वाहनांमध्ये गीअर बॉक्स म्हणूनही ओळखला जाणारा ट्रान्समिशन बॉक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. वाहन धावत असताना रस्ता आणि त्यानुरूप वेग, वळण यातील बदल या भागात नोंदविले जात असतात. यामध्ये मॅन्युअल आणि अ‍ॅटोमॅटिक गीअर बॉक्स असे दोन मुख्य प्रकार असतात. यात आणखीही काही प्रकार आहेत. जसे डय़ुएल क्लच ट्रान्समिशन, मॅन्युमॅटिक ट्रान्समिशन आदी. ऑटो गीअर बॉक्समध्ये पॅडल शिफ्टद्वारे गीअर बदलण्याची सुविधाही आहे.

गेल्या दशकभराच्या तुलनेत भारतात काही वर्षांमध्येच अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यंत्रणा महाग पडते असा सर्वसाधारणपणे समज आहे. शिवाय मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तुलनेत ही यंत्रणा अधिक इंधनखर्चिक आहे, असेही अनेकांना वाटते; पण हे चित्र बदलले आहे. आता एकूणच या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी इंधनक्षमता आणि ऑटो गीअर बॉक्स असलेल्या छोटय़ा व स्वस्त कार या खूप आव्हानात्मक भासत असत; पण आता तसे राहिले नाही. भविष्यात तर या यंत्रणेवरच अधिकाधिक वाहने असतील. त्याला कारण एकच व ते म्हणजे सुलभता व सुसहय़ता.

वाहन चालविणे सुसहय़ होण्यासाठी तसेच प्रवासात कोणताही अडसर न येण्यासाठी अशा तांत्रिक आधार देणाऱ्या यंत्रणेवर अनेक कार उत्पादक कंपन्या लक्ष केंद्रित करत आहेत. वाहन चालविणे ही एक आनंददायी बाब बनण्यासाठी भविष्यातील तंत्रज्ञान म्हणूनही ही यंत्रणा अधिक विकसित करण्यावर वाहन उत्पादकांचा भर आहे.

वाहनाला त्याचा वेग, रस्ता यानुसार गीअर बदलण्याची मुभा असेल तर? सॅटेलाईड मार्गदर्शक ट्रान्समिशन ही पद्धतीही त्यासाठी येऊ घातली आहे. अशा पद्धतीचे ट्रान्समिशन रोल्स रॉइसमध्ये तिच्या भविष्यातील कारमध्ये अस्तित्वात येईल. यामध्ये चालक त्याची कार केवळ ड्राइव्ह मोडमध्ये ठेवेल व वाहनातील अद्ययावत ट्रान्समिशन कोणत्या वेग, वळणासाठी कोणता गीअर योग्य ते ठरवेल. गुळगुळीत रस्ता किंवा नागमोडी वळणे नाही तर अगदीच ओबडधोबड मार्ग अशा साऱ्यांसाठी उत्तम गीअर कोणता ते हे वाहन ठरवेल.

भारतातील वाहनांमध्येही सॅटेलाइट मॅपिंग पद्धती अस्तित्वात येत असल्याने सॅटेलाइट ट्रान्समिशन यंत्रणाही येईलच. देशही स्वत:ची अशी जीपीएस सॅटेलाइट यंत्रणा आणण्याच्या तयारीत आहे. छोटय़ा किंवा स्वस्त कारमध्ये असे ट्रान्समिशन येण्यासाठी मात्र आणखी एक दशक जाण्याची शक्यता आहे.

pranavsonone@gmail.com