होंडाची इंजिन्स ही ऑटोमोबाइल क्षेत्रात दणकटपणासाठी ओळखली जातात. ह्य़ुंदाई, मारुती सुझुकी, रेनाँ, फोर्ड अशा कंपन्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडय़ांना टक्कर देण्यासाठी होंडाने बाजारात आणलेल्या होंडा बीआर-व्ही या गाडीची खासियतही हे होंडाचे दणकट इंजिन आहे..

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही या श्रेणीतील गाडय़ांची मागणी वाढली आहे. रेनाँ डस्टर, निसान टेरेनो, फोर्ड इकोस्पोर्ट, ुंदाई क्रेटा, मारुती सुझुकी ब्रेझ्झा अशा सगळ्याच गाडय़ांनी सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र व्यापले आहे. त्यात आता होंडा कंपनीची बीआर-व्ही ही गाडी दाखल झाली आहे. ुंदाई क्रेटा, रेनाँ डस्टर आणि फोर्ड इकोस्पोर्ट या तीन गाडय़ांनी आधीच आपले बस्तान बसवले असताना बीआर-व्ही गाडीची वाट खडतर आहे, यात वाद नाही. पण होंडा कंपनीची पूर्वपुण्याई आणि गाडीतील काही खास फिचर्स या गाडीला इतर गाडय़ांपेक्षा वेगळी ठरवतात.

बाह्य़रूप

बाजूने पाहिल्यास होंडा बीआर-व्ही ही होंडाच्याच एमपीव्ही श्रेणीतील मोबिलिओ या गाडीसारखीच दिसते. मात्र समोरून पाहिल्यास या गाडीचं ग्रील रुंद असून दोन्ही हेडलाइट्ला ते जोडलं असल्याचं दिसतं. त्याचप्रमाणे अगदी समोरच खालच्या बाजूला गाडीला गार्ड असून त्यामुळे गाडीचा स्पोर्टी लुक अगदी ठळकपणे उठून दिसतो. गाडीच्या टपावरील रूफ रेल्स ग्रे आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये असल्याने गाडीला अगदीच आगळा डौल मिळतो. गाडीचे टेल लाइट्स आणि मागचा भागही रुंद आहे. त्यामुळे ही गाडी खूपच बोल्ड दिसते, यात वाद नाही. तरीही तिच्यातील मोबिलिओ लुक डोळ्यांना जाणवत राहतो. गाडीचे जाड टायर्स ही गाडी ऑफ रोड ठिकाणी उत्तम साथ देईल, याची खात्री पटवून देतात. तर साइड मिर्सची रचनाही गाडीच्या एकंदरीत लुकला साजेशी अशीच आहे.

अंतरंग

होंडाने जाहीर केल्याप्रमाणे कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीतील सात आसनी गाडी, हे या गाडीचे वैशिष्टय़ नक्कीच आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या रांगेतील सीट्स फोल्ड करण्याचा पर्याय असल्याने ही गाडी सामान वाहून नेण्यासाठीही उत्तम आहे, यात वाद नाही. मात्र तरीही कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या शेवटच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना वाटणारं अवघडलेपण या गाडीतही चुकणार नाही. गाडीचं स्टिअरिंग व्हील हलकं आणि त्याच वेळी गाडी रस्ता सोडणार नाही, एवढं मजबूतही आहे. या स्टिअरिंग व्हीलवर विविध कंट्रोल्स दिल्याने गाणी ऐकत असताना आवाज कमी-जास्त करणे, मोबाइल गाडीशी जोडला असल्यास फोन उचलणे वा फोन करणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. पुढे बसणाऱ्या प्रवाशांसाठी बॉटल होल्डर, कप होल्डर, अ‍ॅडजस्टेबल सीट्सचा पर्याय या गोष्टी आहेत. गाडीच्या तीनही भागांत वातानुकूलन राहावे, यासाठी तीनही भागांत एसी व्हेंट्स दिले आहेत. पियानो ब्लॅक फिनिशिंग डॅशबोर्डमुळे गाडी आणखीनच देखणी दिसते. पॉवर स्टिअरिंगप्रमाणेच गाडीच्या पुढल्या आणि दुसऱ्या रांगेत पॉवर विंडोचा पर्याय आहे. की लेस स्टार्ट हे या गाडीचे आणखी एक वैशिष्टय़! गाडी एक बटण दाबल्यानंतर चालू वा बंद होते.

सुरक्षा

गाडीतील पुढे बसलेल्या दोन प्रवाशांसाठी अपघाताच्या स्थितीत एअरबॅग्ज हे सुरक्षा फिचर उपलब्ध आहे. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, सीटबेल्ट्स वॉर्निग आदी गोष्टी सुरक्षेसाठी गाडीत देण्यात आल्या आहेत.

गाडीचा परफॉर्मन्स

ऑन रोड आणि ऑफ रोड या दोन्ही ठिकाणी या गाडीचा परफॉर्मन्स उत्तम आहे. गाडीची ऑफ रोड चाचणी घेण्यासाठी गाडी एका कच्च्या रस्त्यावरून चालवली असता गाडीच्या टायर्सची ग्रिप आणि स्टिअरिंग कंट्रोल उत्तम असल्याचे दिसून आले. त्याशिवाय साधारण ५० ते ७० मीटर लांबीच्या एका छोटय़ा ओहोळातूनही गाडी अगदी सहजरीत्या पुढे गेली. त्यामुळे गाडी ऑफ रोडसाठी उत्तम आहे, यात वादच नाही. पण मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवत असताना किंवा ओव्हरटेक करताना हवी तेवढी पॉवर गाडीची इंजिन्स देत नसल्याचेही आढळले. अ‍ॅक्सलरेटरवर पाय देऊनही गाडी वेग घेत नसल्याचे, थोडक्यात गाडीचा पिकअप थोडा कमी असल्याचे जाणवले. गाडी १४० किमी प्रतितास या वेगाने चालवली, तरी कुठेही रस्ता सोडत नाही. त्यामुळे गाडीचा रोड कंट्रोल खूपच चांगला आहे.

rohan.tillu@expressindia.com