जग्वार एक्सईची‘प्रेस्टिज’ बाजारात

मुंबई : सर्वात अत्याधुनिक, कार्यक्षम व सर्व सोयिसुविधांनी युक्त अशी स्पोर्टस् कार जग्वार एक्सईच्या नव्याकोऱ्या ‘प्रेस्टिज’ची नवी आवृत्ती नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. या अत्याधुनिक कारमध्ये स्लायडिंग सनरूफ, ड्रायव्हर सीट मेमरीसह लेदर सीट्स, इंटेरिअर मूड लायटिंग, मेरिडियन साऊंड सिस्टीम आणि रिअर व्ह्य़ू कॅमेरा आदी सोयिसुविधा आहेत. देशभरातील जग्वारच्या २३ रिटेल आऊटलेट्समध्ये ‘प्रेस्टिज’ उपलब्ध असेल. नव्या ‘प्रेस्टिज’ आवृत्तीमध्ये २.१ एल इंजिन असून ही स्पोर्टस् कार ४३ लाख ६९ हजार रुपयांपर्यंत (मुंबईबाहेरील एक्स शोरूम किंमत) उपलब्ध आहे. भारतातील जग्वार कारच्या श्रेणींमध्ये एफ-टाइप (किंमत सव्वा कोटींहून अधिक), एक्सएफ (४७ लाखांहून अधिक), एक्सजे (९९ लाखांहून अधिक) व एक्सई (३९ लाखांहून अधिक किंमत) यांचा समावेश असून किमती मुंबईबाहेरील असून जकातपूर्व आहेत.

महिंद्राची ‘ई-व्हेरिटो’

नवी दिल्ली : कोणत्याही प्रकारचे वायूप्रदूषण नाही की ध्वनिप्रदूषण नाही, पूर्णत इलेक्ट्रिकवर चालणारी ई-व्हेरिटो ही महिंद्राची नवी सेडान आता बाजारात उपलब्ध झाली आहे. अवघ्या साडेनऊ लाखांत उपलब्ध असलेली ई-व्हेरिटो दिल्लीसह मुंबई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, चंडिगढ, हैदराबाद, जयपूर आणि नागपूर येथे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. पूर्णपणे चार्जिग करण्यात आलेली ई-व्हेरिटो ११० किमी अंतरापर्यंत धावू शकते व तिचा वेग ताशी ८६ किमीपर्यंत जाऊ शकतो. ई-व्हेरिटोमध्ये बूस्ट मोड आणि टेलिमॅटिक्सचा समावेश असून त्याच्या साह्य़ाने वाहन जिथे असेल तिथे तातडीने मदत मिळू शकेल. या गाडीत रिनजनरेटिव्ह ब्रेकिंग ही प्रणालीही उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान महिंद्राने प्रथमच भारतात आणले आहे. जेवढा वेळ ब्रेकचा वापर होईल तितका वेळ त्यातून निर्माण झालेली ऊर्जा गाडीत साठवली जाते, असे हे तंत्रज्ञान आहे.