कॉम्पॅक्ट एसयूव्ही या सेगमेण्टमध्ये होंडाने एण्ट्री करण्याआधीच या सेगमेण्टमध्ये ह्य़ुंदाई, मारुती-सुझुकी, फोर्ड या कंपन्यांनी आपलं वजन प्रस्थापित केलं आहे. तरीही होंडा डब्ल्यूआर-व्ही या गाडीच्या माध्यमातून या कंपनीने दमदार प्रवेश केला आहे..

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातील गेल्या काही वर्षांपासूनचे आघाडीचे नाव म्हणजे होंडा! या कंपनीच्या गाडय़ांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. हॅचबॅक श्रेणीत ब्रिओ, मोठय़ा हॅचबॅक श्रेणीतील होंडा जॅझ, कॉम्पॅक्ट सेडानमधील होंडा अमेझ, सेडान श्रेणीतील होंडा सिटी, कम्फर्ट कॉम्पॅक्ट श्रेणीतील होंडा अकॉर्ड, होंडा सिव्हिक आणि एसयूव्ही श्रेणीतील होंडा सीआर-व्ही या गाडय़ांनी आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. या कंपनीने होंडा बीआर-व्ही ही गाडी गेल्या वर्षी बाजारात आणली. यंदा कॉम्पॅक्ट एसयूव्ही या श्रेणीतील होंडा डब्ल्यूआर-व्ही ही गाडी भारतीयांसाठी आणली आहे. या श्रेणीत मारुती ब्रेझ्झा, ह्य़ुंदाई क्रेटा आणि फोर्ड इकोस्पोर्ट या गाडय़ांनी जम बसवला असला, तरी होंडाची ही गाडी नक्कीच वेगळं स्थान निर्माण करेल.

बाह्य़रूप

ही गाडी लाँच करताना कंपनीने बोल्ड अ‍ॅण्ड कम्फर्टेबल अर्बन फ्रेश लूक अशी ओळख करून दिली होती. या सर्व विशेषणांवर ही गाडी खरी उतरते. ही गाडी जॅझ गाडीच्या लाइनवर बनवण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी गाडी होंडा जॅझसारखीच दिसते. त्यानंतर बारकाईने बघितले असता ती फोर्डच्या इकोस्पोर्टसारखी वाटते. त्यानंतर हळूहळू या गाडीचे वेगळेपण जाणवू लागते. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स चांगला आहे, तसेच गाडी बॅकलिफ्ट केल्यासारखी वाटते. त्याचप्रमाणे पुढेही गाडीचं ग्रील आणि बॉनेटचा भाग भक्कम तरीही आकर्षक वाटतो. गाडीचे रूफरेल्स आणि अ‍ॅण्टेना गाडीला स्पोर्टी लूक देतात. पसरट अंडाकृती हेडलॅम्प्स, ‘एल’ या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे टेल लॅम्प्स, फॉग लाइट्स, ऑटो अडजस्टेबल मीर्स अशा गोष्टींमुळे ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही देखणी दिसते.

इंजिन आणि ट्रान्समिशन

गाडी १.२ लीटर ४ सििलडर पेट्रोल आणि १.५ लीटर ४ सििलडर डिझेल अशा दोन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल श्रेणीतील इंजिनाची क्षमता ८८.७ बीएचपी एवढी असून डिझेल इंजिनाची क्षमता ९८.६ बीएचपी आहे. पेट्रोल इंजिन ११९९ सीसी क्षमतेचे आहे, तर डिझेल इंजिन १४९८ सीसी एवढय़ा क्षमतेचे आहे. पेट्रोल गाडीचा टॉर्क ११० एनएम आहे. डिझेल गाडीचा टॉर्क २०० एनएम आहे. या दोन्ही गाडय़ा ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनवर म्हणजेच मॅन्युअल गिअर्सवर चालतात. पेट्रोल इंजिन गाडीचा मायलेज १७.५ किमी प्रतिलिटर असून डिझेल गाडीचा मायलेज २५.५एवढा आहे.

कम्फर्ट

गाडीत आरामाच्या दृष्टीने अनेक वैशिष्टय़े सामावली आहेत. त्यात पॉवर स्टिअिरग, पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना पॉवर विण्डोज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर क्वॉलिटी कंट्रोल, गाडीची ट्रंक आत बसूनच उघडण्यासाठीचे बटण, ट्रंकमध्ये दिवा, इंधन कमी झाल्यास सूचना देणारी यंत्रणा, मागील आसनांवरील प्रवाशांना वाचनासाठी दिवा, डोके टेकवण्यासाठी हेडरेस्ट, नॅव्हिगेशन सिस्टीम, व्हॉइस कंट्रोल, वातानुकूलन यंत्रणा, हीटर, डिजिटल घडय़ाळ, बाहेरील तापमान दाखवणारी यंत्रणा, प्रकाशझोत आपल्या उंचीप्रमाणे बदलता येतील असे हेडलॅम्प्स, गाडी पार्किंग करताना मागील दृश्य दाखवणारा कॅमेरा, मागील काच साफ करण्यासाठी वायपर आणि वॉशर, अलॉय व्हील्स, सन आणि मून रूफ, गाडी चालवणारयासाठी क्रूझ कंट्रोल प्रणाली, मनोरंजनासाठी एफएम रेडियो, पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना स्पीकर्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी पोर्ट अशा अनेक वैशिष्टय़ांचा समावेश आहे. गाडीला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असली, तरी तुमच्या मोबाइलमधील गाणी गाडीत वाजवण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात.

अंतर्गत रचना

या गाडीत होंडाने वन टच इलेक्ट्रिकल सन किंवा मून रूफ दिले आहे. गाडीची अंतर्गत ठेवण होंडाच्या कोणत्याही गाडीसारखी आकर्षक आहे. गाडीच्या काळ्या रंगाच्या डॅशबोर्डवर चार एसी व्हेंट्स, मल्टिमीडिया टच स्क्रीन, स्टिअिरग, सेल्फ स्टार्ट की-लेस बटण, वातानुकूलन यंत्रणा कंट्रोल करण्यासाठीची बटणे असा सरंजाम आहे. गाडीच्या स्टिअिरगवर व्हॉइस कंट्रोलपासून मल्टिमीडिया कंट्रोलपर्यंत सर्व गोष्टींची बटणे दिली आहेत. त्याचप्रमाणे चालकाच्या उजव्या हाताला दरवाज्यावर साइड मिरर कंट्रोल, पॉवर विण्डोचे कंट्रोल अशी बटणे आहेत. गाडीत पाच जणांसाठी मुबलक जागा आहे. मागच्या आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम लेग स्पेस देऊ केली आहे. तसेच पुढील व मागील प्रवाशांसाठी कप होल्डर्स, अंतर्गत प्रकाश योजना आदी गोष्टीही केबिनमधील अनुभव सुखकारक करतात.

सुरक्षा

होंडा किंवा कोणतीही जपानी ऑटोमोबाइल कंपनी आणि सुरक्षा यांचे नाते अतूट आहे. होंडा डब्ल्यूआर-व्ही या गाडीच्या बाबतीतही होंडाने कुठेही हयगय केलेली नाही. अ‍ॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ईडीबी, सेंट्रल लॉकिंग, ब्रेक असिस्ट, पॉवरडोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, अ‍ॅण्टी थेफ्ट अलार्म, चालक आणि सहप्रवाशाच्या सुरक्षेसाठी एअरबॅग्ज, मागील आसनांवरील प्रवाशांसाठी सीटबेल्ट, सीटबेल्ट न लावल्यास सूचना देणारी प्रणाली, फ्रंट आणि साइड इम्पॅक्ट बीम्स, की-लेस एण्ट्री, अ‍ॅण्टी थेफ्ट डिव्हाइस अशा अनेक गोष्टी या गाडीत देण्यात आल्या आहेत.

अनुभव

होंडा बीआर-व्हीच्या तुलनेत होंडा डब्ल्यूआर-व्ही चालवण्याचा अनुभव नक्कीच चांगला आहे. ही गाडी कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सगळ्या मागण्या पूर्ण करते. पेट्रोल श्रेणीत ११० एनएम हा टॉर्क कमी वाटतो. डिझेल श्रेणीतील २०० एनएम टॉर्कमुळे गाडीला अपेक्षित शक्ती मिळते. मोकळ्या रस्त्यांवर गाडी १३०-१५० किमी प्रतितास या वेगाने पळतानाही अजिबात हलत नाही किंवा रस्ता सोडत नाही. गाडीचा रोड कंट्रोल खूपच चांगला आहे. त्याशिवाय ग्राऊंड क्लिअरन्स चांगला असल्याचा फायदा गाडीला खडबडीत रस्त्यांवर होतो. वेगात असेल, तर पाचव्या गिअरमध्येही गाडी एखादी चढण सहज चढते. तसेच वेगात असलेल्या गाडीवर ताबा मिळवणेही अत्यंत सोपे आहे. तासन् तास गाडी चालवताना कोणताही थकवा जाणवत नाही.

किंमत

७.७५ लाख ते १०.०० लाख

ls.driveit@gmail.com