिरी यांच्या जोरावर प्लेजरने ग्राहकांच्या विशेषकरून महिला ग्राहकांना नक्कीच आकर्षित केले. तसेच, स्वत:ची अशी एक बाजारपेठ तयार केली. महिला या प्रमुख ग्राहक असल्याने कंपनीने स्कूटरची हलकी ठेवण्यासाठी अधिकाधिक फायबरचा वापर केला. काळानुरूप प्लेजरमध्ये रंग, फीचरमध्ये बदल झाले. मात्र, टीव्हीएस मोटरने स्पर्धा लक्षात घेऊन १०० ते ११० सीसीच्या तीन स्कूटर बाजारपेठेत आणल्या. यामध्ये स्कूटी झेस्ट, वेगो व ज्यूपिटर समावेश आहे. या तीनही स्कूटर वजनास हलक्या व युनिसेक्स म्हणजेच महिला व पुरुष अशा दोघांना वापरता येतील, अशा पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या नव्या स्कूटरकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळेच हिरो मोटोकॉर्पने (होंडा बाहेर पडल्यावरचे नाव) २०१४ मध्ये नव्या रूपात प्लेजर स्कूटर सादर केली. अर्थात, हे करतानादेखील कंपनीने महिला ग्राहक हाच केंद्रबिंदू ठेवला.

प्लेजरला १०२ सीसी फोरस्ट्रोक, एअरकूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन बसविण्यात आले असून, सात हजार आरपीएमवर ६.७४ बीएचपी कमाल पॉवर निर्माण करते. अर्थात, इंजिनमध्ये सीसीच्या बाबतीत फरक पडलेला नाही. केवळ ते पर्यावरणाचे बीएस फोर निकष पूर्ण करते. अर्थात, इंजिनची कामगिरी दमदार आहे. इकॉनॉमी स्पीडला स्कूटर चालविल्यास व्हायब्रेशन जाणवत नाहीत. तसेच, ताशी साठ ते सत्तर किमीच्या वेगालाही ते जाणवत नाही. पण, या वेगाने स्कूटर चालवूच नये. नव्या प्लेजरमध्ये डिझानच्या पातळीवर काही बदल झाले आहेत. हेडलॅम्पची रचना बदलण्यात आली आहे. हेडलॅम्प मोठा करण्यात आला असून, त्याला पायलट लॅम्प दिला आहे. तसेच, पासिंग लाइट फीचरही दिले आहे. तसेच, डिक्कीत लाइट दिला असून, अंधारात हे फीचर उपयुक्त ठरते. स्कूटरचे वजन १०१ किलो आहे. केवळ स्कूटी झेस्टचे वजन प्लेजरपेक्षा कमी असून ते ९७ किलो आहे.

स्कूटरच्या पुढील बाजूसही एक बंद करता येणारी डिक्की दिली असून, मोबाइल चार्जिंग सॉकेट दिले आहे. इन्स्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये काही फीचर समाविष्ट करण्यात आली आहेत. साइड स्टँड रिमाइंडर लाइट दिला आहे. फ्यूएल गॅग दिला असला तरी तो डिजिटल नाही आणि हीच उणीव जाणवते. स्कूटरमधील दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे डय़ुएल टोन बॉडीसह आकर्षक ग्राफिक्सही दिली आहेत. टय़ूबलेस टायर्स व अलॉय व्हील्स दिली आहेत. मात्र, कंपनीने पुढील चाकाचे सस्पेन्शन साधेच ठेवले आहे. टेलिस्कोपिक सस्पेन्शनची उणीव या ठिकाणी जावते.

स्कूटरमधील आणखी एक महत्त्वाचा फरक ब्रेकिंगच्या बाबत झाला आहे. पूर्वीचे ब्रेकिंग साधे होते. स्कूटर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणण्यासाठी दोन्ही ब्रेकचा वापर करणे आवश्यक असते. त्यामुळेच कंपनीने इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टमचा समावेश स्कूटरमध्ये केला आहे. स्कूटर चालविणाऱ्या एकाच वेळी पुढील व मागील ब्रेक दाबण्याची गरज पडत नाही. मागील ब्रेकचा लिव्हर दाबल्यावर पुढील ब्रेकही त्याच प्रमाणात दाबला जातो. यामुळे स्कूटरचा वेग अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणता येतो. एकूण फीचर पाहता स्कूटर नक्कीच चांगली वाटते. तसेच प्रति लिटर मायलेज सुमारे ६० किमी मिळू शकते. शहरात ४०-४५ किमी काहींना मिळू शकते. त्यामुळेच एकूण विचार केल्यास महिलांसाठी लाइटवेट स्कूटरसाठी प्लेजर एक चांगला पर्याय वाटते.

obhide@gmail.com