08 April 2020

News Flash

टॉप गीअर : हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर

कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असो वा मध्यमवयीन व्यक्ती ही मोटरसायकल पसंतीस उतरली.

सुपर स्प्लेंडर

हिरो मोटोकॉर्पच्या यशात स्प्लेंडर या मोटरसायकलचा खूप मोठा वाटा आहे. फोर स्ट्रोक मोटरसायकलमधील स्टाइलिश मोटरसायकल म्हणून अनेकांनी नव्वदीच्या दशकात ही मोटरसायकल घेतली. तसे पाहायला गेल्यास मायलेज, स्टाइल, कम्फर्ट, मेंटेनन्स कॉस्ट याबाबतीत स्प्लेंडर पहिल्यापासूनच उत्तम होती आणि त्यामुळेच बहुतेक ग्राहकांनी कम्युटर सेगमेंटमध्ये त्या काळी स्प्लेंडरलाच पसंती दिली. त्यामुळेच हिरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर मोटरसायकलची अनेक व्हर्जन यामध्ये लाँच केली. स्प्लेंडर प्रामुख्याने कम्युटर सेगमेंटमधील मोटरसायकल असल्याने या मोटरसायकलला पहिल्यापासूनच शंभर सीसीचे इंजिन होते. पुढे जाऊन शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीच्या मोटरसायकलना मागणी येऊ  लागली. त्यामुळेच हिरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर या मोटरसायकलचे शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीचे मॉडेल बाजारात आणण्याचे ठरविले.

कंपनीच्या स्प्लेंडर या मोटरसायकलने शंभर सीसीच्या मोटरसायकलच्या बाजारपेठेत १९९५पासूनच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि पुढे दीड दशकांहून अधिक काळ ही मोटरसायकल पहिल्या क्रमांकावरच राहिली. कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असो वा मध्यमवयीन व्यक्ती ही मोटरसायकल पसंतीस उतरली. १२५ सीसीचे फोरस्ट्रोक इंजिन असणारे स्प्लेंडरचे मॉडेल तत्कालीन हिरो होंडा कंपनीने २००५मध्ये बाजारात आणले. पहिल्या स्प्लेंडर मॉडेलमध्ये आणि यामध्ये मोठा फरक कोणता तर ही मोटरसायकल पहिल्या स्प्लेंडरच्या तुलनेत सर्वच बाबतीत म्हणजे आकार, इंजिन, पॉवरने मोठी ठरली. त्यामुळे कंपीने स्प्लेंडर १२५ असे नाव न देता सुपर स्प्लेंडर, असे नाव दिले. पुढे जाऊन हिरो आणि होंडा या कंपन्या विभक्त झाल्या. मात्र, अन्य स्प्लेंडरप्रमाणे सुपर स्प्लेंडर मोटरसायकलचे उत्पादनही हिरो मोटकॉर्पने सुरू ठेवले. अर्थात, २००५मध्ये लाँच झालेल्या सुपर स्प्लेंडर आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलमध्ये अनेक बदल झाले. तसेच, यात नवे तंत्रज्ञानही समाविष्ट झाले आहे. दिसण्याबाबतीत सुपर स्प्लेंडर मोटरसायकलची रचना ही पारंपरिक प्रकारची आहे. तसेच, पाहताच क्षणी ही सुपर स्प्लेंडर मोठी असल्याचे जाणवते. हेडलॅम्पचा काऊल आकाराने मोठा आहे. ऑटो हेडलॅम्प हे नवे फीचर यामध्ये दिले आहे. तसेच, इंजिन किल स्विचही दिला त्यास आयथ्रीसएस हे कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. यामुळे मायलेज वाढते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

सुपर स्प्लेंडरला बॉडीग्राफिक्स दिली असून, क्रिस्टल क्लिअल इंडिकेटर दिला आहे. पूर्वी डिस्कब्र व्हर्जनचे मॉडेल उपलब्ध होते. मात्र, आता ते नाही. पुढील आणि मागील चाकास मॅग व्हील दिली असून, काळ्या रंगाचे फिनिशिंग आहे. पुढील बाजूस टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक-अ‍ॅब्झॉर्बर, तर मागील चाकास पाच स्प्टेप्समध्ये अ‍ॅडजेस्ट होणारे हायड्रॉलिक शॉक-अ‍ॅब्झॉर्बर दिले आहेत. इंजिनच्या बाबत विचार करायचा झाल्यास १२५ सीसीचे ९ बीएचपीचे फोरस्ट्रोक इंजिन आहे. अर्थात, हे इंजिन व्हर्टिकल बसविण्यात आलेले नाही. मोटरसायकलच इंजिन उत्तम आहे. ताशी सत्तर ते ऐंशी किमी इंजिनचा वेग असल्यास व्हायब्रेशन्स पटकन जाणवत नाहीत. अर्थात, सत्तर ते नव्वद स्पीड गेल्यास ते जाणवते. पण, इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकल चालविल्यास इंजिन स्मूथ असल्याचे जाणवते. प्रति लिटर ६० ते ६४ किमी मायलेज मिळू शकते. अर्थात, हे चालविण्याची पद्धत, रस्त्यावरील वाहतून, इंधन गुणवत्ता आदींवर अवलंबून आहे. स्प्लेंडर ब्रॅण्ड म्हणून विचार केल्यास ही नक्कीच एक चांगली मोटरसायकल आहे, पण स्पर्धक मोटरसायकलशी विचार केल्यास डिझाइन, स्टाइल, कामगिरी याबाबत सुपर स्प्लेंडर निराशा करू शकते. त्यामुळेच १२५ सीसी क्षमतेची मोटरसायकल घेणाऱ्यांनी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. यात प्राधान्याने नाव होंडाच्या सीबी शाइनचे नक्कीच पुढे येते.

ओंकार भिडे obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2017 12:30 am

Web Title: hero motocorp super splendor
Next Stories
1 लॅण्ड रोव्हर ‘डिस्कव्हरी’
2 टॉप गीअर : बजाज सीटी १००
3 कोणती कार घेऊ?
Just Now!
X