वाहतूक आणि नागरीकरणात घोडा हा महत्त्वाचा प्राणी राहिला आहे. वाहतुकीचे एक उत्तम साधन म्हणून हा घटक एके काळी उल्लेखनीय म्हणून नोंदला गेला आहे. मात्र काळाच्या ओघात सुटसुटीत म्हणून किंवा अतिजलद म्हणून त्याचा वाहतुकीसाठीचा उपयोग काहीसा मागे पडला. तेव्हा हा पर्याय गेल्या अनेक वर्षांपूर्वी माणसाने तयार केलेल्या इंजिनात बदलला गेला. वाहतुकीचे साधन अधिक गतिमान होण्याबरोबरच सुटसुटीत आणि दीर्घकालासाठी तसेच अधिक भारक्षमता पेलण्यासाठी इंजिनात काळानुसार बदल केले गेले. घोडे सांभाळण्यापेक्षा अशी वाहने सांभाळणे अधिक सोयीचे, असे म्हणता येईल.

वाहतूक व्यवस्थेचे साधन कसे बदलते आहे हे आपण पाहिलेच. अधिक परिणामकतेकरिता ही व्यवस्था आमूलाग्रतेने बदलत आहे. पण भविष्यात कार बाळगणेही आजच्या घोडा बाळगण्याइतपत दुर्मीळ होणार का? रस्त्यांवर वाढणारी वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, सदोष रस्ते, वाहनांच्या वाढत्या किमती या साऱ्यांमुळे वाहन चालविण्यातील मजा नाहीशी होत चालली आहे. म्हणून काय वाहन खरेदी थांबणार आहे? पण आता यावर एक तोडगा म्हणून नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे रेडिओ टॅक्सी, ऑनलाइन कॅब वगैरे वगैरे.

उबर, ओलासारख्या या क्षेत्रातील नव्या टॅक्सी सेवा पुरवठादार कंपन्या त्यांचा बाजारहिस्सा दिवसेंदिवस वाढवत आहे. त्यांची प्रवाशांमधील पसंतीही वाढत आहे. आर्थिकदृष्टय़ा परवडणारे आणि सुलभ उपलब्धता हे त्याचे कारण असावे. ही वाहने म्हणजे पांढरा हत्ती नाही. या वाहनांची देखभाल, दुरुस्ती, अपघात झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या असे काहीच नाही. सर्वसाधारणपणे कारचा सर्वाधिक खर्च हा ती गॅरेजमध्ये गेल्यावर होतो. तेव्हा भविष्यात रेडिओ टॅक्सीची आवश्यकता अधिक प्रमाणात भासणार हे नक्की. निमशहरांमधूनही अशा वाहनांची वर्दळ दिसू लागेल. न्यूयॉर्क, लंडन, टोक्योसारख्या विदेशातील अनेक बडय़ा शहरांमध्ये लोक स्वत:चे वाहन राखण्यासाठी फार अस्वस्थ होत नाहीत. सौदी अरेबियासारख्या देशानेही उबरमध्ये ३.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा गेल्या आठवडय़ात केली. तेव्हा रेडिओ टॅक्सी व्यवसायाचा विस्तार होत आहे, तो भविष्यात आणखी होणार हे निश्चितच. पण मग या साऱ्यांमुळे आपल्या कारमालकीचे चित्र बदलणार का?

pranavsonone@gmail.com