रॉयल एनफिल्ड बुलेट या मोटरसायकलने आपली ओळखच अशी निर्माण केली आहे, की रॉयल एनफिल्ड एवढे नाव उच्चारल्यावर डोळ्यासमोर बुलेट येते अन् दणकट, ताकदावान, रुबाबदार, मर्दानी मोटरसायकल अशी वैशिष्टय़े अधोरेखित होतात. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर ही मोटरसायकल आपला ठसा उमटवीत आहे. बुलेटचे इतिहासातील योगदान महत्त्वाचे आहे. ताकदवान इंजिन, पिकप, दणकटपणा यामुळेच ही मोटरसायकल महायुद्धात वापरली गेली आणि तिची ख्याती जगभर पसरली. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारी ही मोटरसायकल भारतात आता लोकप्रिय आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक कंपन्या भारतात आल्या आणि त्यांनी मोटरसायकलची टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक मॉडेल लाँच केली. काही मोटरसायकलनी विक्रमी विक्रीचा टप्पाही गाठला आहे. मात्र, देशातील सर्वात जुना आणि मोटसायकलचा दीर्घकाळ सुरू असलेला रॉयल एनफिल्ड हा एकमेव ब्रॅण्ड म्हणावा लागले. कारण अन्य कंपन्यांच्या मोटरसायकलचे ब्रॅण्ड हे ८० तर काही ९०च्या दशकात उदयास आले आहेत. रॉयल एनफिल्ड कंपनीची कामगिरी आता कमालीची सुधारली असली तरी मोटरसायकल वा कंपनीची आजपर्यंतची वाटचाल सोपी झालेली नाही. कंपनीला काळाच्या ओघात अनेक समस्यांना तोंड द्यवे लागले. तरीही भारतासारख्या दुचाकीच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत बुलेटने आपले वेगळे आणि मानाचे स्थान पटकावले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला अंतर्गत व सीमा सुरक्षेसाठी दणकट, ताकदवान मोटरसायकलची गरज होती. प्रामुख्याने लष्कर आणि पोलिसांसाठी अशा मोटसायकलचा विचार केला जात होता. तत्कालीन केंद्र सरकारने काहीशे मोटरसायकलचे कंत्राट एनफिल्डला दिलेही. त्यानंतर ब्रिटनस्थित असलेल्या एनफिल्ड या ब्रॅण्डने भारतात प्रवेश केला. सुरुवातीस या मोटरसायकलची जुळणीच केवळ होत होती. पुढे जाऊन संपूर्ण मोटरसायकलचे उत्पादन होऊ  लागले. ही मोटरसायकल दणकट, रुबाबदार असल्याने तसेच विशिष्ट आवाजामुळे सामान्य नागरिकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागली. आर्थिक उदारीकरणापूर्वी (म्हणजे १९९०) बुलेट ज्याच्याकडे असले ती व्यक्ती श्रीमंत, असे द्योतक आपल्याकडे मानले जात होते. तसेच, ज्याच्याकडे बुलेट असले त्याच्याकडे मोठय़ा कुतूहलाने पाहिले जात होते. मात्र, किंमत अधिक असल्याने मर्यादित लोकांच्याकडे बुलेट होती. आर्थिक उदारीकरणानंतर देशातील मध्यमवर्गाकडे हळूहळू पैसा येऊ  लागला. त्याची मोबिलिटीची गरज बदलू लागली. मात्र, तत्कालीन हीरो होंडाने देशातील बाजारपेठेत फोरस्ट्रोक मोटरसायकल आणून स्वत:ची बाजारपेठ निर्माण करण्यात सुरुवात केली होती. तसेच, अधिक मायलेज देणाऱ्या व कमी खर्चाच्या मोटरसायकलना देशात मोठी मागणी होती. त्यामुळे १९९४ मध्ये आयशर मोटर्सशी रॉयल एनफिल्डचे नाते जुळूनही फारसा फरक पडला नाही.

अर्थात, देशात याच कालावधीपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे बीज फुलू लागले होते आणि पुढे एक दशकानंतर या क्षेत्राने वेगाने विकास केला तसेच, आर्थिक उदारीकरणामुळे वाढलेल्या रोजगार संधी, उंचावलेले जीवनमान आणि वाढलेली क्रयशक्ती यांच्यामुळे मोटरसायकल खरेदी करण्याची पद्धत बदलू लागली. दीडशे वा दोनशे अधिक सीसीच्या मोटरसायकलना बाजारपेठेत मागणी वाढू लागली. यातच बुलेटचे क्लासिक ३५० आणि ५०० या मॉडेलला चांगली मागणी येऊ  लागली अन् कंपनीचे व रॉयल एनफिल्ड ब्रॅण्डचे भविष्य बदलले. केवळ एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असणारी ही मोटरसायकल विशेषत: क्लासिक ३५० देशातील तरुणांना भावली अन् बुलेट ही सर्वामध्ये लोकप्रिय असणारी मोटसायकल ठरली. ‘कोणती मोटरसायकल घेतो आहेस?’ ‘बुलेट रे!’ ‘पण, वेटिंग आहे. हरकत नाही! बुकिंग केले आहे.

मला ही मोटरसायकल घ्यायची आहे.’ असे संवाद आपल्या कानावरही आले असतील वा आपण अनुभवले असतील. सहज उपलब्ध झालेला कर्जपुरवठा, बदलेली जीवनशैली यांच्यामुळे बुलेटचे आकर्षण पहिल्यापेक्षा वाढले आहे. देशात रॉयल एनफिल्डचे क्लबही स्थापन झाले आहेत आणि बुलेटवरून फिरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रॉयल एनफिल्डचं बुलेट ब्रॅण्ड वादळ ३५० सीसी व त्यापेक्षा अधिक सीसीच्या देशातील मोटरसायकल बाजारपेठेवर अधिराज्य गाजवत आहे आणि अजूनही ते गाजवेल असे सध्यातरी जाणवते आहे, हे नक्की.

(पूर्वार्ध)

obhide@gmail.com