गेल्या दोन भागांमध्ये आपण बाइकचे सर्वाना माहीत असणारे प्रकार म्हणजे क्रूझर मोटरसायकल आणि सुपर स्पोर्ट्स बाइकबद्दल माहिती घेतली. या लेखात आपल्याकडे फारसा प्रचलित नसलेल्या बाइकचा प्रकार आपण बघूयात. डर्ट बाइकिंग वा ऑफ रोड बाइकिंग या शब्दांमधूनच या बाइकचा संबंध धुळीशी सर्वाधिक असल्याचे लक्षात येते. डर्ट बाइक प्रामुख्याने रस्तेच नाहीत, अशा रस्त्यांसाठी बनविल्या जातात.

या बाइकची निर्मिती ही युरोपात पहिल्या महायुद्धाच्या आधी झाली. ट्रायल बाइकिंग म्हणजे बाइकवरून बॅलन्स सांभाळून कसरत करणे हा या बाइकचा सुरुवातीचा हेतू होता. त्यानंतरच्या काळात ही बाइक रेसिंगसाठी वापरणे सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर या बाइकला लाँग ऑफ रोड बाइकिंगसाठी मागणी येऊ लागली. त्यामुळे डांबरी रस्ता नसेल वा मातीच्या ट्रॅकवर वा ओबडधोबड रस्त्यावर जाऊ शकेल, अशा पद्धतीने या बाइकची रचना असते. बॅलन्स करणे सोपे जाण्यासाठी कमी वजन, उच्चदर्जाच्या चासीवर, कमी सीसीचे व अधिक ताकदीचे इंजिन, सामान्य बाइकच्या तुलनेत ७० टक्क्यांहून अधिक ग्राउंड क्लिअरन्स, धक्के कमी बसण्यासाठी मोठे व दणकट सस्पेन्शन आणि महत्त्वाचे कमीतकमी कॉस्मेटिक लुक (पडल्यावर बाइकचे नुकसान कमी व्हावे), कोणत्याही रस्त्यावर पकड राखू शकतील, असे टायर अशा स्वरूपात या बाइकची निर्मिती होते. मुख्य हेतू रेसिंग असल्याने मोटोक्रॉससाठी म्हणजे डर्ट ट्रॅक रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या डर्ट बाइकला नंबरप्लेट, फेअिरग, हॉर्न नसतो. याउलट लांब पल्ल्याच्या, ऑफ रोड बाइक रायिडगसाठी बनविल्या जाणाऱ्या बाइकमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो. बऱ्याचदा या बाइकचा उपयोग रेसिंगसाठीही होतो. मात्र, त्याचे स्वरूप थोडे वेगळे असते. या बाइकना एंडुरो डर्ट बाइक म्हणातात. जागतिक पातळीवर बाइकचा एंडुरो स्पोर्ट्स प्रकार प्रसिद्ध आहे. आपल्याकडे अशा प्रकारच्या स्पर्धाचे प्रमाण खूपच कमी आहे. रॅली बाइकिंगसाठी वापरली जाणारी एंडुरो बाइकला चारशे पेक्षाहून अधिक सीसीचे इंजिन असते आणि अधिक पल्ला कापायचा असल्याने फ्यूएल टँकही मोठा असतो. ट्रेल प्रकारातील बाइक ही ऑफ रोड व ऑन रोड बाइकिंगसाठी वापरली जाते.  ऑफ रोडमधील काही बाइक बॅलन्स स्पोर्ट्ससाठीही वापरल्या जातात. त्यामुळे या बाइकचे इंजिन वेळप्रसंगी दोनशेपेक्षा सीसीचेदेखील असते. या बाइकना बऱ्याच वेळा सीटदेखील नसते. भारतापुरते बोलायचे झाल्यास डर्ट रेसिंग वा त्यासंदर्भातील अन्य मोटरसायकल स्पोर्ट्सना कमी फॉलोअर आहेत. त्यामुळे अशा बाइकची निर्मिती व्यावसायिक पातळीवर फारच कमी कंपन्यांकडून झालेली आहे. केटीएम, कावासाकी, रॉयल एन्फील्ड या कंपन्यांकडून अशा प्रकारच्या बाइकची निर्मिती होते. मात्र, या बाइकच्या किमती लाखांमध्ये आहेत. हिरो मोटोकॉर्पने ऑफ रोड बाइक सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी थोडे प्रयत्न केले आहेत. कंपनीने  इम्पल्स ही मोटरसायकल ऑफ रोड बाइकप्रेमींसाठीच तयार केली आहे. यास दीडशे सीसी इंजिन, अधिक ग्राउंड क्लिअरन्स प्रतिलिटर ६५ मायलेज देऊ शकेल अशा पद्धतीने या मोटरसयाकलची रचना आहे. बाइकची किंमत सुमारे ८३ हजार रुपयांच्या आसपास आणि ही सर्वात कमी किंमत असणारी डर्ट बाइक आहे. बाइकला मोठी मागणी नसली तरी बजेट डर्ट बाइक म्हणून पर्याय चांगला आहे. सामान्य बाइकचा ग्राउंड क्लिअरन्स हा आपल्याकडे १६३ ते १६५ एमएम असतो. इम्पल्सचा ग्राउंड क्लिअरन्स २४५ एमएम आहे. यावरूच या बाइकचा हेतू लक्षात येतो.

obhide@gmail.com