शीर्षक वाचून जरा चक्रावलात ना.. चक्रावण्यासारखंच आहे. पण फार काही डोकं खाजवू नका.. रॉयल एन्फिल्ड अर्थात सर्वाची लाडकी बुलेट, ज्यांच्याकडे असेल आणि जे नित्यनेमाने गोव्याची वारी करत असतील त्यांच्यासाठी हे शीर्षक नवीन नक्कीच नाही. तर गोव्यात दरवर्षी नोव्हेंबरात होणाऱ्या रायडर मॅनियामध्ये हा एन्फिल्डम पाहायला मिळतो. बुलेटप्रेमींसाठी हा कार्यक्रम म्हणजे अगदी आनंदसोहळा असतो.. त्याविषयीच थोडंसं..

कोणत्याही एका गोष्टीवर पराकोटीचं प्रेम असणारे अनेक जण एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक स्वतचा खास असा पंथ तयार होतो. जगात असे अनेक पंथ होते, आहेत आणि राहतीलही. बरं या पंथांना जात, धर्म, प्रांत, वंश, वेश, भाषा याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. मी ज्याला मानतो, पूजतो त्याला तूही मानतो, पूजतोस ना.. झालं तर मग, असं असतं हे पंथीय असणं. हे म्हणजे अगदी आध्यात्मिक वाटत असेल ना.. तर थांबतो आणि थेट विषयालाच सुरुवात करतो.. तर तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही बुलेटप्रेमी पंथाचे. आणि या बुलेटप्रेमी पंथाचा एका आनंदसोहळा, ज्याला आपण कुंभमेळाही म्हणू शकतो, दरवर्षी गोव्यात भरत असतो. या आनंदसोहळ्याला देशभरातील बुलेटप्रेमी आपापले जथे घेऊन हजर राहात असतात. इथे असतो बुलेटप्रेमींचा रायडर मॅनिया. मुळात बुलेट तुमच्याकडे असणं म्हणजे तुम्ही तिचे निस्सीम भक्त, चाहते आहात म्हणून ती तुमच्याकडे आहे, असं या बुलेटप्रेमी पंथात मानलं जातं. तेव्हा या रायडर मॅनियात सहभागी होण्यासाठी तुम्हाला हा एकमेव निकष पाळावाच लागतो. साधारणत दोनशे किलो वजनाचं हे धूड हाताळायला मुळात अंगात रग हवी. बुलेट चालवणं तर दूर, पण जागेवर उभी असलेली ही गाडी मेन स्टॅंडवर लावणे किंवा मेन स्टॅंडवरून काढणे हे सुद्धा येरागबाळ्याचे काम नाही. तर अशा या निस्सीम बुलेटप्रेमींचा कुंभमेळा दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात विगेटर, गोवा इथे भरतो. रॉयल एनफिल्ड कंपनी याचं आयोजन करत असते. यंदा १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत रायडर मॅनियाचं आयोजन करण्यात आलं होते. थम्प दॅट बाइंड्स या सोहळ्याच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच बुलेटवर निस्सीम प्रेम करणारे ४५०० पेक्षा जास्त बुलेटस्वार यात सहभागी झाले होते. आषाढीला जशा गावागावातून वारकऱ्यांच्या िदडय़ा निघतात तशाच देशातील वेगवेगळ्या शहरातील बुलेटस्वारांच्या िदडय़ा शेकडो किलोमीटर्सचा प्रवास करत गोव्यासाठी रवाना होतात. तोच भक्तिभाव, तीच श्रद्धा, तीच शिस्त. डोक्यावर हेल्मेट, फुल रायिडग गीअर त्यात आर्मरसह जॅकेट, ट्राऊझर, नी गार्ड, ग्लव्हज, सन ग्लासेस अशी जय्यत तयारी असते. रॉयल एनफिल्डच्या इंजिनच्या दमदार आवाजात जेव्हा असा बुलेटचा ताफा धडधडत रस्त्यावरून जातो तेव्हा दुतर्फा माना वळल्याशिवाय राहात नाहीत. साधूंचे जसे आखाडे असतात तसंच बुलेटप्रेमींचे पण गावोगावीचे आखाडे असतात. मुंबई पायरेट्स, चन्नई ट्रिपर्स, पेशवा, स्ट्रीट हॉकस, हायवे नोमॅड्स अशी त्यांची नावं असतात. तीन दिवस हा कुंभमेळा चालतो. सेवेंटी टू अवर्स ऑफ एन्फिल्डम, संगीत, मित्र आणि मोटरसायकल्स. कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. अगदी नवख्या बुलेटस्वारापासून ते अगदी हजारो किलोमीटर्सचा बुलेटस्वारीचा अनुभव असलेल्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. कच्च्या मातीच्या रस्त्यावर बुलेट सुरक्षितपणे कशी चालवावी याचं प्रशिक्षण दिलं जातं. अनेक महिलाही आता बुलेटस्वार बनू लागल्या आहेत. त्यांच्यासाठीही प्रशिक्षण तर असतंच परंतु स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात येतात. पुरुष आणि महिलांसाठी डर्ट ट्रॅक रेसिंग ही एक थरारक स्पर्धा आयोजित केली जाते. या व्यतिरिक्त चार-पाच जणांनी बुलेट उचलून पळत जाण्याची एक गमतीदार स्पर्धाही या ठिकाणी असते. असेम्ब्ली वॉर्स नावाची एक स्पर्धा असते ज्यामधे बुलेटचे सगळे पार्टस वेगळे करून पुन्हा जोडायचे असतात. सर्वात स्वच्छ बुलेट कुणाची अशीही एक स्पर्धा असते. याशिवाय वेगवेगळी चर्चासत्रं आयोजित केलेली असतात. देशभरातले अनेक रायडर्स आपले प्रवासाचे थरारक अनुभव इतरांना सांगतात. बुलेटप्रेमींसाठी खरेदी करण्यासाठी स्टॉल्स लागलेले असतात. संगीतप्रेमींसाठी रात्री रॉक बॅण्ड्स झणाणत असतात. दाढी वाढवलेले, अंगभर टॅटू काढलेले रायडर्स हिप्पीसारखे फिरत असतात. गप्पा, गाण्यांना ऊत आलेला असतो, वेगवेगळ्या क्लब्सचे रायडर्स आपापल्या बुलेट्स फिरवून शक्तिप्रदर्शन करत असतात. कस्टम मेड बुलेट्स पहायला गर्दी असते. अनेक कलाकार आपली कल्पनाशक्ती वापरून बुलेटमधे कलात्मक बदल करून बुलेट्स प्रदर्शनासाठी मांडतात. त्यातलं एक एक मॉडेल पाहून अचंबित व्हायला होतं. परदेशी तरुण तरुणीही हजेरी लावत असतात. सकाळी लवकर उठणाऱ्यांसाठी गोव्यातल्या निसर्गरम्य वातावरणात बुलेट राइडस आयोजित करण्यात येतात. या सर्वाना बांधणारा धागा एकच, रॉयल एनफिल्डच्या बुलेटवरचं निस्सीम प्रेम. अनेक वल्ली इथे आवर्जून हजेरी लावतात. त्यातच मुंबईचा रमेश असतो. ट्रेन अपघातामधे दोन्ही पाय गमवल्यावर बुलेट शिकलेला आणि मुंबईहून बुलेट चालवत गोव्याला आलेला. इटलीहून भारतात आलेली आणि बुलेटवर भारत देश फिरणारी जुलिया असते. असे बुलेटप्रेमी ही या महोत्सवाची शान. दररोज सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत जल्लोश सुरू असतो. असं हे तीन दिवसांचं एन्फिल्डम मनसोक्त एंजॉय केल्यानंतर तमाम बुलेटकरी जड अंतकरणाने परतीच्या प्रवासाला निघतात, पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी.