सुषमा जोशी-भट

मी व्यवसायाने वकील आहे, माझ्याकडे १९८७ पासून वयाच्या १८ व्या वर्षीपासून मोटारसायकल विथ गिअरचे पक्के लायसन्स   आहे. माझ्याकडे सुरुवातीला एम ५० त्यानंतर एल एम एल वेस्पा होती आता होंडा कम्पनीची इटर्नो आहे. मी कॉलेजमध्ये असताना येझदी ही मोटार सायकल चालवली होती; परंतु कार चालवणे माझे स्वप्न होते. वकिली व्यवसायामुळे मला तालुका, जिल्ह्याच्या ठिकणी जावे लागते. दर वेळी बसने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे कार शिकायचे ठरवले, पण जमेल की नाही ह्याची खात्री नव्हती; परंतु माझ्या बाबांच्या, दिलीप भट यांच्या प्रेरणेने व पाठबळाने सप्टेंबर २०१३ मध्ये ड्रायिव्हग क्लास लावला अन् मला जानेवारी २०१४ मध्ये कारचे पक्के लायसन्स मिळाले. पण गाडी चालवण्याचा अजिबात सराव नव्हता. बाबांकडे नवीन आय-20 घेतली. जुनी सन्त्रो उत्तम कंडिशनमधील गाडी उभी होती. मी कधी ही गाडी चालवण्याची हिम्मत केली नाही. बाबा मला नेहमी म्हणायचे, तुझ्याकडे पक्के लायसन्स आहे. तू ही गाडी चालवत जा. पण मला मी एकटी गाडी चालवू शकेन की नाही याचा आत्मविश्वास न्हवत. गेल्या वर्षी ईदच्या दिवशी मी सहज गाडी स्टार्ट केली. पोर्चमधून बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण काही जमत नव्हते. माझा उत्साह बघून बाबा बाहेर आले. त्यांचे वय ७५ असून काठी व आधाराशिवाय त्यांना चालता येत नाही. त्यांनी मला सूचना देऊन गाडी बाहेर काढायला लावली. जमले, त्यामुळे थोडी हिम्मत वाढली. त्यांच्या जवळ १९५८ चे लायसन्स आहे. (माझे आजोबा व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्याकडे त्या वेळी सनबीम ही विदेशी गाडी होती. ती नंतर बदलली.) मी बाबांना म्हटले, तुम्ही फक्त माझ्या बाजूला बसा, ड्रायिव्हग मी करते तुम्ही मी कुठे चुकते ते सांगा, ते तत्परतेने आले. आम्ही मग पहिल्या गियरमध्ये गाडी चालवली आणि कॉलनीमध्ये १,२ चक्कर मारले आणि रोज गाडी काढायची असे ठरले. तिसऱ्या दिवशी पेट्रोलचा काटा एकडे निर्देश देत होता. पेट्रोल भरणे आवश्यक होते,माझी भावजयपण उत्तम ड्रायिव्हग करते पण तिने नकार दिला. तुम्हीच जा, असे म्हटले. पेट्रोल पंप अमरावती बडनेरा हाय वेवर होता. प्रथम रेल्वेचे फाटक पार करायचे. मग मेन रोडला लागायचे. अतिशय कठीण प्रसंग होता. पण आम्ही १/२ गिअरमध्ये गाडी चालवून यशस्वीपणे परत आलो. परत आल्यावर भावजय म्हणली मी आज पेटोल भरून आणून दिल असत तर तुला कधीच हिम्मत आली नसती. चवथ्या दिवशी बाबा म्हणाले, आज जाऊ नये. मला बरे वाटत नाही, पण माझा उत्साह वाढलेला होता, मी एकटीने गाडी काढली अन् मी कॉलनीमध्ये चक्कर मारली पण समाधान झाले नाही, मी एकटी गाडी चालवू शकते या आत्मविश्वासाने मी पुढील चौकापर्यंत गाडी नेली आणि आणली त्यानंतर मी शहरात गाडी चालवू लागले, बाबांना डॉक्टरकडे नेणे, किंवा इतर कुठे त्यांना जायचं असेल तर मी गाडी घेऊन जात असे.

माझ्या सासूबाई या गावाहून दिवाळीकरिता येणार होत्या. बाबा म्हणाले, आपण त्यांना घ्यायला जाऊ. त्यांची बस अमरावतीच्या गांधी चौक या अत्यंत गजबजलेल्या व गर्दीच्या ठिकाणी थांबणार होती. त्यात दिवाळीची गर्दी इतकी की साधे पायी चालणेदेखील अवघड होते. बाबा सोबत होते. ते म्हणाले, काळजी करू नकोस आणि अतिशय यशस्वीपणे गाडी चालवली आणि त्यांना घरी घेऊन आले. बाबांनी मला, तू मेरिटमध्ये पास झालीस, असे शाबासकीचे प्रशस्तिपत्रक दिले.

माझे गाडी चालवणे हे बाबाच्या प्रोत्साहनाने चालू होतेपण ती अमरावती शहराच्या परिघात. मला गाडी ही शहराच्या बाहेर काढायची होती, हाय वेवर चालवायची होती.. माझी २०१५च्या फेब्रुवारी महिन्यात मोर्शी कोर्टात तारीख होती. बाबांना म्हटले, बाबा जायचे का? त्यांनी स्वत:च्या प्रकृतीकडे  दुर्लक्ष केले. ते माझ्यासोबत आले. हा अमरावती-नागपूरवरचा पहिला अनुभव होता. जाणे-येणे अमरावती -मोर्शी-अमरावती असा १४० किमीचा प्रवास/ड्रायिव्हग आम्ही यशस्वीपणे पार केलं.

त्यामुळे आत्मविश्वास अधिकच वाढला. माझ्या मुलाच्या १२वी बोर्ड परीक्षेनंतर विविध इंजिनीअिरग कॉलेजच्या प्रवेश परीक्षा होत्या. सेंटर  नागपूरला होतं. त्या वेळी आम्ही सर्व जण ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात नागपूरला गाडी घेऊन गेलो. अर्थात ड्रायिव्हग मीच केलं. गाडी अमरावती-नागपूर १५० किमी अंतर हे विनाथांबा चालवली.

आमचे गाव भसदेही जी. बतुल. म.प्र. आहे येथे आमच्या घरच्या गणपती महालक्ष्मी असतात. त्या वेळी परत गाडी घेऊन गेले. अंतर १२५ किमी एकीकडून पार दोन वेळा १५/२० किमीचा घाट असा रस्ता; परंतु मी एकटी ड्राइव्ह करून गेले. त्यानंतर ड्रायिव्हग करणे हा माझा छंदच झाला.

मी वकिलीच्या कामानिमित्त्त जाते तेव्हा कार घेऊनच जाते. ११ डिसेंबरला आम्ही सहकुटुंब शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. जाणे येणे ३२० किमी एकच दिवशी करून परत आलो. जसे जसे वय वाढते तसा तसा आत्मविश्वास कमी होतो म्हणतात;परंतु माझ्या बाबांसारखे जर वडील स्टील तर कोणतीही गोष्ट शिकायला आणि ती आत्मसात करायला वयाची बाधा येत नाही हे खरे.