17 December 2017

News Flash

टॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरचे भारतीय युग

कायनेटिक होंडाला ९८ सीसीचे टू स्ट्रोक इंजिन होते तसेच देशातील ही पहिलीच ऑटोमॅटिक स्कूटर

ओंकार भिडे | Updated: March 1, 2017 12:17 PM

देशात मोटरसायकलचे युग सुरू होत असतानाच एका नव्या दुचाकीच्या भविष्यातील बाजारपेठेची चाहूल लागयला सुरुवात झाली होती. होंडा मोटरने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना दोन वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर भागीदारी केली होती. हिरो कंपनीबरोबर मोटरसायकल, तर स्कूटर उत्पादनासाठी कायनेटिक या पुणेस्थित कंपनीशी भागीदारी केली. ऑटोमॅटिक प्रकारातील स्कूटर भारतीय बाजारपेठेत यशस्वी होईल, असा विश्वास कंपनीला होता. त्यामुळेच होंडा कंपनीने आपल्या जागतिक पातळीवरील एनएच सीरिजमधील स्कूटरची निवड केली. अमेरिका व अन्य देशांतही जे मॉडेल उपलब्ध होते त्याचेच भारतीय रूप कायनेटिक होंडाची डीएक्स. कंपनीने भारतात १९८४-८५ च्या सुमारास दोन ऑटोमॅटिक स्कूटर कायनेटिक होंडाचे ईएक्स आणि डीएक्स मॉडेल लाँच केले. याच काळात भारतात नवा मध्यमवर्ग तयार होत असल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यामुळे ऑटोमॅटिक स्कूटर स्वत:ची नवी बाजारपेठ निर्माण करेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना नसली तरी हाच वर्ग ती निर्माण करणार होता, हे नक्की, कारण भारतात महिलांची समाजातील भूमिका बदलण्यास सुरुवात झाली होती. ती भारतीय राजकारणाचा चेहरा होण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रवेश करू लागली होती. घरापुरता मर्यादित असणारा महिलांचा वावर हा आíथक स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. त्या काळी दुचाकी चालविणाऱ्या महिला फार कमी होत्या. एम ५०, एम ८० या गिअरच्या मोपेडबरोबर पॅँथर, लूना, चॅम्प या विदाउट गिअरच्या दुचाकी उपलब्ध होत्या; पण यांची बाजारपेठ मर्यादित होती. कायनेटिक होंडाचा बाजारपेठेत प्रवेश झाल्याने महिलांनाही नवा पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र, या दुचाकीचे वजन ही मर्यादा महिला ग्राहकांपुढे होती. असे असले तरी या नव्या आधुनिक पर्यायाबाबात सर्वाच्याच मनात उत्सुकता होती, हे मात्र खरं.

कायनेटिक होंडाला ९८ सीसीचे टू स्ट्रोक इंजिन होते तसेच देशातील ही पहिलीच ऑटोमॅटिक स्कूटर होती. त्यामुळे पारंपरिक स्कूटरच्या बाजारपेठेत या नव्या परीचे स्वागत बाजारपेठेने सुरुवातीस सावध पद्धतीने केले. कायनेटिक होंडा या स्कूटरमध्ये जमेची बाजू म्हणजे गिअर बदलण्याची गरज नाही आणि किक स्टार्टला प्रथमच स्कूटरमध्ये नव्हे तर संपूर्ण दुचाकीमध्ये बटन स्टार्टचा पर्याय आला होता. त्यामुळे १९८८ पर्यंत कायनेटिक होंडाला तुफान प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मेटल बॉडी, दणटक, सामान वाहून नेण्यास सोपी, ट्रॅफिकमध्ये गिअर बदलण्याची गरज नसल्याने अनेकांनी नवे वाहन घेताना या ऑटोमॅटिक स्कूटरचा विचार केला. या स्कूटरबाबतची आठवण सांगताना श्रीरंग भोगले म्हणाले, की मी ८० च्या दशकात औरंगाबादला राहायला होतो. आमच्या गल्लीत एक व्यक्ती कायनेटिक होंडा कंपनीच्या शोरूममध्ये कामाला होती आणि ती व्यक्ती कधी तरी कायनेटिक होंडा घरी आणायची. तेव्हा म्हणजे १९८७-८८ मध्ये आमच्या गल्लीतील सर्वाना या ऑटोमॅटिक स्कूटरचे कुतूहल आणि आकर्षण वाटायचे. त्या काळी ही स्कूटर चालवून पाहिल्यावर गिअर स्कूटरसारखाच पिकअप असल्याचे जाणवले तसेच याचे सस्पेन्शनही चांगले होते. त्यामुळेच स्कूटरला चांगला पर्याय असल्याने अनेकांनी कायनेटिक होंडा घेण्यासाठी काही काळ फक्त बुकिंगही केले होते. गिअर स्कूटरच्या तुलनेत मायलेज २० टक्के कमी होते. मात्र, चालविण्यास सोपी, दणकट असल्याने तब्बल १५ वष्रे कायनेटिक होंडा वापरली. कायनेटिक होंडा ही वजनाने जड असल्याने अनेक महिला ही दुचाकी वापरण्यास तयार होत नव्हत्या. ऑटोमॅटिक स्कूटरला मागणी लक्षात घेऊन बजाज ऑटोने सनी ही हलकी, टू स्ट्रोक, ६० सीसी इंजिनची ऑटोमॅटिक स्कूटर बाजारात आणली. चांगले मायलेज आणि वजन कमी असल्याने सुरुवातीस प्रतिसाद मिळाला; पण सनी ग्राहकांचे मन जिंकू शकली नाही. उदारीकरणानंतर देशात झपाटय़ाने बदल होऊ लागले होते आणि तरुणाईचा टक्का वाढत होता. महिलांसाठी हलके, मात्र टिकाऊ दुचाकी नसल्याची उणीव लक्षात घेऊन टीव्हीएसने स्कूटी ही टू स्ट्रोक, ८० सीसी इंजिनची ऑटोमॅटिक स्कूटरेट बाजारात आणली. दिसायला सुंदर, बटन स्टार्ट, डिक्की, हलकी तरीही दणकट या फीचरमुळे स्कूटीला मोठा ग्राहक तरुणी व महिलांच्या रूपाने मिळाला तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या आणि गिअरचे लायन्स मिळण्यासाठी वयामुळे अपात्र असलेल्या तरुणांनीदेखील स्कूटीला आपलेसे केले. तसेच, याचे मायलेज कायनेटिकपेक्षा अधिक आणि देखभाल खर्च कमी असल्याने मध्यमवयीन व ज्येष्ठतेकडे संक्रमण करीत असलेल्यांनीदेखील स्कूटी घेण्यास सुरुवात केली. काळानुसार टीव्हीएसने स्कूटीचे फोर स्ट्रोक मॉडेलही बाजारात आणले आणि तीही यशस्वी झाली. येथूनच देशातील ऑटोमॅटिक स्कूटरच्या बाजारपेठेने उभारी घेतली.

obhide@gmail.com

First Published on February 17, 2017 12:47 am

Web Title: indian automatic scooter era