25 September 2020

News Flash

टेस्ट ड्राइव्ह : राजेशाही थाट..

स्कोडाच्या तशा सर्वच सेडान प्रकारातल्या गाडय़ा आरामदायी आहेत.

 

स्कोडाच्या नव्याकोऱ्या सुपर्बचा थाट राजेशाहीच आहे. हिच्यात तुम्ही स्थानापन्न झालात, की त्याची प्रचीती येते. भर पावसात तुम्ही लाँग ड्राइव्हला घेऊन गेलात तर तुमच्या पोटातलं पाणीही हलणार नाही, एवढी आरामदायी आहे ही सेडान..

स्कोडाच्या तशा सर्वच सेडान प्रकारातल्या गाडय़ा आरामदायी आहेत. कोणताही अपवाद नाही. मग ती रॅपिड असो वा ऑक्टाव्हिया किंवा मग सुपर्ब. सर्व एकापेक्षा एक सरस अशाच. त्यात आता सुपर्बच्या नव्या अवताराची भर पडली आहे. रूपाने देखणी आणि पळायला वेगवान अशा या गाडीचा तोराच वेगळा आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे असो वा शहरातला रस्ता, सुपर्बला लोकांकडून हमखास सेकंड लुक मिळतोच मिळतो. गाडी सुरू केल्यानंतर पहिल्या काही सेकंदांतच उच्च प्रतीचा वेग गाठू शकणाऱ्या सुपर्बला जोड मिळालीय ती तेवढय़ाच ताकदीच्या इंजिनाची. गीअर बॉक्समधला टॉपचा सहावा गीअर तुम्ही टाकला, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला तुम्हाला इतर गाडय़ांपेक्षा नक्कीच कमी वेळ लागेल, याची हमी स्कोडा सुपर्ब देते. अशा या भन्नाट गाडीचे अंतरंग आणि बाहय़रूप जाणून घेऊ या..

बाहय़रूप

सुपर्बचा तोंडवळा आकर्षक आहे. ग्रिल, हेडलॅम्प, टेललॅम्प यांना खास क्रोम वापरण्यात आला आहे. तसेच डे टाइम रिनग लाइटही आहेत. म्हणजे पावसाळ्यात अनेकदा आभाळ भरून आले की, अंधार दाटतो, अशा वेळी हे डे टाइम रिनग लाइट खूप उपयुक्त ठरतात. ते एक प्रकारे सेन्सर्ससारखीच कामे करतात. जरा अंधूक वाटले तरी हे लाइट लगेच लागतात. गाडीच्या काचा, ए व बी पिलर्स मजबूत आहेत. आधीच्या सुपर्बपेक्षा तब्बल ७५ किलोग्रॅमने नवी सुपर्ब हलकी असली तरी हमरस्त्यावर धावताना तिचा वेग वाखाणण्याजोगा आहे. ताकदवान इंजिनामुळेच हे शक्य झाले आहे. सुपर्बचा बूट स्पेसही, तब्बल ६२० लिटर एवढा प्रशस्त आहे. त्यामुळे एका फॅमिलीचे प्रवासाचे सामान एवढय़ा जागेत आरामात बसू शकते. एकंदर गाडीचा लुक सर्वोत्तम आहेच, शिवाय या गाडीकडे पुन्हा एकदा तरी वळून बघावे लागेलच, अशीही जादू आहे.

अंतरंग

स्कोडाच्या या नव्याकोऱ्या कारमध्ये तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला हिला राजेशाही थाट का म्हटलंय, याची प्रचीती येते. कारण आतमध्ये अत्युच्च दर्जाचे लेदर वापरलेले प्रशस्त अशी आसने तर आहेच, शिवाय तुम्हाला बसतानाही आरामदायी वाटेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या आसनावर बसणाऱ्यांच्या पायांना त्रास होणार नाही इतपत प्रशस्त लेग रूम देण्यात आली आहे. तसेच मागे वातानुकूलन चांगले राहावे यासाठी मागील आसनांच्या समोर आणि पुढील आसनांच्या मागच्या बाजूला एसी व्हेंट्स आहेत, जे की गाडीतील हवा थंड ठेवतात. तसेच पुढील आसनांच्या मागच्या बाजूला खोबणी  आहेत, ज्यात पुस्तके, पेपर ठेवता येऊ शकतात. मागील बाजूच्या आसनाला आर्मरेस्टची सुविधाही आहे. या आर्मरेस्टला वरून कव्हर असून ते सरकवले असता त्याच्या आत कपहोल्डर्स वगरे आढळून येते. इतकेच नव्हे तर एसी व्हेंटच्या खालीही एक अशी खोबण देण्यात आली आहे. मागील बाजूच्या दोन्ही दरवाजांच्या आतल्या बाजूलाही कपहोल्डर्स तसेच पाण्याच्या बाटल्या ठेवता येऊ शकेल, अशी व्यवस्था आहे. मागे बसलेला प्रवासी कितीही उंचीचा असला तरी त्याला आरामात बसता येऊ शकेल अशी गाडीची रचना आहे. थोडक्यात हेडरूमही चांगली आहे सुपर्बमध्ये.

तसेच पुढील बाजूला ड्रायव्हरच्या बाजूच्या आसनालाही प्रशस्त लेगरूम देण्यात आली आहे. ड्रायव्हरचे आसन इलेक्ट्रॉनिकरीत्या अ‍ॅडजस्ट करता येऊ शकणारे आहे. संपूर्ण यंत्रणा इलेक्ट्रॉनिक असल्याने ड्रायव्हर त्याच्या उंची, लांबी, रुंदी यांनुसार आसन मागेपुढे करता येऊ शकते. तसेच स्टीअिरगही त्यानुसार अ‍ॅडजस्ट करता येते. डॅशबोर्डची रंगसंगती संयत आहे. त्यात कुठलाही भडक रंग वापरण्यात आलेला नाही. साडेसहा इंचाच्या कलर डिस्प्लेची सुविधा सुपर्बमध्ये आहे. गाडी पुशबटनद्वारे चालू करता येते. त्यामुळे चावीची गरज नाही. चालकाच्या डाव्या बाजूला, गीअर बॉक्सच्या मागे कपहोल्डर्स, मोबाइल ठेवण्यासाठीची खोबण यांबरोबरच खराब पाने वगरे ठेवण्यासाठी छोटीशी कचराकुंडीही दाराला देण्यात आली आहे. तसेच गाडीला सनरूफही देण्यात आला आहे. लांबच्या प्रवासात पाय आखडणार नाहीत, यासाठी चालकालाही प्रशस्त अशी लेगरूम देण्यात आली आहे. त्याचबरोबर गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढे-मागे प्रत्येकी चार अशा आठ एअरबॅग्जची सुविधा आहे. याशिवाय एबीएस, ईबीडी या सुविधा, पाìकग सेन्सर्स आणि हिल होल्ड याही यंत्रणा आहेतच. चालकाच्या आसनाच्या बाजूला असलेल्या दारात एक छोटीशी सुविधा आहे. एक छत्री त्या ठिकाणी एका खोबणीत देण्यात आली आहे. मात्र, बहुधा ही सुविधा फक्त टॉप-एन्ड गाडीतच असावी.

ऑन रोड कामगिरी

आता एवढा सगळा राजेशाही थाट असलेली, तब्बल पाच मीटर लांबी असलेली सुपर्ब सेडान पळताना मात्र स्वत:चा आब राखणारी, म्हणजे कमी मायलेज देणारी असेल असाच सर्वसाधारण समज होतो. हा समज सर्वच सेडान गाडय़ांबद्दल होतो, मात्र स्कोडा सुपर्ब आपला हा समज खोटा ठरवते. रस्त्यावर ही गाडी अक्षरश: भन्नाट वेगाने तर पळतेच, शिवाय मायलेजही चांगला देते. एक लिटर पेट्रोलात ही गाडी हमरस्त्यावर १0 ते १५ किमीचा मायलेज देते. गाडीचे इंजिन अगदी स्मूथ आहे. त्यामुळे गाडी चालवताना इंजिनाचा आवाज येत नाही.

स्पर्धा कोणाशी

सेडान प्रकारातल्या सर्व गाडय़ांशी म्हणजे मारुती सिआझ, हय़ुंदाई एक्सेंट, होंडा अमेझ इत्यादी.

किंमत

२२ लाखांपासून २९ लाखांपर्यंत (किमती एक्स शोरूम)

vinay.upasani@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:28 am

Web Title: skoda superb new model
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 बुलेट राणी..
3 ऑटो न्यूज..
Just Now!
X