कॉम्पॅक्ट सेदान कार आपल्याकडे फॅमिली कार म्हणून खपविली जाते. वास्तविकपाहता कॉम्पॅक्ट सेदान कारमध्ये मध्यम आकाराच्या सेदानमध्ये म्हणजे ४.४ मीटर लांबी असणाऱ्या कारचा अनुभव घेता येत नाही. मध्यम आकाराच्या सेदान वर्गामध्ये होंडा सिटी, सुझुकी सियाझ, फोक्सवॅगन व्हेंटो, स्कोडा रॅपिड, ह्य़ुंदाई फ्लूडिक व्हर्ना आदी कार आहेत. पूर्वीच्या तुलनेत या वर्गामध्ये प्रीमियम सेदान कारमधील सुविधा दिल्या जात असून, किंमतही १० लाख रुपयांपासून पुढे आहे. या पर्यायांपकी कोणत्या कारचा विचार करता येऊ शकतो याचा घेतलेला हा आढावा.

मध्यम आकाराच्या सेदान कारचा अनुभव शोफर ड्रिव्हनमध्ये अधिक घेता येतो. मात्र आपल्याकडे या वर्गामधील कार बहुतेक करून चालकाऐवजी मालक चालवतात. . आकाराने मोठय़ा असल्याने या कारमध्ये लेग, हेड, सीटिंग स्पेस अधिक असते. तसेच, डिक्कीही भली मोठी मिळते. त्यामुळे कुटूंबासह सहलीला जाताना बॅग वगैरे साहित्य कुठे ठेवायचे, असा प्रश्न पडत नाही. अर्थात, कार मोठी असल्याने शहरात चालविताना नक्कीच मर्यादा येतात आणि  सार्वजनिक ठिकाणी पार्किंग करताना त्रास होऊ शकतो. मध्यम आकाराची सेदान ही अनुभव   घेण्यासारखी कार. प्रदीर्घ प्रवासावेळी कारमध्ये अजिबात थकवा जाणवत नाही. स्कोडा रॅपिड व व्हेंटो यातील फीचर, इंजिन जवळपास एकसारखेच आहे. पण या कारना या वर्गात आपला जम बसविता आलेला नाही. एकेकाळी सिटी ही सर्वाधिक खपली जाणारी मध्यम आकार गटातील कार होती. पण, होंडा सिटीला व्हर्ना व सियाझ यांची तगडी स्पर्धा आहे.

डिझाइन

सियाझकडे पाहिल्यावर कार मोठी असल्याचे जाणवते. सेमी स्पोर्ट रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी क्रोम फिनििशगचे ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉगलॅम्प दिले असून, मागील बाजूस क्रोम पट्टी दिली आहे. तसेच डिक्कीला सेमी स्पोर्ट रुप दिले आहे. त्यामुळे कारची आकर्षकता वाढते. कारची लांबी ४४९० एमएम असून, या वर्गामधील ही सर्वात मोठी कार आहे. डिक्कीही ५१० लिटरची आहे. सियाझची स्पर्धा लक्षात घेऊन होंडाने सिटीमध्ये बदल करून नवे मॉडेल बाजारात  आणले आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प व डेटाइम रिनग लाइट्सचा समावेश असून, क्रोम पट्टी असणारे नवे फ्रंट ग्रिल दिले आहे. टेल लॅम्पची रचना नव्याने केली असून, एलईडी दिले आहे. तसेच, स्पॉयलर देताना त्यातही एलईडीचा स्टॉप लॅम्प दिला आहे. त्यामुळे रूपात नक्कीच सुधारणा झाली आहे. सिटी लांबीला ४४४० एमएम असून, या वर्गातील दुसरी मोठी कार आहे. यास ५०६ लिटरची डिक्की आहे. होंडाचे रुप जागतिक दर्जाचे असले तरीही सियाझची आकर्षकता अधिक . व्हर्नाचे मॉडेल रचनेबाबत जुने झाले आहे. या वर्षी नवे मॉडेल बाजारात येण्याची अपेक्षा आहे. व्हर्नाची नवी रचना व आकर्षकतेमुळे ती  सिटी व सियाझला नक्कीच मागे टाकते. व्हर्नाला देखणी कार म्हणायलाच हवे. कारण होंडाचा सिटीला पहिला धक्का सियाझने नव्हे, तर नव्या रचनेतील व्हर्नाने दिलेला आहे. क्रोम, स्पोर्टी कव्‍‌र्ह, प्रोजेक्टर हेड लॅम्प, एलईडी डे टाइम रिनग लाइट, एलईडी फॉग लॅम्प व टेल लॅम्प यांच्या जोडीला वाइड सेंट्रल ग्रिल, रेअर क्रोम बम्पर, मागून वर उचललेला बम्पर लाइन यामुळे ती भाव खाऊन जाते. व्हर्ना लांबीला ४३७० एमएम असून, ४६५ लिटरची डिक्की आहे.

अंतर्गत रचना

अंतर्गत रचनेचा विचार करायचा झाल्यास सिटीला लेदर व फॅब्रिकच्या सीट कव्हरचा पर्याय आहे. फ्रंट व रेअर सीट आर्म रेस्ट दिली असून, बेइज रंगाचे केबिन आहे. इन्फोटेनमेंट सिस्टीम, क्रूझ कंट्रो, अ‍ॅडजेस्टेबल ड्रायव्हर स्टी, डय़ुएल एअर बॅग, एबीएससह इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन स्टॅण्डर्ड म्हणून दिली आहेत. सियाझमध्ये ब्लॅक-बेइज रंगाचे इंटिरियरसह डॅॅश बोर्ड व डोअरना डार्क ब्राऊन रंगाचे पॅनल आहे. सीटसाठी लेदर वा फॅब्रिकचा पर्याय आहे. चालकासह अन्य आसनांवरही आर्म रेस्ट दिली आहेत. स्टिअिरग माऊंटेड कंट्रोल, इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसीसह रिअर सीट व्हेंट, पुशबटन स्टार्ट, एबीएस, ईबीडी, डय़ुएल एअरबॅग, आसोफिक्स चाइल्ड सीट माऊंट दिले आहे. व्हर्नाचे केबिन अधिक आकर्षक असून, ब्लू इल्युमिनेशमुळे कॉकपीट मध्ये बसल्याचा आभास होतो. ब्लॅक-बेइज रंगाचे केबिन असून, सीटसाठी लेदर व फॅब्रिकचा पर्याय आहे. कारमध्ये वापरलेले प्लास्टिक उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे कारमध्ये बसल्यावर वेगळा अनुभव घेता येतो. इन्फोटेनेमेंट सिस्टीम, स्टिअिरग माऊंटेड कंट्रोल, डय़ुएल एअरबॅग, एबीएससह ईबीडी स्टॅण्डर्ड फीचर असून, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रिअर पार्किंग सेन्सर, क्लायमेट कंट्रोल एसी आदी सुविधा दिल्या आहेत.

इंजिन

या वर्गामधील सर्वात ताकदवान कार व्हर्ना असून, १२१ बीएचपी पॉवर आहे. होंडा सिटी ११७ बीएचपीची असली तरी सिटी पिकअपबाबतीत अधिक ताकदवान. सियाझ मायलेज हे उद्दिष्ट  डोळ्यापुढे ठेवून तयार केली असल्याचे कारची बीएचपी पाहून लक्षात येते. हायवेवर ९१ बीएचपीची मर्यादा पीकअप घेताना जाणवते. पण, मायलेज अधिक असल्याने याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.

मायलेज किती

मारुतीने मध्यम आकारातील सेदान कारला अधिक मायलेज कसे मिळेल यावर भर दिला आहे. त्यामुळेच ही कार पेट्रोलवर प्रति लिटर २०.७३ किमी व डिझेलवर २६.२१ किमी देते, असा कंपनीचा दावा आहे. हायवेवर ही कार १७.३० किमी , तर शहरात १३-१४ किमीचे मायलेज मिळू शकते. सियाझचे या वर्गामधील हे सर्वाधिक मायलेज. होंडा सिटीचे पेट्रोल मायलेज प्रति लिटर १७.८० किमी व डिझेल २५.८० किमी, तर व्हर्नाचे पेट्रोल व डिझेलचे मायलेज अनुक्रमे प्रति लिटर १७.४३ किमी व २३.५ किमी आहे.

स्मार्ट हायब्रीड

सिटी, व्हर्ना व सियाझ पेट्रोल, डिझेलमध्ये उपलब्ध आहेत. मात्र स्मार्ट हायब्रीडचा पर्याय केवळ सियाझमध्ये आहे. सियाझ डिझेलमध्ये हे तंत्रज्ञान वापरले आहे. स्मार्ट हायब्रीडमध्ये कारच्या मायलेजमध्ये मोठा फरक पडतो. त्यामुळेच डिझेल कार प्रति लिटर २७ किमी मायलेज देते, असा सुझुकीचा दावा आहे. जीएसटीमुळे हायब्रीड कारच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे आपला दिवसाचा वापर किमान ५० किमी असेल तरच डिझेल कारचा विचार करावा.

काय करावे

कार घेताना कॉस्ट ऑफ ओनरशिपचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी देखभाल  जाळे  , सुटय़ा भागांची उपलब्धता व किंमत, मायलेज, फेरविक्री किंमत आदींचा विचार करावा. तीनही कार उत्तम आहेत. मात्र सध्या स्पर्धा ही सिटी व सियाझमध्ये आहे (व्हर्नाचे नवे मॉडेल बाजारात येणे अपेक्षित आहे). त्यामुळे मध्यम आकाराची सेदान कार घेताना सध्या तरी दोन पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. अन्यथा व्हर्नाचे नवे मॉडेल येण्यापर्यंत वाट पाहून मग तुलना करून निर्णय घेता येईल. सियाझचे मायलेज सर्वाधिक असून, कॉस्ट ऑफ ओनरशिप कमी आहे. त्या तुलनेत होंडा सिटी महागडी (रिनग कॉस्ट, ओनरशिप कॉस्ट) आहे. अर्थात, सिटी ही सिटी आहे. त्यामुळे होंडाप्रेमी असणाऱ्यांनी केवळ सिटीचा विचार करावा.  मात्र बजेट कार (किंमत, मायलेज, कॉस्ट ऑफ ओनरशिप, फेरविक्री किंमत) हवी असल्यास सियाझचा पर्याय सर्वोत्तम आहे.

ls.driveit@gmail.com