नोटाबंदीच्या निर्णयाचे बरेवाईट परिणाम कसे होतील, याची चर्चा अगदी घरोघरी सुरू आहे. घराचं íथक गणित ते देशाचं íथक गणित या निर्णयामुळे कसं बदललं आहे किंवा कसं बदलू शकतं, याचाही ऊहापोह चालू आहे. साहजिकच वाहनविश्वही यापासून वेगळं नाही, नोटाबंदीच्या या निर्णयाचा या विश्वावरही परिणाम होणार आहेच..

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर होऊन आता पंधरा दिवस झाले. नोटाबंदीच्या या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या जिन्नसांपासून ते मोठमोठय़ा उद्योगसमूहांपर्यंत सर्वावर झाले आहेत. त्यामुळे कोणी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर कोणी नाकं मुरडली आहेत. समाजमाध्यमांवर तर वाक्युद्धच छेडलं गेलंय. नोटाबंदीच्या निर्णयाचे तावातावाने समर्थन करताना आकडेवाऱ्यांची फेकाफेक केली जात आहे, तर हा निर्णय कसा अगदी वाईट आहे, याच्या समर्थनार्थही आकडेवारी पुढय़ात ठेवली जात आहे. खरं कोण आणि खोटं कोण, याचा काही अंदाज येईनासा झालाय. एक मात्र खरं की, या नोटाबंदीच्या निर्णयाचा वाहननिर्मिती क्षेत्रालाही फटका बसला आहे. येत्या काळात तो आणखी जाणवेल, असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं मत आहे.

दिवाळीपर्यंत वाहननिर्मिती क्षेत्राचा आलेख चढता होता. चांगल्या पावसामुळे कृषी क्षेत्रालाही खूप दिवसांनी चांगले दिवस आले, लोकांच्या खिशातही पसा खुळखुळत असल्याने दिवाळीपर्यंत दुचाकी आणि चारचाकींना चांगली मागणी होती. अनेक नवनवीन गाडय़ांचे लाँचिंगही या काळात झाले. त्यांनाही उत्तम प्रतिसाद लाभला. एकूणच वाहननिर्मिती क्षेत्रासाठी सुगीचे दिवस आले असतानाच पंधरा दिवसांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. त्यानुसार आता पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद ठरवण्यात आला आहे. येत्या डिसेंबरनंतर तर या पाचशे आणि हजाराच्या नोटा म्हणजे रद्दी ठरणार आहेत. केंद्राच्या या अचानक जाहीर झालेल्या निर्णयामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बँकांसमोर लागलेल्या रांगा आणि पुढचं सर्व आपण पाहात आणि अनुभवतच आहोत. आता या निर्णयाचे बाजारावर कसे परिणाम होत आहेत, याचेही आकडे येऊ लागले आहेत. प्रथमत: भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने आपटी खाल्ली. सोनं अचानक वधारलं, परंतु नंतर पुन्हा त्याच्या मूळ किमतीवर स्थिरावलं. मॉल, छोटेमोठे व्यापारी, दुकानदार, दूध, भाजीपाला, औषधे या सगळ्यांवरच या निर्णयाचा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. वाहननिर्मिती क्षेत्रही त्याला अपवाद नाही.

नोटाबंदीच्या या निर्णयाचा वाहनविक्रीवर नजीकच्या काळात मोठा परिणाम होणार असला तरी आगामी म्हणजे वित्तीय वर्षअखेरीपर्यंत, काळात त्याचे सखोल परिणाम झालेले दिसून येणार आहेत, कारण वाहनविक्रीचे ७५ ते ८० टक्के व्यवहार हे वित्तपुरवठय़ावर अवलंबून असतात, तर उर्वरित व्यवहार रोखीने होत असले तरी उत्पन्नाचे स्रोत त्यासाठी उघड करणे बंधनकारक असते. त्यामुळे वाहन खरेदीसाठी कोणी किती रक्कम रोख दिली आणि किती रक्कम कर्जाऊ घेतली याचा तपशील उपलब्ध असतो. त्यामुळे पहिला परिणाम या व्यवहारांवरच होणार आहे. नागरी भागातील वाहन खरेदी-विक्रीचे बहुतांश व्यवहार वित्तपुरवठय़ानेच होत असतात, मात्र ग्रामीण भागात हे व्यवहार बहुधा रोखीनेच होत असतात. दुचाकीच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेली चलनटंचाई वाहन खरेदीवर परिणाम करण्याची जास्त शक्यता आहे आणि अर्थातच ग्रामीण भागात त्याचा परिणाम जास्त दिसून येईल, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सिआम) या संघटनेचे मत आहे. देशातील एकंदर वाहनविक्रीपकी ३५ टक्के विक्री ग्रामीण भागात होते. प्रवासी कार घेणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे, तर ५० टक्के दुचाकी ग्रामीण भागातच जास्त विकल्या जातात, अशी सिआमची आकडेवारी सांगते. गाडी घेताना अधिकाधिक रक्कम ग्रामीण भागातूनच जास्त दिली जाते, तिथे वाहनकर्जाना जास्त महत्त्व दिले जात नसल्याचे अनेक डीलर्सचे मत आहे. अर्थात शेतीतल्या उत्पन्नातून गाडय़ा वगरे घेण्याचा कल ग्रामीण भागात नाही. जमिनीचे व्यवहार आणि बांधकाम क्षेत्रातील इतर व्यवहारांच्या जोरावर ही वाहनखरेदी केली जाते, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे हे सर्व व्यवहार थंडावणार असून त्याचा थेट परिणाम वाहनखरेदीवर होणार आहे.

रोख रकमांचे व्यवहार यापुढे कमी होतील. त्यामुळे चलनात असलेला पसा मोठय़ा प्रमाणात कमी होईल आणि परिणामी खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होतील, असे मत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने व्यक्त केले आहे. केवळ वाहनखरेदी वा विक्रीच नव्हे, तर एकंदर सर्वच व्यवहारांवर त्यामुळे मर्यादा येणार असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने वाहनविक्रीच्या दृष्टीने फारसे तेजीचे नसतात, त्यामुळे या दिवसांत मालाला फारसा उठाव नसतो, त्यात आता नोटाबंदीचा ब्रेक लागल्याने वाहनखरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांवर येत्या सहा महिन्यांत मोठा परिणाम होईल, असे फेडरेशनचे म्हणणे आहे.

होंडा कार्सतर्फे उपाययोजना

निश्चलनीकरणाचा विक्रीवर होणारा परिणाम लक्षात घेता होंडा कार्सने एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या सहकार्याने १०० टक्के ऑन रोड आणि एक्स शोरूम वित्तपुरवठा करण्याचा उपाय योजला आहे. नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भात बोलताना होंडाचे विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेन म्हणाले की, ‘पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा होंडाच्या प्रवासी वाहन विक्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच गाडी घेताना आगाऊ रक्कम देण्याचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाडय़ांची विक्री थांबू नये आणि ग्राहकांनाही आगाऊ रक्कम देताना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून आम्ही एचडीएफसी, अ‍ॅक्सिस आणि आयसीआयसीआय या बँकांच्या साह्य़ाने १०० टक्के ऑन रोड आणि एक्स शोरूम वित्तपुरवठय़ा योजना अंमलात आणली आहे. पगारदार आणि व्यावसायिक अशा दोघांनाही ही योजना लागू असेल. तसेच देशभरातील होंडा कार्सच्या डीलर्सकडे ही योजना लागू असेल.’

नोटाबंदीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे आमच्या व्यवसायावर काही परिणाम होईल, असे वाटत नाही, कारण आमच्या ८० टक्क्यांहून जास्त गाडय़ांची विक्री फायनान्सद्वारेच केली जाते. तसेच लक्झरी कारनिर्माती कंपनी असल्यामुळे आम्ही रोखीचे व्यवहार टाळतोच. त्यामुळे अगदी आमच्यापुरता विचार करायचा झाल्यास आमच्या व्यवसायावर नोटाबंदीच्या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही; परंतु बाजारावर थोडय़ा कालावधीकरिता मात्र परिणाम निश्चित होऊ शकतो.

रोलँड फॉल्गर, एमडी आणि सीईओ, मर्सडिीज बेन्झ

नोटाबंदीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे आमच्या व्यवसायावर काही परिणाम होईल, असे वाटत नाही, कारण आमच्या ८० टक्क्यांहून जास्त गाडय़ांची विक्री फायनान्सद्वारेच केली जाते. तसेच लक्झरी कारनिर्माती कंपनी असल्यामुळे आम्ही रोखीचे व्यवहार टाळतोच. त्यामुळे अगदी आमच्यापुरता विचार करायचा झाल्यास आमच्या व्यवसायावर नोटाबंदीच्या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही; परंतु बाजारावर थोडय़ा कालावधीकरिता मात्र परिणाम निश्चित होऊ शकतो.

रोलँड फॉल्गर, एमडी आणि सीईओ, मर्सडिीज बेन्झ

टीम व्हील ड्राइव्ह

ls.driveit@gmail.com