डस्टरच्या नव्या आवृत्तीचे नुकतेच लाँचिंग झाले. बुधवारी बेंगलुरूरत रेनॉ इंडियाचे सेल्व व मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष राफाएल ट्रेगर यांनी या नव्या डस्टरचे उद्घाटन केले. लवकरच ही नवी डस्टर कारप्रेमींच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

बजाज ऑटो-केटीएम आता इंडोनेशियातही
नवी दिल्ली : तरुणांची विशेष पसंती लाभलेली केटीएम डय़ूक ही स्पोर्ट्स बाइक आता इंडोनेशियातील रस्त्यांवरही धावणार आहे. बजाज ऑटो आणि केटीएम यांच्या भागीदारीतून इंडोनेशियात केटीएम डय़ूकचे उत्पादन सुरू होणार आहे. मात्र, केटीएम डय़ूकच्या फक्त ४०० सीसीपर्यंतच्या बाइक्सचे उत्पादन केले जाणार आहे. केटीएम हा ऑस्ट्रियन ब्रँड आहे. दक्षिण-पूर्व आशियातील आमची विक्री वाढवण्यासाठी इंडोनेशियात केटीएम डय़ूकचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतल्याचे केटीएम एजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुबर्ट ट्रंकनपोल्झ यांनी स्पष्ट केले. बजाजच्या सहकार्याने केटीएमला भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली.
इंडोनेशियातही याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास बजाज ऑटोचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख राकेश शर्मा यांनी व्यक्त केला. इंडोनेशियात केटीएमच्या ४०० सीसीपर्यंतच्या बाइकचीच विक्री होणार असल्याचेही शर्मा म्हणाले.