22 January 2018

News Flash

अडथळय़ांची शर्यत!

या स्पर्धेसाठी वाघोलीजवळ चारशे एकर जागेत खास ट्रॅक तयार करण्यात आला होता.

मिलिंद ढमढरे | Updated: September 29, 2017 1:03 AM

महाराष्ट्रात कोठेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविणाऱ्याला जगाच्या पाठीवर कोठेही बिनधास्तपणे वाहन चालविता येते, असे नेहमीच उपहासाने म्हटले जाते. एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यात किमान सात-आठ ठिकाणी खड्डे किंवा खाचखळग्यांचा समावेश असतो. साहजिकच प्रत्येक वाहनचालक रस्त्यावरून मोटोक्रॉस शर्यतच पार करीत असतो. त्यामुळेच की काय आजकाल दुचाकी व चारचाकी वाहनांच्या स्पर्धाना भरघोस प्रतिसाद मिळतो असेही म्हटले जाते.

पुण्यात नुकतीच चारचाकी वाहनांकरिता ‘ऑफरोड कार्निव्हल’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नावाप्रमाणेच स्पर्धेचा मार्ग नेहमीच्या रस्त्यांऐवजी अतिशय अवघड वळणे, तीव्र उतार, खडकाळ व चिखलमय भाग असे अडथळे असलेल्या कच्च्या रस्त्यांचा होता. साहजिकच स्पर्धेत वेगाऐवजी विविध अडथळे पार करताना वाहन चालक, दिशादर्शक यांच्याबरोबरच मोटारीची तांत्रिक बाजू याचीही कसोटी होती. त्याचप्रमाणे वाहनाची सुरक्षा व स्वत:ची सुरक्षा यांनाही दोषांक दिले जाणार असल्यामुळे कमीत कमी दोषांक कसे मिळतील, असा प्रयत्न स्पर्धकांकडून करण्यात आला. येथे प्रत्यक्ष चालक व दिशादर्शक यांच्यातील समन्वय तसेच हे दोघेही मोटारीची तांत्रिक बाजू कशी सांभाळतात यावरही त्यांचे यश अवलंबून होते. एरवी मोटारींच्या स्पर्धामध्ये चालक व दिशादर्शक यांचाच सहभाग असतो. येथे मात्र त्यांच्याबरोबरच कुटुंबीयांनाही वाहनात बसण्याची संधी देण्यात आली होती.

देशभरातील स्पर्धकांचा सहभाग

या स्पर्धेत हैदराबाद, पणजी, अहमदाबाद, कोलकाता, इंदूर, मुंबई, बंगळुरू, बेळगाव, चेन्नई, कोची, पुणे, भोपाळ, गुलबर्ग, नाशिक, औरंगाबाद, सातारा, अकलूज, नागपूर आदी ठिकाणचे पंचेचाळीसहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये अनेक अनुभवी स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी वाघोलीजवळ चारशे एकर जागेत खास ट्रॅक तयार करण्यात आला होता. विविध अडथळ्यांचा त्यामध्ये समावेश होता. या स्पर्धेच्या ट्रॅकमध्ये आठ टप्पे तयार करण्यात आले होते व प्रत्येक स्पर्धकाने दोन दिवसांत हे टप्पे पार करावयाचे होते. या स्पर्धेच्या अगोदर दोन तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता तसेच स्पर्धा सुरू असतानाही पाऊस असल्यामुळे मार्गात अनेक ठिकाणी पाण्याचे पाट वाहत होते. पावसामुळे मातीचा रस्ताही घसरडा झाला होता. ओढय़ाच्या पाण्याला वेग असल्यामुळे वाहनावर योग्य नियंत्रण ठेवणे हेच एक आव्हान होते. चिखलात मोटार रुतल्यानंतर ती त्यामधून बाहेर काढताना स्पर्धकांची सहनशीलता व संयमाची परीक्षाच दिसून आली. चालक व दिशादर्शक यांची या अडथळ्यांमधून वाट काढताना तारेवरची कसरतच होत होती. एक दोन स्पर्धकांच्या गाडय़ा घसरण्याचा अनुभव तेथे पाहावयास मिळाला. दौलत चौधरी व त्यांचा दिशादर्शक जीत तपस्वी ही जोडी संभाव्य विजेती मानली जात होती. दोन वेळा त्यांची मोटार ट्रॅकच्या कडेला असलेल्या चिखलात रुतली. क्रेनच्या साहाय्याने ही मोटार वर काढण्यात आली. अखेरच्या टप्प्यात तीव्र व घसरडय़ा चढावर त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले व ओढय़ामध्ये त्यांची मोटार आडवी झाली. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या ट्रॅकच्या कडेस उभ्या असलेल्या प्रेक्षकांनाही मोटारींमुळे उडणाऱ्या चिखलयुक्त पाण्याचा प्रतिसाद मिळाला नाही तरच नवल.

संयोजकांची सत्त्वपरीक्षा

डिझेल, पेट्रोल अशा विविध विभागांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. डिझेल विभागात राहुल पाटील व डॉ. संतोष पट्टर या जोडीने उत्कृष्ट कौशल्य दाखवीत प्रथम स्थान घेतले. अजित बच्चे व समीर यादव यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पेट्रोल विभागात गोव्याच्या सेड्रिक डिसुझा व अ‍ॅस्टर दास ही जोडी विजेतपदाची मानकरी ठरली. सॅम चुनावाला व अफरोझ खान यांना दुसरे स्थान मिळाले. प्राथमिक विभागात कपिल व मैथिली भोबे, इब्राहीम शेख व इम्रान गरग यांनी नेत्रदीपक कौशल्य दाखविले. शर्यतीच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना स्पर्धेच्या अंतिम रेषेजवळ ठेवलेल्या नवीन मोटारींमधून सफर करण्याची व ती चालविण्याचीही संधी देण्यात आली. मोटारींचे बारकाईने निरीक्षण करीत त्याबाबत शंकासमाधान करून घेण्यावरही अनेक प्रेक्षकांमध्ये कुतूहल दिसून आले. मोटारींचे टायर कोणत्या कंपनीचे आहेत. मोटारीला आठ सिलिंडर का लावण्यात आले आहेत, मोटारीत अनेक ठिकाणी सीट बेल्ट कसे लावले आहेत, चिखलातून जाताना मोटारीची चाके कशी चालतात आदी अनेक शंकांचे समाधान करताना संयोजकांचीही सत्त्वपरीक्षाच होती.

मजबूत टायर्सची कमाल

मोटारींसाठी ही क्रॉसकंट्री स्वरूपाचीच स्पर्धा होती. सर्व प्रकारच्या अडथळ्यांना सहजपणे पार करणारे मजबूत टायर्स, भक्कम अंतर्गत यंत्रणा आदी सुविधा असलेल्या मोटारींचेच अशा स्पर्धामध्ये वर्चस्व असते. वाघोली येथील स्पर्धेतही बोलेरो, महिंद्रा क्लासिक, जिप्सी, टोयोटो आदी गाडय़ांची कसोटी होती. भारतात गोवा, चेन्नई, पंजाब आदी भागांमध्ये अशा स्वरूपाच्या स्पर्धा होतात. वाघोली येथील स्पर्धेस राष्ट्रीय स्तरावर द्वितीय मानांकन आहे. स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष होते. नजिकच्या काळात परदेशातील काही प्रवेशिका मिळतील अशी संयोजकांना अपेक्षा आहे.

सुरक्षेस प्राधान्य

मोटारींच्या शर्यतीत स्पर्धकांच्या सुरक्षा व्यवस्थेस अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असते. ही स्पर्धाही त्यास अपवाद नव्हती. प्राथमिक विभागात जोखीम कमी स्वरूपाची असल्यामुळे त्यानुसार मोटारीत सुरक्षा व्यवस्था करण्याचे बंधन घालण्यात आले होते. एक्स्ट्रीम विभागात जोखीम जास्त असल्यामुळे अधिकाधिक सुरक्षा व्यवस्था करण्याचे बंधन होते. मोटारीस मोठा अपघात झाला तरी चालक व दिशादर्शकांना गंभीर दुखापती होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.

मोटार पर्यटनाची हौस

गेल्या सात आठ वर्षांमध्ये मोटारींकरिता अल्प व्याज दरात व फारशा कागदपत्रांची कटकट न होता सहज कर्ज मिळू लागले आहे. त्यामुळे मोटार खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मोटारीने अनेक ठिकाणी पर्यटन करणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातही डोंगराळ किंवा बर्फमय पर्वतराजींमध्ये, जंगलमय प्रदेशात, वाळवंटी भागात मोटारीने पर्यटन करण्याची हौस वाढत चालली आहे. तसेच अशा मोटारींमधून पर्यटन करणाऱ्यांना सतत वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाणे आवडत असते. वेगाच्या दुनियेचा थरार अनुभवण्याबरोबरच क्रॉसकंट्री स्वरूपाच्या अडथळ्यांच्या शर्यतींचा आनंद घेण्यासही ही मंडळी प्राधान्य देत असतात. दर चार-पाच वर्षांनी नवीन मोटार घेत अशा शर्यतींमध्ये भाग घेण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच अशा शर्यतींनाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

milind.dhamdhere@expressindia.com

First Published on September 29, 2017 1:03 am

Web Title: off road carnival compititon off road cars
  1. No Comments.