आपल्याकडे असलेल्या विविध वाहनांमधून कोणते वाहन खरेदीदारांनी घ्यावे याचे पर्याय हल्ली वाहन उत्पादक कंपन्यांना उपलब्ध करून देत असतात. अशा पर्यायांमध्ये किमतीपासून ते त्यातील सुविधेपर्यंत सर्व काही असते. अशा वेळी एकापेक्षा अधिक असलेल्या वाहनातील सुविधामुळे नवा खरेदीदार काहीसा गोंधळतोही. त्यातच वाहन कंपनीच्या माहितीपत्रकात असलेल्या छायाचित्र-वैशिष्टय़ांमुळे तर त्यात अधिक भर पडते. तेव्हा एखादे वाहन घेताना मुख्य कोणत्या गोष्टी बघाव्यात हे मी तुम्हाला येथे सांगणार आहे.

गृहीत धरा की तुम्ही २० लाख रुपयांपर्यंतची एखादी कार घेत आहात. त्यात विविध श्रेणी असतील. कंपनी आणि वाहन यानुसार त्याची किमान किंमत ३ लाख रुपयांपासूनही असू शकेल. अशा किंमत श्रेणींमध्ये एकच कंपनी तिची अनेक वाहने बसविते. किमान किमतीत तुम्ही वाहन घेता म्हणजे तुमचे बजेट कमी आहे, हे गृहीत. आणि अशा वाहनांमध्ये एसी, पॉवर स्टेअिरग, पॉवर िवडो असणे दुर्मीळच. अर्थात हे सारे आणि त्यापेक्षाही अधिक सोयी-सुविधा वरच्या श्रेणीतील, अधिक किमतीतील वाहनांमध्ये असतात. कमी किमतीतील वाहनांमध्ये मूळ तसेच काही अतिरिक्त सुविधाही आता कंपन्या देऊ करत आहेत. त्याचाही विचार करायला हरकत नाही.

पण कोणतेही वाहन खरेदी करताना, कोणत्याही श्रेणीची, निवड करताना सुरक्षेला अधिक महत्त्व द्या. वाहनामध्ये एअरबॅगसाठी आग्रही राहा. त्याकरिता प्रसंगी अतिरिक्त किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे एन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस). कमी अंतरात तुम्हाला ब्रेक मारण्यासाठी ही यंत्रणा खूपच उपयोगी पडते. ड्रम आणि डिस्क ब्रेक व्यवस्थेपेक्षाही ही यंत्रणा अधिक संतुलन राखणारी आहे. वाहनामध्ये असलेल्या चालकाच्या आसनाची उंचीनुसार हवी तशी रचना करता येते की नाही तेही पहा. त्याचबरोबर वाहनाचे स्टिअिरगही अ‍ॅडस्टेबल असेल तर उत्तम.

वाहन चालविताना चालकाला सुटसुटीत आणि आरामदायी वाटणे खूपच महत्त्वाचे आहे. बाहेरील दिसण्यासाठी स्वच्छ व योग्य आरशाबरोबरच रिअर स्क्रीन वायपरही पावसाळ्यासारख्या मोसमात तर आवश्यक ठरते. वाहनातील ऑडिओ सिस्टीम ही इनबिल्ट असलेले केव्हाही चांगले. नवे वाहन खरेदी करताना या महत्त्वाच्या गोष्टी पाहणे खूपच महत्त्वाचे ठरते. किंबहुना वरील गोष्टी असलेल्या वाहनांना खरेदीकरिता प्राधान्य द्यायला हवे. याशिवाय सनरूफ, बटन स्टार्ट/ऑफ, लेदरची आसने आदी आपल्या वापराच्या आवश्यकतेनुसार अन्य बाबी पाहायलाही हरकत नाही.

pranavsonone@gmail.com