अलीकडच्या काही वर्षांत मोटरस्पोर्टला भारतात प्रचंड लोकप्रियता मिळू लागली आहे. वर्षभरात मोटरस्पोर्ट्सचे अनेक इव्हेंट्स देशात विविध ठिकाणी भरवले जातात. त्यातलाच एक म्हणजे कौगर मोटरस्पोर्ट इव्हेंट. जुलै महिन्यात कौगरतर्फे फोरव्हील ड्राइव्ह गाडय़ांचा ऑफ रोड ड्रायिव्हग इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने कौगर मोटरस्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष आशीष गुप्ता यांच्याशी केलेली ही बातचीत..

  • कौगर मोटरस्पोर्ट नेमके काय आहे.
  • लक्झरी सेल्फ ड्रायिव्हग अनुभवासाठी २००९ मध्ये आम्ही कौगर मोटरस्पोर्टची स्थापना केली. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांच्या कालावधीत बरेच बदल झाले आहेत. आता आम्ही प्रत्येक प्रकारातील ड्रायिव्हग इव्हेंट्स आयोजित करतो. अगदी हिमालयातील अवघड वळणवाटांपासून ते राजस्थानातील तप्त वाळवंटापर्यंत आम्ही विविध मोटरस्पोर्ट्स इव्हेंट आयोजित केले आहेत. घनदाट जंगले आणि त्यात पडणारा तुफानी पाऊस या परिस्थितीत ड्रायिव्हगचा अनुभव घेण्यापासून ते आरामदायी ड्रायिव्हग मोटरस्पोर्ट्सचा आनंद आम्ही ड्रायिव्हगप्रेमींना दिला आहे. असे आतापर्यंत आम्ही देशभरात ८० मोटरस्पोर्ट इव्हेंट्स आयोजित केले आहेत. यंदा आम्ही फोर्स गुरखा आरएफसी हा फोरव्हील ड्राइव्ह गाड्यांचा ऑफ रोड ड्रायिव्हग इव्हेंट आयोजित केला असून देशातील हा पहिलाच असा इव्हेंट आहे. यात फोरव्हील ड्राइव्ह गाडय़ांचे मालक आणि या प्रकारच्या स्पर्धामध्ये रस असलेल्यांचा समावेश असेल.
  • यंदाच्या स्पध्रेचे आकर्षण काय असेल.
  • आम्ही २०१४ पासून फोर्स गुरखा आरएफसीसारखे मोटरस्पोर्ट इव्हेंट आयोजित करीत आलो आहोत. दर वर्षी स्पर्धकांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल, अशा प्रकारची या इव्हेंट्सची रचना असते. त्यामुळे त्यांच्यातही दरवर्षी सुधारणा होत असते. यंदाही तसेच आहे आणि ऑफ रोड ड्रायिव्हग क्षेत्रात आणखी नवे टॅलेंट या स्पध्रेच्या माध्यमातून पुढे येईल अशी अपेक्षा आहे. जुन्या जमान्यातील हेरिटेज फोरव्हील ड्राइव्ह गाडय़ा, मॉडिफाय केलेल्या गाडय़ा, ऑफ रोडसाठी आदर्श ठरू शकतील असे ट्रॅक्स हे सर्व यंदाच्या स्पध्रेचे आकर्षण असेल. तसेच फोरव्हील ड्राइव्हचे अनुभव शेअर करणारे वाहनचालक, मालक, उत्पादकांशी हितगुज आणि मनोरंजनाचे कार्यक्रम हेही या स्पध्रेचे आकर्षणिबदू ठरतील.
  • या स्पध्रेचे उद्दिष्ट काय आहे.
  • गेल्या काही वर्षांत देशात ऑफ रोड ड्रायिव्हगची क्रेझ निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या ड्रायिव्हगची आवड असलेले अनेक जण ग्रुप तयार करून अ‍ॅडव्हेंचर इव्हेंट्स आयोजित करीत असतात. भारतात सद्य:स्थितीत ३९ ऑफ रोड क्लब्ज असून हजारो जण त्यांचे सभासद आहेत. हे क्लब्ज त्यांच्या शहरांत अथवा क्षेत्रांत ऑफ रोड ड्रायिव्हगचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. आमच्या आरएफसी इंडिया क्लबतर्फे आम्ही या सर्व क्लब्जना राष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जिथे हे सर्व क्लब्ज एकत्र येऊन मोटरस्पोर्ट इव्हेंट आयोजित करू शकतात.
  • तुम्हाला यंदा कसा प्रतिसाद अपेक्षित आहे.
  • फोर्स गुरखा आरएफसी इंडिया २०१६ या कार्यक्रमात २५ संघ सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. हा फोरव्हील ड्राइव्ह वाहनांचा हा आरंभ सप्ताह असून किमान १००० नोंदणीकृत पाहुणे या इव्हेंटला भेट देतील, अशी मला अपेक्षा आहे. नोंदणीकृत पाहुणे म्हणजे जे तिकीट काढून या इव्हेंटचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहतील असे हौशी कारप्रेमी. लोकांना मुक्त प्रवेशाची संधीही उपलब्ध असेल आणि त्यामुळे प्रत्यक्षदर्शीची संख्या मोठी असेल अशी मला अपेक्षा आहे. नोंदणीकृत पाहुण्यांना मात्र इव्हेंटमधील काही कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
  • वाहननिर्मिती क्षेत्राबद्दल केंद्र सरकारच्या धोरणाविषयी आपले मत काय आहे.
  • ऑटो सेक्टरला सध्या बरे दिवस आले आहेत. केंद्राचे धोरण या क्षेत्राबद्दल अनुकूल आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणामुळे अनेक कारनिर्मात्या कंपन्या देशात उत्पादन केंद्रे स्थापन करण्यास उद्युक्त होत आहेत. वाहननिर्मिती क्षेत्राच्या वाढीला पोषक असे हे वातावरण आहे. नवनवीन कार बाजारात येत आहेत. ग्राहकांचीही संख्या वाढते आहे. याचा अंतिमत: फायदा आमच्यासारख्या कार्यक्रम आयोजकांना होत आहे. कारण कारनिर्मात्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ड्रायिव्हगचा अनुभव घेता यावा यासाठी कार्यक्रमांची आखणी करत आहेत.

शब्दांकन : विनय उपासनी