दुचाकी असो वा चार चाकी तिच्या निर्मिती क्षेत्रात – कंपन्यांमध्ये पडद्याआड काय घडते हे उलगडून दाखविणारे हे नवे सदर वाचकांसाठी. चालक-वाहन खरेदीदारांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या बाबींचा ऊहापोहही यात केला जाईल. त्याचबरोबर नवनव्या वाहनांमधील वैशिष्टय़पूर्ण अ‍ॅक्सेसरीजची ओळख व त्याची भारतीय वाहन क्षेत्र तसेच येथील रस्ते-वाहतूक व्यवस्थेबरोबरची सांगडही ‘न्युट्रल व्हय़ू’द्वारे दर आठवडय़ाला येथे घातली जाईल.

अब्जाहूनही अधिक भारताची लोकसंख्या आहे. पैकी निम्म्याहून अधिकांचे रस्त्यावर येणे-जाणे असते. वाढत्या लोकसंख्येमुळे म्हणा रस्ते सुरक्षेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फारसा गंभीर नसतो. त्यामुळेच दिवसेंदिवस रस्ते हे मृत्यूमार्ग ठरत आहेत आणि त्याबाबतची गंभीरताही दिसून येत नाही.

भारतीय काय अन्य काय वाहन उद्योगाबाबत माझे एक निरीक्षण नेहमीच राहिले आहे. ते म्हणजे केवळ पैसा कमाविण्यासाठी हे उद्योग चालले आहेत आणि प्रसंगी त्यापोटी अनेकदा मनुष्यजीवनाशी ते खेळ खेळतात.

आता छोटय़ा प्रवासी कारचेच उदाहरण घेऊ या. ३.५ ते अगदी ५ लाख रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या कारना देशात सर्वाधिक मागणी आहे. भारतातील एकूण प्रवासी कार विक्रीपैकी या सब ४ मीटर गटातील कारची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत ४० टक्क्यांहूनही अधिक होते.

मारुती, ह्य़ुंदाई, टाटा मोटर्स या पारंपरिक कंपन्या छोटय़ा श्रेणीतील अनेक प्रवासी कार (मॉडेल) तयार करतात. यात नव्या दमाच्या होण्डा, रेनो, निस्सान, टोयोटा या कंपन्यांनीही आता जागा मिळविली आहे. लहान कुटुंब आणि वाहतुकीच्या नजरेतून सुलभ म्हणून या वाहनांना पसंती आहेच.

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या छोटय़ा कारच्या मूळ मॉडेलमध्ये चालकाच्या डाव्या बाजूला आरसे देण्याची पद्धतच नाही. हीच बाब गाजलेल्या एका स्वस्तातील कारचीही. अशा अनेक छोटय़ा प्रवासी कार – ज्यांना ग्राहकांकडून अधिक मागणी आहे त्यामध्ये डाव्या बाजूला आरसेच दिले जात नाही.

वाहन चालविताना लागणाऱ्या मूळ सर्व आवश्यक बाबी त्यामध्ये नसणे हे गंमतीपेक्षा गंभीर अधिक आहे. साधे वाहन शिकतानाही तुम्हाला सांगितले जाते, थोडेदेखील वळताना दोन्ही बाजूच्या आरशाकडे बघूनच वळा म्हणून. आवश्यक अ‍ॅक्सेसरीज न पुरवून कंपन्या कमी किमतीत कार देऊन पैसाच वाचवीत नाहीत तर त्या कारणाने होणाऱ्या अपघातासाठी निमित्त ठरतात. मोठय़ा संख्येने वाहने तयार होत असताना व त्यांची विक्रीही होत असताना एक आरसा बसविण्यासाठी अशी किती झळ त्यांच्या खिशाला बसते?

वाहनाला दोन्ही बाजूंना आरसे देण्याबरोबरच ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर चालण्याची सोय करावी. जेणेकरून चालकाने वाहन सुरू केल्यानंतर ते आपोआपच खुले होण्याची सुविधा होईल. तसे झाल्यास वळताना चालक अधिक सावध होईल व आरशाविना मानेची कसरत होण्याची टळेल.

वाहनाच्या दोन्ही बाजूंना आरसे असणे ही तसे म्हटले तर अत्यंत छोटी बाब आहे. पण ती नसणे ही सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब आहे. वाहनासाठीच्या अशा मूळ गोष्टी पुरविणे हे या कंपन्यांच्या नफादींवर अवलंबून नसून तुमच्या आमच्या सुरक्षेबरोबर केलेली ती प्रतारणा आहे.

pranavsonone@gmail.com