‘जीप’ ही जगातील पहिली कंपनी आहे, ज्यांनी प्रथम योग्य डिझाइन, आभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून भक्कम एसयूव्ही तयार केली. ‘विलीज स्टेशन वॅगन’ हे तिचे नाव. अशा या महान आधुनिकतेचा पाय रचणाऱ्या एसयूव्हीची विक्री १९४६ सालापासून सुरू करण्यात आली. तिच्यामध्ये अर्थाने एसयूव्हीला आवश्यक असणाऱ्या आधुनिक वैशिष्टय़ांचा समावेश होता. त्या गाडीच्या केबिनमध्ये भरपूर जागा होती. अतिशय भक्कम बांधणी आणि अर्थातच फोर व्हील ड्राइव्हप्रणाली असल्याने ती येणाऱ्या सर्व अडथळय़ांना सहजपणे पार करू शकली. ७० वर्षांचा समृद्ध अनुभव असणाऱ्या या जीपने आता अत्याधुनिक अशी नवीन ‘कम्पास’ ही भारतीय वाहन क्षेत्रात दाखल केली असून, पुण्याजवळील रांजणगाव येथे या एसयूव्हीची निर्मिती करण्यात येत आहे. कम्पासने बाजारात येण्यापूर्वीच आपली इतकी छाप पाडली आहे की, तिचे वेगळेपण एसयूव्ही बाजारात उठून दिसते. ही अतिशय चांगली बाब आहे.

पाच आसने असणारी कम्पास ही अतिशय परवडणाऱ्या किमतीमधील गाडी आहे. ती जीपच्या यापूर्वीच्या प्रीमियम एसयूव्ही गाडय़ा ग्रँड चिरोकी आणि रँग्लरच्या तुलनेत स्वस्त आहे. कम्पासमध्ये अनेक वैशिष्टय़ांचा समावेश करण्यात आला आहे. सात क्रोमापासून तयार करण्यात आलेली स्लॉटची ग्रिल जीपच्या इतर गाडय़ांसारखींच वाटते. शार्प जेनन हेडलाइट्समुळे ती चिरोकीसारखी असल्याचा भास होतो. पुढे गाडीला प्रीमियम लुक देण्याचे काम यामध्ये लावण्यात आलेली क्रोम एडिशन करते. गाडीपुढे असलेल्या हेडलाइटमुळे ती अतिशय सुंदर दिसते. फ्लॅट बोनेट आणि लांबीला मोठे केबिन तसेच मोठी चाके असल्याने या गाडीच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते.

कम्पासच्या आतील डिझाइन

जीपच्या कम्पासचे केबिन हा एक सुखद धक्का आहे. मात्र गाडीचे डॅशबोर्ड फारच कंटाळवाणे वाटते. यामधील टचस्क्रीन लहान असून वापरण्यास थोडी अवघड वाटते. खिडकीच्या चौकटीचा आडवा भाग जरा रुंद असणे ही लहान आणि वृद्ध व्यक्तींची समस्या असू शकते. मात्र या बाबी सोडल्या तर गाडीच्या केबिनमध्ये बसल्यावर तुम्हाला उच्च पातळीच्या लक्झरी कारमध्ये बसल्याचा अनुभव मिळेल. कम्पासच्या केबिनमध्ये आसनांवरती सी-ग्रे रंगाचे अतिशय मऊदार लेदर लावण्यात लावल्यामुळे अतिशय आरामदायी वाटते. आसनांना चांगल्या प्रकारे सपोर्ट देण्यात आला आहे, यामुळे गाडीमध्ये प्रीमियम फिलिंगचा भास होतो. केबिनमध्ये ७ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम असून, गाडीत एकूण ६ स्पीकर आहेत. पहिली सीट अतिशय आरामदायक आहे. आतील जागा मोठय़ा प्रमाणात असून, गाडीच्या मागील बाजूस आपले सामान ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही दूरच्या प्रवासासाठी निघालात तरी आपल्याला आवश्यक त्या सर्व वस्तू घेऊन जाता येतील.

सुरक्षेची वैशिष्टय़े :

सुरक्षेचा विचार करता यामध्ये ५० पेक्षा अधिक सुरक्षिततेची वैशिष्टय़े समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये फोर चॅनल एबीएस (अंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम), ईएसपी, हिल स्टार्ट ऐसिस्ट. ऐडोप्टिव्ह ब्रेक लाइट, इलेक्ट्रॉनिक स्टेब्लिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्टसारखी नवी प्रणाली देण्यात आली आहे. या गाडीमध्ये ६ एअरबॅग्ज आहेत हे याचे मोठे वैशिष्टय़ आहे. जीपने यासह अनेक वैशिष्टय़े यामध्ये समाविष्ट केली आहेत. फोर व्हील ड्राइव्ह काही ठरावीक गाडय़ांमध्ये उपलब्ध आहे. मात्र ते डिझेल अ‍ॅटोमध्ये अद्याप देण्यात आलेले नाही. तथापि, क्रूज कंट्रोल, सनरूफ आणि अ‍ॅटो हेडलाइट आणि वायपर यामध्ये देण्यात आलेले नाहीत. यामध्ये अ‍ॅटो डीमिंग मिरर मिळत नाही.

इंजिनची क्षमता :

जीप कम्पासच्या इंजिनमध्ये १.४ लीटरचे मल्टीएअर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ते १६० बीएचपीची ऊर्जा तयार करते. त्याचा टॉर्क २५० न्यूटन मीटर आहे. या गाडीच्या पेट्रोल व्हॅरिएंटमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याच्यासह प्रमुख मॉडेलमध्ये डुअल क्लच ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या गाडीच्या डिझेल व्हॅरिएंटमध्ये २ लीटरचे मल्टिजेट इंजिन देण्यात आले आहे. ते १७१ बीएचपी ऊर्जा देते. तिचा टॉर्क ३५० न्यूटन मीटर आहे. यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिकचा पर्याय उपलब्ध नाही.

४.२ व्हॅरिएंट या गाडीचे मायलेज १७.१ किलोमीटर प्रति लिटर आहे. यात प्रॉजेक्टर हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी गाडीमध्ये ५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. गाडीमध्ये ऑटो एसी कंट्रोलसह ब्लूटुथ आणि अन्य कनेक्टिव्हिटी वैशिष्टय़े देण्यात आली आहेत. जीप कम्पासमध्ये १६ इंचाचा स्टील एलॉय व्हील्स देण्यात आला आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये १७ इंचचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याचा ग्राऊंड क्लीअरन्स अतिशय उत्तम असून, तो १७८ एमएम आहे. त्यामुळे या गाडीला खडबडीत रस्त्यावर अतिशय सुलभपणे चालवण्यात येऊ शकतो.

चालवण्याचा अनुभव

टेकडी आणि खडबडीत रस्ता आहे अशा ठिकाणी कम्पासची टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. खडबडीत आणि इतर डोंगराळ भागामध्येही कम्पास अतिशय सुरळीतपणे चालत राहते. त्यामध्ये कोणताही अडथळा दिसून येत नाही. ही गाडी खडकाळ भागामध्ये चावताना ती अतिशय भक्कम आणि कठीण असल्याचा अनुभव येतो. या गाडीची क्षमता प्रत्येक क्षणाला जाणवत राहते. ज्यावेळी टेस्ट ड्राइव्ह सुरू असते, त्या वेळी गाडी अतिशय लक्झरी असल्याची जाणीव सतत होते. सीटला वापरलेल्या मऊदार लेदरमुळे गाडीमध्ये अतिशय आरामदायी वाटते. ज्या वेळी कम्पास मुख्य रस्त्यावरून चालत राहते, त्या वेळी ती अतिशय लवचीकपणे, अतिशय शोषक आणि कसलाही आवाज न करता एका सरळ रेषेत जाते. स्टिअरिंग खूपच प्रभावी आहे. गाडीचे ब्रेकही अतिशय उत्तम असून, आवश्यक त्या ठिकाणी गाडी क्षणात थांबते.

किंमत आणि स्पर्धा?

कम्पास ही अतिशय प्रभावी एसयूव्ही असून, यामध्ये बसल्यावर जीपच्या गाडीमध्ये बसल्याची अनुभूती येते. गाडीत असलेल्या दिमाखदार आणि आरामदायी वैशिष्टय़ांमुळे प्रवास अतिशय आनंददायी होण्यास मदत होते. कम्पास डिझेलची किंमत १५.४५ लाख रुपये असून, प्रमुख मॉडेलची किंमत २०.६५ लाख रुपये आहे. या एसयूव्हीची निर्मिती पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. या किमतीच्या अंतर्गत हय़ुंडाईची क्रेटा आणि टकसनसारख्या एसयूव्हींना स्पर्धा निर्माण होणार असून, एंडेव्हर आणि फॉच्र्युनर या एसयूव्हींनाही जीपची कम्पास टक्कर देईल, अशी शक्यता आहे.

jaideep.bhopale@expressindia.com