14 December 2017

News Flash

टॉप गीअर : हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट ११०

सर्वात लेटेस्ट मॉडेल हे स्प्लेंडर आय स्मार्ट लाँच केले आहे.

ओंकार भिडे | Updated: September 15, 2017 1:56 AM

भारतात नव्वदीच्या दशकात बाजारपेठेत आलेल्या तत्कालीन हिरो-होंडा कंपनीच्या स्प्लेंडर या मोटरसायकलने अनेक दशके कम्युटर मोटरसायकल सेगमेंटवर अधिराज्य गाजवले. पुढे जाऊन हिरो आणि होंडा या कंपनी वेगळ्या झाल्या आणि स्प्लेंडर हा मोटरसायकल ब्रॅण्ड हिरो मोटोकॉर्पकडे राहिला. कंपनीने आधीच्या स्प्लेंडरच्या मॉडेलबरोबर नवी मॉडेलही बाजारात आणली. यातील सर्वात लेटेस्ट मॉडेल हे स्प्लेंडर आय स्मार्ट लाँच केले आहे. ग्राहकांना स्प्लेंडर या मोटारसायकलकडून असणाऱ्या अनेक अपेक्षा म्हणजे तंत्रज्ञान, स्टाइल, कम्फर्ट, पिकअप, मायलेज याचा मेळ घालण्यासाठी हिरो मोटोकॉर्पने केलेले प्रयत्न स्पष्ट जाणवतात. नव्या स्प्लेंडर आया स्मार्टही वैशिष्टय़पूर्ण संपूर्ण भारतीय बनावटीची म्हणजे भारतात विकसित व उत्पादित होणारी मोटारसायकल आहे. या मोटारसायकलसाठी नवी चासी आणि फ्रेम तयार करण्यात आली असून, राजस्थानमधील जयपूर येथील हिरो मोटोकॉर्पच्या सेंटर ऑफ इनोव्हेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे विकसित केली आहे.

स्टाइलबाबत बोलायचे झाल्यास नक्कीच दखल घेण्यासारख्या गोष्टींचा समावेश झाला आहे. डय़ुएल टोन कलर, शार्पर हेडलॅम्प, स्पोर्टी ग्रॅब रेल, ऑटो हेडलॅम्प ऑन, सेमी डिजिटल इन्स्ट्रमेंट कन्सोल आणि ब्लॅक अलॉय व्हील (स्टॅण्डर्ड फीचर) यांच्यामुळे मोटारसायकलकडे पाहिल्यावरच उच्च दर्जाची बांधणी असल्याचे लक्षात येते.

कामगिरी

हिरो-होंडाच्या स्प्लेंडरची कामगिरी पहिल्यापासूनच चांगली होती आणि त्यामुळेच या मोटारसायकलने बाजारपेठेवर (कम्युटर सेगमेंट) एकेकाळी अधिक राज्य गाजविले आहे. त्यामुळेच हिरोने ११० सीसीच्या मोटारसायकलमध्ये पॉवरची उणीव जाणवू नये यासाठी टॉर्क ऑन डिमांड हे फीचर दिले आहे. त्यामुळेच तिसऱ्या वा चौथ्या गिअरमध्येदेखील पिकअप घेता येऊ  शकतो. ओव्हरटेक करताना वा स्पीड घेण्यासाठी आवश्यक पॉवर मिळविण्यासाठी चौथ्या गिअरवरून तिसऱ्या गिअरमध्ये आल्यास पॉवर मिळते. त्यासाठी दुसऱ्या गिअपर्यंत जावेच लागेल असे नाही (अपवाद असू शकतो). हायर स्पीडला इंजिन व्हायब्रेशन, नॉइस फारसा जाणवत नाही.

पुढील बाजूस टेलिस्कोपिक व मागील बाजूस हायड्रोलिक अ‍ॅडजेस्टेबल करता येऊ  शकणारे शॉकँबसॉर्बर स्विंग आर्मसह देण्यात आले आहेत. तसेच, सीटही लांब व मोठे असल्याने रायडिंग नक्कीच आरामदायी वाटते. अर्थात, आय स्मार्ट फीचर हे नवे फीचर व स्प्लेंडर हा ब्रॅण्ड लक्षात घेतल्यास ही नक्कीच एक चांगली मोटारसायकल आहे. पण, स्पर्धक मोटारसायकलचाही विचारही खरेदी करण्यापूर्वी केलेला चांगला.

इंजिन

स्प्लेंडर आयस्मार्ट ११०ला हिरो मोटोकॉर्पने विकसित केलेले ११० सीसीचे एअर कूल्ड इंजिन ९.१ पीएस (८.९७ एचपी) पॉवर ७५०० आरपीएमवर निर्माण करते. इंजिन टॉर्क ९ एनएमचा असून, ५५०० आरपीएमवर निर्माण होतो. तसेच, ताशी ० ते ६० किमी वेग ही मोटारसायकल ७.४५ सेकंदात गाठते, असा कंपनीचा दावा आहे. मोटारसायकलला फोर स्पीड गिअर बॉक्स म्हणजे चार गिअर आहेत. इंजिनच्या पिस्टनची रचना व्हर्टिकल रचनेत करण्यात आली असल्याने स्ट्रोकला नैसर्गिक वेग मिळतो आणि अधिक शक्ती देताना कमी इंधन वापरले जाते. प्रति लिटर ६८ किमी मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. शहरातील ट्रॅफिक व चालविण्याच्या सवयीवर हे अवलंबून आहे. तरीही सरासरी प्रति लिटर ५५ ते ६० किमी मायलेज मिळू शकते.

फीचर

सव्‍‌र्हिस इंडिकेटेड, बॅटरी लो इंडिकेटर, साइड स्टॅण्ड आदी फीचर ही आता नेहमीची फीचर झाली आहेत. ग्राहकांना त्यापलीकडे अधिक देण्यासाठी कंपनीने दुचाकींमध्ये आयस्मार्ट टेक्नॉलॉजी दिली आहे. स्प्लेंडर आय स्मार्टच्या मॉडेलमध्ये असलेल्या या फीचरमुळे पाच सेकंद इंजिन आयडलमध्ये राहिल्यास मोटारसायकल बंद होते आणि पुन्हा क्लच दाबल्यावर म्हणजे क्लच एंगेज होताच इंजिन सुरू होते. यामुळे मोटारसायकलच्या मायलेजमध्ये फरक पडतो, असा दावा कंपनीचा आहे. अर्थात, या फीचरमुळे मायलेजमध्ये कितीने वाढते हे स्पष्ट होत नसले तरी सिग्नलला चावीने वा बटनने इंजिन बंद करण्यापासून नक्कीच सुटका मिळते.

obhide@gmail.com

First Published on September 15, 2017 1:56 am

Web Title: information on hero splendor ismart 110