आकर्षक लूक, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे इंजिन आणि उत्तम मायलेज ही त्रिसूत्री होंडाने कायम पाळली आहे. त्यामुळेच त्यांच्या गाडय़ांना कारप्रेमींची प्रथम पसंती असते. सिटी, अमेझ, मोबिलिओ, सिव्हिक, ब्रियो आणि जॅझ या सर्व सेगमेंटमधील गाडय़ांना मिळालेली लोकप्रियता हीच होंडाच्या यशाची पोचपावती आहे. आता त्यांनी बाजारात आणलेली नव्या रूपातली जॅझही कारप्रेमींना पसंत पडू लागली आहे.

प्रीमियम हॅचबॅक प्रकारात सध्या गाडय़ांची भाऊगर्दी झाली आहे. हय़ुंदाईच्या आय१०, आय२० या गाडय़ांनी कारप्रेमींना भुरळ घातली आहे. या पाश्र्वभूमीवर हॅचबॅक गाडय़ांच्या निर्मितीत तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक ब्रॅण्ड ग्राहकाला आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी अधिकाधिक सुविधांनी युक्त अशा प्रीमियम हॅचबॅक बाजारात उतरवत आहे. त्यामुळे आधीच चोखंदळ असलेल्या कारप्रेमींसमोर गाडी घेण्याचे जास्तीत जास्त पर्याय पुढे येत आहेत. होंडानेही कायम ग्राहकहित लक्षात घेत वेळोवेळी प्रत्येक सेगमेंटमध्ये नवनवीन गाडय़ा कारप्रेमींसाठी उपलब्ध केल्या आहेत. आता त्यात जॅझची भर पडली आहे.
कारप्रेमींसाठी त्यातल्या त्यात होंडाभक्तांसाठी जॅझ ही काही नवीन नाही. कारण जॅझ ही होंडाची जुनीच निर्मिती आहे. परंतु आता जॅझने कात टाकली असून अधिक आकर्षक, अंतर्गत रचनेतील बदल, प्रशस्त जागा, दणकट इंजिन आणि उत्तम मायलेज या वैशिष्टय़ांनी ती सजली आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगाने पळणाऱ्या जॅझला कारप्रेमींचा सेकंड लुक हमखास मिळत होता..

बाहय़रचना
जॅझचा तोंडवळा आधीही आकर्षक होता आणि आता तर त्यात कांकणभर जास्तच वाढ झाली आहे. पुढच्या बाजूला प्रशस्त बॉनेट, क्रोम फ्रण्ट लाइट्स आणि त्याला आणखी कव्‍‌र्ही लाइट्सची जोड, आकर्षक ग्रीलचे कोंदण असलेला होंडाचा लोगो अशा तोंडवळ्याची जॅझ पाहताक्षणीच लक्ष वेधून घेते. मागच्या बाजूला प्रशस्त बूट स्पेस तर आहेच. शिवाय वायपर असलेली काच, आकर्षक टेललाइट्स हेही जोडीला आहेत. त्यामुळे गाडीचा लुक आणखीनच खुलतो. डायमंड कट अलॉय व्हील्स ही आणखी एक जमेची बाजू. जुन्या जॅझच्या तुलनेत नवीन जॅझ १० मिमीने उंच आहे. तिची एकंदर लांबी ५५ मिमी आहे.

अंतर्गत रचना
पाहता क्षणीच प्रेमात पडावी, अशा जॅझमध्ये तुम्ही प्रवेश केलात की तुमचे हे प्रेम अधिक दृढ होऊ लागते. कारण आतमध्ये पाच जण अगदी आरामात बसू शकतील, अशी रचना करण्यात आली आहे. प्रशस्त जागा, भरपूर लेगरूम आणि हेडरेस्ट तसेच आरामदायी सीट असा सर्व जामानिमा जॅझमध्ये आहे. शिवाय कप, बाटल्या, मोबाइल ठेवण्यासाठी तब्बल नऊ कपहोल्डर्स देण्यात आले आहेत जॅझमध्ये.
डॅशबोर्ड एवढा आकर्षक नसला तरी सहा इंची टचस्क्रीन सर्व कसर भरून काढतो. जॅझच्या टॉप-एण्ड मॉडेलमध्ये या स्क्रीनवर नेव्हिगेशन सिस्टीमही उपलब्ध आहे. तसेच इन्फोटन्मेंट सिस्टीमही दिमतीला आहेच. तुमच्या पेन ड्राइव्हमधील गाणीही तुम्ही यात लावू शकता. प्रवासात मोबाइल चाìचग करण्याची सुविधाही जॅझमध्ये देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढे दोन व मागे दोन एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसेच अँटिलॉक, अँटिथेफ्ट सिस्टीम या सुरक्षाप्रणाली आहेतच. चालकाला त्याच्या उंचीनुसार किंवा त्याच्या सोयीनुसार स्टीअिरग अ‍ॅडजस्ट करण्याची सोय आहे. संपूर्ण इंटेरिअरला स्पोर्टी ब्लॅक रंग देण्यात आला आहे. रिव्हìसग कॅमेरा हे जॅझचे आणखी एक वैशिष्टय़. त्यामुळे पाìकग करताना जास्त तोशीस पडत नाही.

पिक अप आणि मायलेज
जॅझ आयव्हीटेक आणि आयडीटेक अशा दोन्ही म्हणजे अनुक्रमे पेट्रोल व डिझेल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. पिक अपचा प्रश्नच नाही. ० ते १०० सेकंदात गाडी प्रचंड वेग पकडू शकते. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेला फक्त अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवत गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद लुटता आला. पेट्रोल व्हर्जनमधील जॅझ हायवेला प्रतिलिटर १६ किमीचा मायलेज देते तर डिझेल व्हर्जनची गाडी हायवेला १९ किमीचा मायलेज देते. शहरात हेच प्रमाण पेट्रोल व डिझेल व्हर्जनमध्ये अनुक्रमे १२ आणि १४ किमी प्रतिलिटर एवढे आहे.

इंजिन
होंडाच्या सर्व गाडय़ांप्रमाणेच जॅझचेही इंजिन अगदी स्मूथ आहे. तुम्ही गाडी कितीही रेस केली तरी इंजिन हूं का चू करत नाही. हायवे आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी गाडी चालवताना हे प्रकर्षांने जाणवले. दणकट इंजिनामुळे जॅझ दिमाखात पळू शकते. पेट्रोल, डिझेल आणि अ‍ॅटोमॅटिक अशा तीनही प्रकारांत जॅझ उपलब्ध आहे. पाच गीअरमध्ये चालणारी ही गाडी गीअर शिफ्ट करतानाही कोणताही त्रास देत नाही. ४० लिटर क्षमतेची हिची इंधन टाकी एकदा पूर्ण भरली की किमान ७०० किमीपर्यंतचा प्रवास निर्धोक होऊ शकतो. गाडीचा एकंदर परफॉर्मन्स चांगला आहे. जॅझचा नवा अवतार खरोखर खूप चांगला आहे. होंडाप्रेमी हिचे स्वागत वाह जॅझ, अशा शब्दांत करतील, यात शंकाच नाही.

अ‍ॅडजस्टेबल सीट्स
जॅझमधील सीट्स अ‍ॅडजस्टेबल आहेत. म्हणजे मागच्या-पुढच्या दोन्ही सीट्स सोयीनुसार मागे-पुढे करता येतात. तसेच तुमच्याकडे सामान खूप असेल आणि मागे दिलेली ३५४ लिटरचा बूट स्पेस तुम्हाला कमी पडत असेल तर सरळ मागच्या सीट्स तुम्ही रोल करून तुम्हाला हवे तेवढे सामान मागच्या बाजूला ठेवू शकता.
तसेच आतून गाडीची उंचीही चांगली असल्याने सामान व्यवस्थित बसण्यात अडचण होत नाही. लाँग ड्राइव्हसाठी हे उपयुक्त आहे. मागच्या बाजूला बसणाऱ्यांना आरामात रेलून बसता येऊ शकेल, अशा प्रकारे सीट्स अ‍ॅडजस्ट करता येऊ शकतात. तसेच पुढील दोन सीट्सही त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करता येऊ शकतात.

या रंगांत उपलब्ध
* व्हाइट ऑर्चिड पर्ल
* गोल्डन ब्राऊन मेटॅलिक
* टोफेटा व्हाइट
* सिल्व्हर मेटॅलिक
* रेड पर्ल

स्पर्धा कोणाशी?
* हय़ुंदाई आय१०
*हय़ुंदाई आय२०
* मारुती बलेनो

किंमत
साडेपाच लाखांपासून पुढे (एक्स शोरूम)

विनय उपासनी vinay.upasani@expressindia.com